प्रश्नोत्तरमाला
सूर्या स्वयंप्रकाशा प्रातःकाली कशास तू येसी ?
जन हो, कर्तव्य करा, व्हां जागे, वाचन हे वदायासी || १ ||
रंजित रंजनशीला चंद्रा तू शीण कासया होसी ?
देवासही चुकेना दशा, जागा कथायासी || २ ||
नक्षत्रांनो बोला, कां तुम्ही चमकता सदा गगनी ?
स्वर्गाची वाट तुम्हां दावावी स्पष्ट कोणती म्हणुनी || ३ ||
बोला नवग्रहांनो कोण तुम्हा दावितो तरी पंथ ?
दिव्या शक्ती निरंतन दृश्य न नयनास कल्पनातीत || ४ ||
सांगाहो मजलागी कुसुमांनो कासया तुम्ही फुलता ?
सौंदर्याची तुम्हा मर्त्यांना कळविण्यास भंगुरता || ५ ||
उठासी क्षणात फुटसी कां सलिली लीन बुडबुड्या होसी ?
जे जे दृश्य तयासी गति अंती यापरी वदायासी || ६ ||
मेघांनो भरुनी रिते वर्षाकाळी कशास हो होतां?
कथण्या कि द्रव्याचा संचय विनियोग दुर्दशा येता || ७ ||
काळा झरझर कोठे जासी ऐसे सदैव वद माते ?
अक्षयता देवीच्या दिव्योज्वल मंदिरा पहाया ते || ८ ||
अक्षय ते अससी तू सांग मला देवता कोण ?
गतवर्तमान भावी काळाची माउली असे जाण || ९ ||
कोठुनी वहात येता वायुनो चालला कुठे त्वरीत ?
स्वर्गीच्या मर्त्यांना देऊनी संदेश चाललो परत ||१० ||
प्रश्नोत्तरमाला हि वाचकहो करितसे तुम्हा बोधा
वस्तूंत गूढ असती इशाचे भाव कोणते शोधा || ११ ||
सौजन्य : सौ. माधुरी घुले