आम्ही अंतर्मुख होणार का?

‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ हे वचन सर्वश्रुत आहे. मुळातच एकुणात प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार करताना त्याची व्याप्ती वाढवत तो समष्टिपर्यंत नेण्याचा संस्कार पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबातून होत आला आहे. हा विचारच आपलं जीवन घडवत असतो. संत म्हणजे कुणि बाहेरची व्यक्ती नव्हे. स्वतःमध्ये नीट डोकावून पाहिलं तर ही गुणवैशिष्ट्ये आपल्यातही असू शकतात आणि एवढी दृष्टी आली तरी खूप कांही साधता येईल. माझा विकास मीच घडवू शकतो असा दुर्दम्य आत्मविश्वास मात्र बाळगायला हंवा. साधुसंत हे निश्चितपणे प्राणीमात्रांच्या कल्याणाचाच विचार व कृती करत असतात. मग त्यांचाच आदर्श ठेवून आपण अशी कृती कां करू नये ? निदान तसा प्रामाणिक प्रयत्न तरी नक्कीच करता येईल.

आपलं म्हणजे तुम्हा आम्हा चित्तपावन कुटुंबियाचं कल्याण साधायचं तर परस्परांमध्ये संवाद वाढवायला हंवा, विचारांचं आदानप्रदान मोकळेपणानं व्हांयला हंवं, दोषांचं जाणीवपूर्वक निर्मुलन करायला हंवं, मोठ्या मनानं कौतुक करायला हंवं.यातूनच मग परस्परांच्या जाणिवा आकार घेऊ लागतील. परस्परांना समजून घेतल्यानंतर आपुलकीचं नातं निर्माण होईल. मदत ही काही फक्त आर्थिक नसते, ती केवळ चार प्रेमळ शब्दांची वा स्पर्शाचीही असते असू शकते. स्वकल्याण साधतानाच समोरच्याचंही हित साधता आलं तर त्यासारखा निर्मळ आनंद नाही. आपल्या छोट्याश्या विचारानं वा कृतीनं समोरच्या व्यक्तीच्या चेहर्यावर आनंद पाहणं यासारखं अन्य समाधान असूच शकत नाही. मग ही सुरवात आपल्याच कुटुंबीयांपासून म्हणजे आपल्या ज्ञातीबांधवांपासून केली तर? छोट्या कामातूनच आपुलकी निर्माण होते म्हणतात.

तर मग आपण सर्वांनी निश्चय करू. हो! अगदी आतापासूनच. आपल्यात दडलेल्या ‘मी’चं विलयन जाणीवपूर्वक करायचं म्हणजे जे तत्व उरतं तेच ईश्वरत्व. आपण सारी त्याचीच लेकरं आहोत. ‘आहे रे’ कडून नाही रे’कडे पोचवता आलं तर त्यापरता आनंद तो कोणता?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *