भगवान श्री विष्णूंनी आपण त्रेता आणि द्वापार युगांच्या संधीकाली अवतार घेवू असे आश्वासन दिले होते त्यानुसार जमदग्नी व रेणुका हे दाम्पत्य आपल्या अवतारासाठी योग्य असे ठरवून श्री विष्णूंनी आदिशक्तीचे चिंतन करून रेणुकादेवीच्या पंचम गर्भात प्रवेश केला. आणि वैशाख शुद्ध तृतीयेला आदिती नक्षत्रावर परमज्योतिस्वरूप बालकाने रेणुकादेवीच्या उदरी जन्म घेतला. त्रिभुवन सर्वार्थाने प्रकाशित झाले. आश्रमातील वातावरण भारावून गेले. प्रत्यक्ष परमात्म्यानेच जन्म घेतल्याने ज्याच्या चिंतनात योगी रममाण असे परमात्मा निदर्शक ‘राम’हे नाव मात्यापित्यांनी ठेवले.
रामांच्या पाचव्या वर्षी जमद्ग्नीमहर्षींनी योग्य मुहूर्त पाहून वासिष्ठादी ऋषिगणांच्या उपस्थितीत उपनयन संस्कार केला व त्यांना ब्रह्मोपदेश दिला. रामानेही पित्याजवळ वेदशास्त्रे शिकण्यास प्रारंभ करून अल्पावधीतच आपल्या अग्रजाएवढी प्रगती केली. वयाच्या द्वादशवर्षापर्यंत राम सर्वविद्याविशारद झाले. या वयात रुपसंपन्न राम अग्नीप्रमाणे तेजस्वी, सागराप्रमाणे गंभीर व पृथ्वीप्रमाणे क्षमाशील भासत. त्यानंतर त्यांनी विद्यादात्या विघ्नेश्वराला प्रसन्न करून घेतले. तेव्हा ‘तू साक्षात विष्णू आहेस हे मला ज्ञात आहे, तुझी जी वांच्छा असेल ती मी आनंदाने पूर्ण करीन असे श्री गणेशांनी सांगितले. त्यानुसार दिव्य परशूच्या विद्येची इच्छा करताच संतुष्ट झालेल्या गणनायकाने रामांना प्रथम आपले आत्मस्वरूप दिले. आणि खऱ्या योगे शत्रुनाश होईल अशा परशुविद्येचे रहस्य विषद करून सांगितले. अशा रीतीने परशुची प्राप्ती आणि परशुविद्या ज्ञात झालेले भृगुकुलोत्त्पन्न भार्गवराम तेव्हापासून परशुराम म्हणून ओळखले जावू लागले.
उपनयन संस्कारानंतर राम शालग्राम पर्वतावर तपस्येसाठी गेले असताना त्यांना ब्रह्मर्षी कश्यपांचे दर्शन झाले. कश्यपांनी प्रसन्न होऊन रामांना मंत्रदीक्षा दिली. त्या उपासनेचा स्वाध्याय वाढवून राम लवकरच जितेंद्रिय व यतवाक् झाले. यतवाक् म्हणजे त्यांनी वाग्देवीवर प्रभुत्व मिळवले. मुद्देसूद व प्रभावी संभाषण तद्वतच अत्यंत कमी शब्दात आशय व्यक्त करण्याचे त्यांचे कौशल्य यामध्ये दिसून येते. तद्वतच राम कैलासगिरीवर तपस्येसाठी गेले असताना तेथे पंचाग्नी प्रज्वलित करून त्यांनी श्री शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांनी रामांना प्रेमाने आलिंगन दिले आणि रत्नजडीत दिव्य धनुष्य रामाचे हाती देवून धनुर्विद्या शिकविली. त्यानंतर पुनश्चः तपस्येसाठी आणि शस्त्राविद्येतील रहस्ये प्राप्त व्हावी म्हणून रामांनी कैलासावर शिवाराधना सुरु केली असता ‘ तू आपली घोर तपस्या सुरु ठेव, त्यानंतर पृथ्वी परिक्रमा करून ये, सर्व तीर्थांवर जावून स्नान करून पवित्र देह प्राप्त करून परत ये, नंतरच मी तुला अस्त्रे देईन ‘ असे सांगितले. त्यानुसार सर्व कर्मे करून राम परतले व परत तपस्येला प्रारंभ केला. रामामध्ये आता अस्त्रे धारण करण्याची योग्यता आली आहे हे पटताच श्री शंकरांनी प्रगट होऊन ‘ हे भार्गव, अस्त्रांच्या धारणेसाठी तू एकमेव शक्तिमान आहेस. तुझे अनुपम धैर्य आणि सात्त्विक भाव पाहता तुझ्यावर प्रसन्न होऊन मी सारे अस्त्रग्राम तुला प्रदान करीत आहे. तू प्राप्त केलेला परशू लक्ष्यावर फेकला असता यापुढे तो परत तुझ्या हातात येईल.’ असे सांगितले.
अशा रितीने भार्गवरामांचे बालपण, शिक्षण व विविध शस्त्र – अस्त्रविद्या पारंगतता आल्याने विशेषतः परशू धारण करण्यासाठी एकमेव अशी योग्यता प्राप्त केल्याने त्यांचे ‘परशुराम’ हेच नाव प्रचलित झाले.
।। जय जय भृगुवीर समर्थ ।।
आभार: रामयशोगाथा