संपादकीय
अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतर झाकोनि असावे
प्रकटोनि नासावे, बरे नव्हें ||
समर्थ श्री रामदास स्वामी
महाराष्ट्राची संत परंपरा थोर आहे. संतांच्या शिकवणीने जीवन जगणे सुसह्य होते. सद् विचार आणि सदाचारामुळे मनुष्यजन्म सार्थकी लागतो. सुमारे सातव्या शतकापासून या हिंदुराष्ट्राचे वारंवार लचके तोडणा-या तत्कालीन शत्रुमुळे प्रजा पिडीत झाली होती, पार पिचून गेली होती. गांजलेली मनं आणि रिकामी पोटं हा कांही तत्वज्ञान शिकवण्याचा प्रांत नव्हें. तरीही तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलींनी ती किमया साध्य करून दाखवली आणि त्याच परंपरेतून आपला स्वतंत्र बाणा दाखवित समर्थ श्री रामदास स्वामींनी जनमानसाला धीर दिला, बळ दिलं, निर्भय बनवलं.
स्वतःचा प्रपंच दूर सारून सा-या समाजाचा प्रपंच करताना रामदास स्वामी सहस्त्रयोजने पायी फिरले. जे आपणासी ठावे, ते इतरांसी शिकवावे | शहाणे करून सोडावे, सकळजन || यासारखी स्वरचित वचनं ते स्वतः जगले आणि सामान्यजनांना जगायला शिकवले. माणसामाणसांची मन त्यांनी जाणली आणि अंतर्मुख होऊन त्यांना नवा दृष्टीकोन दिला आणि म्हणूनच ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे’ यासारखे संदेश ते सहजपणे देऊन गेले.
आज लोकशाहीच्या नावांखाली ठोकशाही अंगीकारून स्वतःकडे अमर्याद स्वातंत्र घेऊन अन्यांची गळचेपी करणारे महाभाग ढिगाने मिळतात.स्वातंत्र्याच्या नांवाने स्वैराचारच अधिक फोफावलाय. भ्रष्ट राजकीय नेते, सत्ता व संपत्तीचा माज चढलेले पुढारी, तर्कट समाजवादी मंडळी, बुद्धीभेद करणारे तथाकथित पत्रकार आणि स्वतःला स्वयंभू समजणारे लेखक यांना जणू ऊत आलाय. बेगुमान वक्तव्ये करून आपलंच म्हणणं लोकांच्या माथी मारणं, इतिहासाची मोडतोड करून आणि घटनांचा चुकीचा अन्वयार्थ लावून नवा विकृत व समाजघातक विचार प्रसृत करणं हा समाजकंटकांचा जणू धंदा झालाय. विषय नीट समजून न घेता आपल्याच दिग्गज पूर्वसुरींवर टिका करणे हि केवळ विकृतीच नव्हें तर हिंदुधार्मियांना/ अधर्मियांना लागलेली कीड आहे. परक्या शक्तींची भलामण करून मोठेपणा मिळवण्यात अनेकांना धन्यता वाटते. लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ पोखरून काढणारे आणि पत्रकारितेचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणारे हे सारे लोकशाहीचा गळा घोटणारे गुंडपुंड आहेत. यांना वेळोवेळी प्रत्युत्तर देणं, आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य आहे;
म्हातारी मेल्याचं दुखः नाही, काळ सोकावातोय, निर्भय बना, सामना करा!