सावध ऐका, पुढल्या हांका………………
शिक्षण म्हणजे नेमकं काय? पदव्या सगळेच मिळवतात. कोणि शिक्षणसम्राट तर कोणि शिक्षणमहर्षि बनून शिक्षणाचे कारखाने काढतात. बालवाडी असो वा पी. एच. डी. क्लासचा धंदा तर सुगीचा झालाय. बी एड्च्या फॅक्टरीज निघाल्याने शिक्षक हा गुरु न राहता, संस्थाचालकांचा निव्वळ पोटार्थी नोकर झालाय. पदवीसाठी मोजलेल्या दिडक्या दामदुपटीने वसूल करणारा एक सर्वसामान्य ‘ टिचर’!
निर्लज्ज सत्ताधा-यांनी तर ‘शिक्षणाच्या………….!’ करून टाकलाय. आदर्श विद्यार्थ्याबरोबरच सुजाण नागरिक बनविण्याचा वसा ज्यांनी घ्यायचा ते तथाकथित समाजसेवक सत्ताधा-यांच्या टोळीत सहज सामील होतात आणि सगळी खायची खाती वाटप झाल्यानंतर मेहेरबानीचं शिक्षणखातं एखाद्या टोणग्या नेत्याच्या गळ्यात बांधायचे विधिनिषेधशून्य उद्योग करतात.
वाईट वाटतं ते विद्यमान आणि भावी पिढीचं. ज्यांचं सोन्यासारखं आयुष्य समाजोन्नतीबरोबरच राष्ट्रोन्नतीसाठी वेचलं जायला हंवं त्या कोवळ्या पिढीसमोर आहेत ते अनादर्श. मान्य आहे की आजही ‘आचार्य देवो भव’ या योग्यतेचे शिक्षक, गुरु, सज्जन समाजात आहेत पण विद्यावानाला विचारतो कोण? त्यांचा अधूनमधून सन्मान करताना अमुक भूषण, तमुक पदक वा पद्म पुरस्काराची घोषणा करून हे सत्ताधारी स्वतःचाच गौरव करून घेतात.
मग या आपल्या बाल आणि तरुण पिढीनं नेमकं काय करावं? कुणा कडून शिकावं? त्यांची स्वप्न साकार करायची की उधळून द्यायची? या सगळ्याच बाबींचा वीट आल्याने माणूस झपाट्याने स्वार्थी होत चाललाय. तरुण पिढी मोकाट सुटतेच आहे, आणखीनच मोकाट होईल. खरं पाहता हा बाल, हा तरुण तल्लख आहे, चौकस आहे, बुद्धिमान आहे. स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याची क्षमता राखून आहे. त्याच्या याच गुणांचा वेळीच वापर व्हांयला हंवा. त्यांना बिथरवू नका, डिवचू नका, गृहीत तर बिलकुल धरू नका.
त्यांचा सन्मान करा, त्यांना प्रेम द्या, विश्वास द्या आणि विश्वास ठेवा त्यांचा पुकार वेगळा आहे, तो वेळीच ओळखा!
त्यांचं म्हणणं समजून घ्या आणि त्यांना समाजावून सांगा!