पुरुषप्रयत्न, दैव व नियती – जानेवारी ते मार्च २०१०

पुरुषप्रयत्न, दैव व नियती

‘योगवासिष्ठ’ या अनमोल ग्रंथामध्ये यासंबंधी केलेले विवेचन आपल्या सर्वांनाच अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. ते जसेच्या तसे वाचकांसमोर ठेवीत आहोत.

प्रयत्न व दैव या संबंधाने पुष्कळ वादविवाद चालत असतात. कोणी प्रयत्न श्रेष्ठ म्हणतात, तर कोणी देवाला श्रेष्ठत्व देतात. योगवासिष्ठात यासंबंधी फार विस्तृत विवेचन आले आहे.

न किंचन महाबुद्धे तदस्तीह जगत्राये | यदनुव्देगिना नाम पौरुषेण न लभ्यते || नि.उ. १५७-२८ ||

‘हे महाप्राज्ञ रामा! उदास न होता सतत प्रयत्नशील राहणा-यास अप्राप्त्य असे या त्रिभुवनात कांहीही नाही.’

आपल्याला पौराणिक कथांमध्ये, इतिहासात व दैनंदिन व्यवहारातही असे आढळून येते की,कधीकधी योग्य दिशेने, नेटाने प्रयत्न करूनही अपयश प्राप्त होते. उद्योगाची दिशा, काळ, वेळ यापैकी कांही चुकले किंवा कंटाळून अर्ध्यावरच प्रयत्न सोडला तर यश न मिळणे हे समजण्यासारखे आहे. पण सर्व दृष्टीने योग्य प्रयत्न करूनही जेंव्हा यश मिळत नाही तेंव्हा ‘दैव’ ही अप्रतिहत मोठी शक्ती आहे, असे मानावे लागते. ‘दैवात नसेल तर कोणतीच गोष्ट होणार नाही.’ ‘सर्व काही दैवाधीन आहे तर प्रयत्न तरी कां करावे?’ ‘होणार असेल ते टळणार नाही.’ असे विचार प्रबळ होऊन ‘प्रयत्न दुबळा आहे व दैवच श्रेष्ठ आहे’ असे मानले जाते. परंतु ही भावना मनुष्याला कर्तृत्वहीन बनवते. तसे न होता प्रयत्नाचे श्रेष्टत्व सिद्ध करण्यासाठी वसिष्ठमहर्षींनी याविषयाची इतकी विस्तृत चर्चा केली आहे की, त्याला संस्कृत वाङमयात तोड नाही.

प्रयत्न आणि दैव यांचे ऐक्य

प्रयत्नांचे दोन प्रकार आहेत. एक प्राक्तन व दुसरे ऐहिक. प्राक्तन प्रयत्न म्हणजे स्वतःचे पूर्वजन्मातील फलोन्मुख झालेले संचित पुण्य व पापकर्म होय. अशा प्रयत्नाला दैव अथवा प्रारब्ध म्हणतात. याच्याशिवाय दैव म्हणून काही निराळे नाही. दैव म्हणजे काय? यासंबंधी वसिष्ठ म्हणतात –

पूर्वजन्मकृतं कर्म तद्दैवमिती कथ्यते | प्राक्तनं पौरुषं तद्वै दैवशब्देन कथ्यते ||

पूर्वजन्मीचा प्रयत्न म्हणजे “दैव”, कालचे पौरुष ते “दैव”. म्हणजे प्रयत्न हेच दैवाचे मुळ स्वरूप असल्याने दैव हे प्रयत्नापेक्षा वेगळे ठरत नाही. या जन्मात मनुष्याने नेटाने व सुबुद्धीने प्रयत्न केला असता पूर्वजन्मातील अनर्थकारक पौरुषाला (प्रयत्नाला) निष्प्रभ करता येते.
ऐहिक प्रयत्न म्हणजे आजच्या जन्मातील प्रयत्न. याचे शास्त्रीय व अशास्त्रीय असे दोन प्रकार मानले आहेत. त्यापैकी अशास्त्रीय प्रयत्न अनर्थाला कारण होतात व शास्त्रीय प्रयत्न अर्थकारक होतात. दोन एडके लढू लागले म्हणजे कधी एकाच जय होतो, तर कधी दुस-याचा जय होतो. प्राक्तन आणि ऐहिक प्रयत्न हे असे एकमेकांवर विजय मिळविण्यासाठी लढत असतात. त्यात जो बलवत्तर असतो, त्याचा जय होतो. अर्थात प्राक्तन कर्मे झालेली असल्याने ती आहेत त्यापेक्षा बलवत्तर होणे शक्य नाही. तेंव्हा शास्त्रानुसार या जन्मात नेटाने प्रयत्न करून पूर्वीच्या कुकर्मांना हतबल करता येते. मनुष्याने शास्त्रशुद्ध प्रयत्न केला असता त्याच्या ऐहिक, पारलौकिक व पारमार्थिक सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पण प्रयत्नाला फाटा देऊन जो केवळ दैवावर अवलंबून राहतो त्याला वरीलपैकी कोणतेच सुख प्राप्त होत नाही.
प्रयत्न इतका श्रेष्ठ आहे तर सर्व लोक प्रयत्नशील का राहत नाहीत? याचे उत्तर ‘आळस’ असल्याचे वसिष्ठ सांगतात.

आलस्यं यादी न भवेज्जगत्यनर्थः कोस्याव्दहुधनको बहुश्रुतो वा |
आलास्यादियमवनिः ससागरान्त संपूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च || २-५-३० ||

‘या जगात आळस नसता तर शेकडो अनर्थ उत्पन्न झाले नसते. आळस नसता तर प्रत्येक मनुष्य संपत्तिमान आणि विद्वान झाला असता. परंतु जगात आळस असल्यामुळे ही संपूर्ण पृथ्वी असंख्य नरपशू आणि निर्धन मनुष्य यांनी भरून गेली आहे.’
प्रयत्नाशिवाय दैव म्हणून कांही निराळे नाही. तरी देखील या जगात दैवाचा डांगोरा पिटला जातो. त्याविषयी वसिष्ठ म्हणतात -‘ एखादा मनुष्य पंडित होणार, असे जोतिषाने वर्तविले; आणि अद्ययन न करता तो मनुष्य विद्वान झाला, तर दैव म्हणून कांही आहे, त्याच्यात सर्व कांही करण्याचे सामर्थ्य आहे, असे मानता येईल. पण असे कोठे आढळत नाही. बरे, दैव म्हणून कांही निराळे आहे असे एकवेळ मानले तरीदेखील दैवात आहे की नाही हे सुद्धा प्रयत्नांच्या माध्यमानेच ठरणार! प्रयत्न न करता दैवाने कांही कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही.’
कधी अल्पशा प्रयत्नाने मनुष्याला कांही चांगल्या गोष्टी प्राप्त झालेल्या दिसतात, तर कधी मनुष्य सद्वर्तनाने वागत असताही त्याचे वाईट झालेले दिसते. म्हणून दैवाचे सर्वस्वी निराकरण करता येत नाही, ते कसे?

याचे उत्तर असे की, दैवगती हे तरी पूर्वजन्मीच्या शुभ व अशुभ प्रयत्नांचे फल आहे. त्यामुळे या जन्मीच्या प्रयत्नात प्राक्तन शुभ प्रयत्नांची भर पडून दुधात साखर पडल्यासारखे होते व वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता प्राक्तन अशुभ प्रयत्न हा बलवत्तर आहे, असे ठरते. तेंव्हा या पासून बोध घेऊन मनुष्याने आपल्या हातून सदैव शुभ प्रयत्नच होतील असे पाहावे.

नियती आणि प्रयत्न

नियती म्हणजे ईश्वरी संकल्प. ‘अमुक प्राण्याने अमुक त-हेने हालचाल करावी व तमुक रीतीने भोग्य विषय भोगावे.’ प्रत्येक प्राण्याचे भविष्य ही नियतीच ठरवीत असते. प्राण्यांचे अदृष्ट म्हणजे प्राक्तन कर्म आणि ईश्वरसंकल्परूप नियती ही दोघेही जगाच्या अंतापर्यंत निरनिराळी राहून एकमेकांना सहाय्यभूत होत असतात. मात्र अदृष्ट व नियती या दोन्ही सत्ता मनुष्यप्रयत्नाच्या स्वाधीन आहेत. कारण मनुष्य ज्याप्रमाणे प्रयत्न करतो, कर्मे करतो त्याप्रमाणे त्याचे अदृष्ट व नियती ठरत असते. त्यामुळे कल्याणाची इच्छा करणा-याने सदैव प्रयत्नशील रहावे.
या जगामध्ये जीवांना ज्या वस्तू प्राप्त करून घ्यावयाच्या असतील, त्या वस्तू त्यांना पौरुषप्रयत्नानेच साध्य व्हांव्यात. अशी नियती त्या जगन्नियंत्याने ठरविली आहे. त्यात फरक एवढाच की, कुणाला स्वप्रयत्नाने तर कुणाला दुस-याच्या प्रयत्नाने, कधी कधी दोन्ही प्रयत्नांच्या एकिकरणाने त्या वस्तू मिळाव्यात अशी परमेश्वरी व्यवस्था आहे. स्वप्रयत्नाने कांही मिळाले म्हणजे त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो आणि दुस-याच्या प्रयत्नाने मिळाले म्हणजे त्याला दैव म्हणतो. पण हे दैव म्हटले तरी त्याच्या मागे कोणाच तरी प्रयत्न हा असतोच. या जगात सर्व कांही प्रयत्नाने साध्य होत असते. राजेलोक झाले तरी त्यांनी प्रयत्नाने राज्ये संपादन केली होती. कोणी आयते राज्य आणून त्यांच्या स्वाधीन केले असे झाले नाही. म्हणून कोणाही मनुष्याने स्वस्थ न बसता प्रयत्नशील असावे असा योगवसिष्ठांचा उपदेश आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *