संपादकीय – सत् – असत्

संपादकीय
सत्-असत्

विचार, शोध व बोध यामुळे माणूस समृद्ध होत असतो. सततच्या आत्मचिंतनाने तो प्रगल्भ होत जातो. ज्ञान संचयाचा भार न वाटता तो अधिक विनम्र होत जातो. विवेकाच्या प्रक्रियेमधे तो नकळत शिरतो. योग्य-अयोग्य, भलं-बुरं, हित-अहित याची जाणिव याच माध्यमातून त्याला होऊ लागते. त्याचा आत्मविश्वास वाढू लागतो. मीपणाच्या नुसत्या भावनेपासुनही तो शतयोजने दूर राहतो. सर्वसामान्यपणे माणूस अनुकरणप्रिय असतो आणि ते सोपेही असते. अनुकरण म्हणजे स्वतः समजून घेण्याच्या श्रमांपासून पलायनवाद स्विकारणे, जबाबदारीपासून दूर राहणे. समस्येवर स्वतः समाधान शोधणे हाच खरा अनुभव असतो.

मानवी जीवन हे असंच अनाकलनीय, अगम्य आहे. या जीवनसागराच्या पृष्ठभागावर तरंगत राहिलं तर अंतरंगाची शक्ती कधी कळणारच नाही. मग आयुष्याचा प्रवास नुसताच संपतो. सत् वा असत् ओळखायचं तर त्या अंतरंगाचा शोध आणि वेध घ्यायला हवा. केवळ जे दिसतं, भासतं, अथवा ठसवलं जातं, ते सत् कधीच नसतं. सत् वर असत् चं आवरण असतं.ते तेवढं दूर करायला हवं. याचाच अर्थ सत् हे त्रिकालाबाधित आहे. ते सदैव प्रकाशदायी असतं. सत् हे कधी मोघम वा गोंधळात टाकणारं नसतं. आपणच आपल्या बौद्धिक पूर्व ग्रहांनी मानसिक धारणांनी, प्रासंगिक वा तात्पुरत्या लाभेछेने त्यात गोंधळ घालत असतो. आपलीच मते ग्राह्य मानून दुस-यावर लादत असतो. पुस्तकी माहिती, दर्पोक्तीयुक्त जमवलेली माहिती, स्वतःच्या ज्ञानाबद्दलच्या भ्रामक कल्पना यामुळे आपण सत्यावर पांघरून घालतो. संत महात्मे, योगीजन हे सत् चे अधिकारी असतात. त्यांच्या सत्संगाने जीवन कृतार्थ होते. मात्र स्वच्छ मनाने त्यांना ओळखायला हंवे, जाणायला हंवे आणि शरणही जायला हंवे. सत् ची प्रचीती तेंव्हाच येते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *