संपादकीय
ज्ञाना, ज्ञाना, अरे विवेका, किती दाविता प्रौढी |
न चले तुमचे कांही जेंव्हा स्वभाव मनुजा ओढी ||
मनुष्य स्वभावाचं एवढं चपलख वर्णन क्वचितच कुणी केलं असेल. ‘ वामन पंडितांचं’ असं नेमकं बोट ठेवणारं अवतरण मला पदोपदी आठवतं. त्याची कारणं प्रासंगिक, सामाजिक, वैयक्तिक आणि कोणतीही असतील, ती ज्याची त्यांनी शोधावीत. हा विषय वादाचाही असू शकेल. आपल्या म्हणण्याचं, वागण्याचं समर्थन तर जवळपास प्रत्येकजणच करतो. पण हे सगळ गृहीत धरून खंर तर या अवतरणाच्या मळाशी जायला हवं.
ज्ञान व ज्ञानी कशाला आणि कोणाला म्हणायचं याचा सुस्पष्ट विचार प्रत्येकानेच करावा. आयुष्यात कोणतीही कृती करताना विचार आधी आणि मग कृती असं घडायला हवं पण बऱ्याच अंशी नेमकं उलट घडतं. विचार व कृतीची सांगड अविचारानेच घातली जाते. इथेच विवेकाची कास धरायला हवी. विचारांच्या गलबल्यातून विवेकाचं अमृत पाझरायला हवं. बुद्धिमत्तेची जोड जेंव्हा त्याला मिळते तेंव्हाच ती कृती सरस ठरते.
‘शिक्षण म्हणजे तरी नेमकं काय? पदव्या सगळेच घेतात. पण सुशिक्षित किती असतात?
बुद्धीला जे सत्याकडे नेतं, वाचेला जे रसाळ बनवतं आणि स्वभावाला जे माणुसकीकडे नेतं तेच खरं शिक्षण.’ ( इति डॉ. शिवाजी भोसले )
मनुष्यस्वभाव म्हणजे तरी नेमकं काय ? मनाची हि विविध रूपं कशातून निर्माण झाली? मनाचा उलगडा करणारं किंबहुना त्याचा अधिकच गुंता करणारं बरंच काही लिहिलं, बोललं, आणि वाचलं जातं पण तरीही ते गवसत नाही हेही प्रत्येकजण जाणतो. परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले ‘मन हे अकराव इंद्रिय आहे’ असं म्हणातात. ते पांच ज्ञानेंद्रिय व पांच कर्मेंद्रिय यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगणे नलगे. खरं पाहतां ज्ञान आणि विवेकाच्या स्वच्छ प्रकाशानेच स्वभावदर्शनाचा आनंद घेता येईल आणि तो जाणीवपूर्वक मिळवायला हवा.
माधव घुले
ओक्टोबर ते डिसेंबर ०४