Editorial (October – December 2002) – संपादकीय

संपादकीय

आपल्या संघातर्फे प्रासंगिक अंक प्रसिद्ध होतात, पण संघानं एखादं त्रैमासिक सुरु करावं असं कार्यकारी मंडळानं ठरवलं. त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे चित्तवेध. आपल्या संघाचे विविध उपक्रम व इतर चित्तपावन संघाविषयी माहिती देणे एवढाच या मुख्यपत्राचा हेतू नसून या मुखापत्राद्वारे आम्हाला आपल्याशी संवाद साधायचा आहे. आपण चित्तपावन आहोत याचा आपल्याला सार्थ आभिमान आहे आणि हा अभिमान आपल्या तरुण पिढीनेही जागवावा असं आम्हाला वाटतं.परंतु या कार्यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य आम्हाला हवं आहे. चित्तवेधचा हा पहिला अंक आपल्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे.

आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक संदर्भात आपल्याला गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. विद्यासंपादन हे खर तर आपलं अधिष्टान. विद्येच्या बळावर शासकीय नोकऱ्यांमध्ये एकेकाळी आपलं वर्चस्व होत. पण त्याही क्षेत्रात आपली पीछेहाट झाली आहे. आता आपल्याला सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा मागण्याची पाळी आली आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून आपल्या समाजाने आपाली मानसिकता बदलणे आता क्रमप्राप्त झाले आहे. चित्त्वेधचा जन्म याच जाणिवेतून झाला. आता आपण सजग होऊ आणि प्राप्त परिस्थितीत आपलं वैशिष्ट्य जतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

आपल्या मुलांवर होणारे संस्कार हे मुलाची आई, आजी-आजोबा यांच्याकडूनच प्रामुख्याने होतात. पण आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये घरातील स्त्रीलाही नोकरी करावी लागते. त्यातच विभक्त कुटुंबपद्धतीचे पसरलेले लोण थोपवणे आता आपल्या आवाक्याच्या बाहेर झाले आहे. साहजिकच घरातील स्त्रीला तारेवरची कसरत करावी लागते. अशा स्त्रियांच्या काही समस्या चित्तवेधमध्ये हाताळण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आजकाल तरुण पिढीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. हाही एक चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर खास चित्तवेधमध्ये खास लेख प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच याबाबतीत दोघांमध्ये सामोपचार घडवून आणण्यासाठी चित्तवेधची मदत झाल्यास आम्हाला आनंदच होईल.

आपला समाज बहुतांशी नोकरदार आहे. साहजिकच निवृत्तीनंतर मिळणाऱ्या मिळकतीमधुन आपले उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने कसे घालवता येईल व त्यासाठी आपले पैसे कुठे गुंतवल्यास फायदा होईल याविषयी खास लेखमाला प्रसिद्ध करणार आहोत.

आपल्या आरोग्याबद्दल आपण आता जागृत झालो आहोत. नामांकित डॉक्टर्स चित्तवेधमधून आपल्या आरोग्यासाठी आपल्याला वेळोवेळी भेटतीलच.

चित्तवेध फक्त संघाचं मुखपत्र न राहता अखिल चित्तपावानांचं प्रतिबिंब म्हणून ओळखलं गेलं तर आम्हाला आनंद होईल.

आपणां सर्वाना चित्तवेध परिवार व चित्तपावन ब्राम्हण संघातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

माधव घुले
ऑक्टोबर – डिसेंबर – २००२

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *