संपादकीय
यत्नानुसारिणी लक्ष्मी किर्तीस्त्यागानुसारिणी
कर्मानुसारिणी बुद्धी विद्याभ्यासानुसारिणी ||
भावार्थ : प्रयत्नाने लक्ष्मी मिळते, त्यागाने कीर्ति वाढते
कर्माने ठरते बुद्धी, विद्याभ्यास जसा तशी ||
संस्कृत भाषेची श्रीमंती पाहून, वाचून, ऐकून मन थक्क होतं. अंतरंगात शिरता आलं तर त्यापरता अन्य आनंद नाही. ऋचा, श्लोक, सुभाषिते, स्तुती, स्तोत्र, अवतरणे यांच्या अलंकारिक शब्दरचनेचं श्रवणसुख मनोहारी आहे. एकेक वर्ण, शब्द, संधी, उच्चारताना स्वर, लय, ताल या साऱ्याचा नादमय आविष्कार तनामनाला रोमांचित करतो. भाषेची प्रगल्भता विलक्षण आहे आणि मोजक्या शब्दांत संपूर्ण आशय सांगण्याची हातोटी त्यामधे पुरेपूर आहे. उंच उसळणाऱ्या लाटा पलीकडच्या शांत, धीरगंभीर, सागराची अथांगता, गूढ तरीही प्रचंड कुतूहल वाटावं अशी खोली आणि अतुलनीय प्रतिभा असलेली ती एक अलौकिक, सर्वांगसुंदर भाषा आहे.
मनुष्याप्राण्यासाठी ज्ञानाची कवाडं सताड उघडी ठेवताना त्या जगन्निगंत्यानी सर्वाना समान संधी दिली आहे. पण तरीही मानवी जीवनात कर्म हेच प्रधान असल्याने त्यानुसार आचरण ठेवणाऱ्या कोणाही जीवाला तसे फळही मिळते. आपण जन्मलेल्या कुळाचा रास्त अभिमान प्रत्येकाला हंवाच कारण तेच तर त्याचं संचित आहे, तीच त्याची ताकद आहे. दुसऱ्यांना केवळ उपदेश करण्यापेक्षा आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवून कौशल्यानं केलेलं कर्म हेच मानवांच जीवितकार्य आहे, असावं!
माधव घुले