Editorial (July – September 2005) संपादकीय

संपादकीय

‘ज्ञान हे महत्वाच साधन खंर; पण त्याचा वयाशी कांहीही संबंध नाही. वय आपोआप वाढत, ज्ञान वाढायला मात्र प्रयत्न करावा लागतो.वाढत्या वयाबरोबर माणसाला अधिकाधिक ज्ञान प्राप्त व्हायला हवं, पण हे नेहमीच घडतं असं नाही. वृद्ध मनुष्य आदरणीय आहे हे मान्य, पण हे वृद्धत्व शारीरिक नव्हे तर बौद्धिक असायला हवं.

वाढत्या वयाबरोबर माणसाचे केस पिकतात पण त्यामुळे त्याला वृद्धत्व येत नाही. ते वाढत्या बुद्धीने येत. जो वयाने लहान आहे पण ज्ञानी आहे त्याला देव खरा वृद्ध मानतात, कारण त्याच्यात बुद्धीचं वृद्धत्व आहे – वयाचं नसलं तरी!
मोठ्या वयाबद्दल आदर दाखवायचा ते तेवढी बौद्धिक लायकी असेल तर! अन्यथा हा आदर दाखवण्याच कारण नाही, आणि नुसत्या वायोवृधाला तो मागण्याचा अधिकारही नाही.

उपरोक्त विचारधन एका अनामिकेच्या ग्रंथसंपदेतील असून ते सुमारे गेल्या साताकातील आहे. समाजात कांही विचारवंत असे असतात की जे काल आणि आजच्या सामिक्षेबरोबरच उद्याचाही विचार विशेषत्वाने करतात. प्रत्येक मागच्या पिढीला पुढच्या पिढीबद्दल फारशा आशा असतातच असं नाही. त्यांचं काय आणि कसं होणार याच्या चिंतेमध्ये ते असतात.

पण काळ मात्र सतत बदलत असतो, प्रवाही जळाप्रमाणे पुढे जात राहतो. सतत नाविन्याचा, बदलाचा, प्रगतीचा ध्यास तो घेत असतो. एकविसाव्या शतकातील मानवी प्रगती थक्क करणारी आहे. अशाश्वतता हा आजचा मंत्र आहे असं वाटावं इतका बदल सतत आणि वेगाने होतो आहे. पण बदल म्हणजे प्रगती असं वाटून घेताना माणूस स्वतःची फसवणूक करून घेतोय. वास्तवाच भान त्यानी ठेवायला हवंय.

तरीही नव्या उदयोन्मुख पिढीला समजून ध्यायला हवं, त्यांचेशी वारंवार संवाद साधायला हवां, त्यांच्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन द्यायला हवं, त्यांचेशी मैतर करून घ्यायला हवं. वाहत्या पाण्यासमोर अडथळा करू नये, त्यांच्या खळाळामध्ये सामील होण जमत नसेल तर त्यांना वाहत राहण्याचा आशीर्वाद खुल्या आणि मोठ्या मनानं द्यावा. हा ‘युवोन्मेषच ‘ आपला खरा तारणहार आहे.

माधव घुले
जुलै ते सप्टेंबर २००५

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *