संपादकीय
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् |
ततपदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवेनमः ||
विश्वाच्या या भव्य पसाऱ्यामध्ये, चार आणि अचरामध्ये व्याप्त अशा गुरुचरणाशी लीन होत या जगद्गुरूंना मी वंदन करतो.
आषाढ पौर्णिमेचा, व्यासपुजनाचा गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा हा महामंगल दिवस. हिंदुधर्मामध्ये असे उत्कट, मांगल्याचे अनेक क्षण, प्रसंग, दिवस वर्णन केलेले आहेत, जे मानवी जीवन सुसंपन्न, सदाचारी व सात्विक होण्यास कारणीभूत झाले आहेत. गुरुपूजन हा असाच एक अत्यंत महत्वाचा किंबहुना सर्वाधिक महत्वाचा मंगल दिवस. हा योग यंदा २ जुलै रोजी आला आहे.
ईश्वरप्राप्ती व्हांवी, आयुष्य सुखकर, आनंदी व्हावं असं सर्वांनाच वाटत असतं पण त्यासाठी यम, नियमांचं काटेकोर पालन करणं बहुदा कोणालाच शक्य होत नाही. इथं गुरुंचं महत्व फार मोठं आहे,
संतश्रेष्ठ कबीर म्हणतात,
गुरु गोविंद दोहु खडे, कोहु लागे पैर !
समोर गुरुवर्य तर आहेतच पण साक्षात ईश्वरही प्रकट झालेत मग कोणाला आधी शरण जाऊ? पण याची उकलही कबीराच करताना म्हणतात,’ ईश्वरप्राप्ती हवी तर गुरुंना मनोभावे शरण जावं, तेच तुमचा मार्ग सुकर करतील. ‘
सर्वाधिक प्रगत अशा मानवी जीवनाला योग्य आकार द्यायचा, मानवांच अमानावात रुपांतर करायचं तर योग्य गुरुंचं मार्गदर्शन हवं.
‘गुरुविना गती नाही, गुरुविना मती नाही’ हे सर्वार्थांनी खरच आहे, यातील गमतीचा भाग म्हणजे, चित्तपावनांचा कोणी गुरु नाही असं म्हणतात. हे कितपत खर आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. तूर्तास आपण आपल्या ज्ञातीचं कुलदैवत ‘भगवान श्री परशुराम’ यांना गुरुस्थानी ठेवून मार्गक्रमण करुया. आपल हित त्यातच आहे, नाही कां?
माधव घुले
जुलै ते सप्टेंबर – २००४