संपादकीय…..
ज्ञानाग्नीने अशी जयाची कर्मे जाळून जाती
सुजाण नर ते त्या पुरुषा ते ‘पंडित’ऐसे म्हणती||
स्वामी स्वरूपानंद
परम पूजनीय स्वामींची ‘भावार्थ गीता’ ‘रोज एकतरी ओवी अनुभवावी’ या तोडीची आहे. सुबोध मराठी भाषेमध्ये स्वामींनी ती अधिकच देखणी करून मांडली आहे.
उपरोक्त ओवितीलच नव्हे तर संपूर्ण पुस्तिकेतील शब्दरचना इतकी अचूक आहे कि ‘यापरते दुसरे नाही’ असेच म्हणावेसे वाटते. आजकाल ज्ञान व माहिती यामध्ये गल्लत केली गाते. माहिती मिळवून पदवी वा तत्सम बिरूदांचा तिळा लावता येतो पण ज्ञान तर त्याच्याही पुढे दशांगुळे उरून राहते.माहितीला स्थैर्य नसते, तिच्यामध्ये नेमकेपणा नसतो, ती शब्दबंबाळ असते, गैरसमजाला, गोंधळाला तिथे भरपूर वाव असतो. अर्थापेक्षा अनर्थाला ती अधिक वाव देणारी असते आणि सत्यापासून तर ती दूरही असू शकते.
ज्ञान मुळातच भक्कम पायावर उभं असतं. पण, परंतुला तिथे स्थानंच नसतं.ते निरंतन प्रकाशमय असतं. जणु ते अग्नीतून तावून सुलाखून निघालेलं असतं आणि म्हणूनच ते शुद्ध स्वरूपात म्हणजेच शंभर नंबरी असतं. ज्ञानाचं तेज विलक्षण असतं. जेवढं अधिक मिळवावं तेवढं ते विनम्रता आणतं. ‘ज्ञ’ म्हणजे जाणणारा. आपापल्या क्षेत्रातील ज्ञानी माणसं ही ज्ञानसंपादनात संपूर्ण रममाण होतात. या जाणून घेण्याच्या प्रक्रियेतूनच त्याचा प्रवास जाणकाराकडून तज्ज्ञाच्या पातळीवर जाऊन पोहोचतो. याच ‘ज्ञ’ला ‘त’ची जोड मिळुन तत्+ज्ञ होऊन त्या त्या विषयातील अंतिम ज्ञानाचा जणु तो कर्ता होतो. त्याला गुरुपद प्राप्त होते.
‘स्व’च्या माध्यमातून समष्टीच्या विकासार्थ जीवन व्यतीत करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. ज्ञानाच्या उपासनेमुळेच अहंकाराचा नाश होतो आणि माणसाचं माणूसपण देवत्वाच्या दिशेनं दमदार वाटचाल करू लागतं.