Editorial (January – March 2006) संपादकीय

संपादकीय

संघटना आणि कार्यकर्ता

‘नकाशा फक्त दिशा आणि मार्ग दाखवतो. नकाशातील इमारतीत राहता येत नसत; एवढं वैगुण्य कोणत्याही नकाशात असतं. वास्तव्य करायचं तर नकाशाबरहुकूम ती वास्तू ज्याची त्यानं उभारून घ्यायची असते.’

‘पळून गेलं की सगळ्या धोक्यातून सुटका होते असं थोडंच आहे? धोक्यामुळे तर दहाजण एकत्र येतात आणि एकत्र राहू लागतात. एकत्र राहण्यासाठी धाक लागतोच; बाहेरचा नसला तरी घरातला; घरातला नसला तर मनातला.’

‘निंदा, टीका ही मोफत मिळणारी गोष्ट होय; त्याकडे दुर्लक्ष करू नये.’

‘काम करण्यापासून कदाचित नेहमीच आनंद मिळणार नाही पण काम न करता निर्भेळ आनंद मात्र कधीच प्राप्त होणार नाही’

उपरोक्त उद्धृत केलेली वचनं, माझे मते कोणत्याही संघटनेला आणि तिच्या कार्यकर्त्यांना लागू पडतात. संघटनेचं बीज कार्यकर्त्यांच्या मनात असेल तर तो त्या संघाचा तहहयात ‘पालक’ होऊ शकतो. पालक हि संज्ञा एवढ्यासाठीच की कोणतंही पद त्याला कधीही आकर्षित करीत नाही.
कुटुंबप्रमुख आणि संघटनाप्रमुख यामध्ये खूप साम्य आहे. इथे ‘प्रमुख’ हि संज्ञा ‘कार्यकर्ता’ या अर्थाने घ्यायला हंवी. कुटुंबाच्या वा संघटनेच्या भल्यासाठी कायमच खस्ता खाऊन, कष्टाचे डोंगर पार करून, निरलस आणि नेहमी समाधानी वृत्तीने राहून कुटुंब वा संघटना जपणारा हा कार्यकर्ता माझा आदर्श आहे, मला वंदनीय आहे.

आपल्या संघाच्या या रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये आपण साऱ्यांनी आपली संघटना मोठी व आदर्श करण्याचा संकल्प करुया!

माधव घुले
जानेवारी ते मार्च – २००६

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *