संपादकीय
माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचे प्रमाण सारखेच असते, पण दुर्दैवाने तो दुःखाचा बाऊ अधिक करतो, त्याबद्दल अधिक नाराजी, असमाधान दाखवतो. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख ही तर जीवनरहाटीच आहे.दोन्ही अवस्था सारख्याच. त्याची तीव्रता कमी अधिक असते इतकंच. त्यासाठी आपली वृत्ती अधिक डोळस हवी.
निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. झाडांचच पाहा नां! पानझडी आली म्हणून ते काही हतबल होत नाही, वा कोमेजून, वठूनही जात नाही, तर वसंत ऋतूंचं स्वागत मोठ्या उत्साहाने करायला सिद्ध होत. पानाफुलांनी आणि फळांनी हळूहळू बहरून जात.
स्वतः तापत राहत, पण वाटसरूला सावली देतं. माणसाकडून तर कुऱ्हाडीचे घाव सोसुनही उदार अंतःकरणाने त्याला स्वतःचं सारं कांही देऊ करतं. आपल्या वाट्याला दुःख येऊनही दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी आपलं उभं आयुष्य वेचायचं याची केवढी थोर शिकवण आपण त्याचेकडून घ्यायला हंवी?
कुटुंबजीवनाचा आदर्श असणारे आपण सारे परंपरावादी नेमके याच बाबींना दुरावत चाललोय याचा प्रत्येकानं अंतर्मुख होऊन विचार करायला हंवा. क्षणिक सुखासाठी चिरकाल आनंदाला दूर सारणं हे कांही सुशिक्षित, सुसंस्कारित माणसाचं लक्षण नाही. आपण चित्तपावन चांगल्या कामात आघाडीवर असतो. यापुढेही राहू!
माधव घुले
एप्रिल ते जून २००६