संपादकीय
‘दान देणे ते गुप्तपणे; आल्या अतिथीचा सन्मान करणे, कोणाचे प्रिय अथवा उपकार केले तर त्याचा चारचौघात उल्लेख न करणे; संपत्तीचा गर्व न करणे; दुसऱ्याविषयी टवाळ्या न करणे इत्यादि हे असे तलवारीच्या धारेसारखे तीक्ष्ण व्रत थोरांना कोणी नेमून दिले? नेमून देण्यास ते काय सांगकामे आहेत? त्यांचा हा स्वभावच आहे.’
कविश्रेष्ठ राजा भर्तृहरि रचित ‘शतकत्रयी’ या काव्यसंग्रहातील ‘नीतिशतक’ या विभागात अनेक उत्कृष्ट काव्यपंक्ती व अवतरणे आहेत. नितिमत्तेविषयी चाड असणाऱ्या प्रत्येकाने या शतकत्रयीचं पारायण करायला हवं एवढी याची महती आहे.
उपरोक्त उद्घ्रुत केलेल्या पंक्ती म्हणजे ‘वामन’ पंडितांनी केलेली टीका आहे. वामन पंडितांची एकेक छंदबद्ध अवतरण वाचली आपण मराठी भाषिक आहोत आचा अभिमान अधिक दृढ होतो. असो!
‘थोरामोठ्यांना हे व्रत कोणी नेमून दिले, नेमून द्यायला ते काही सांगकामे नव्हेत, त्यांचा तो स्वभावच आहे.’ केवढा मोठा आदर्शवाद यात भरलाय पहा! साध्याच युग कलियुग आहे असं म्हणतात.आणि कलियुगातील मानवी स्वभावाचं जवळपास तंतोतंत वर्णन हजारो वर्षापूर्वी आपल्या दृष्ट्या ऋषींनी वेदांच्या ऋचांमध्ये छंदबद्ध करून ठेवलंय. या वर्णनाचा कांही भाग ‘रामयशोगाथा’ या संकलनग्रंथामध्ये नमूद केलेला असून तो वाचनीय आहे, स्मितित करणारा आहे. पण तरीही या कलियुगात अशी थोर माणसं आहेत.
आपल्या अवतीभवती ती वावरत असतात. त्यांच फार मोठ ऋण या समाजावर आहे. अशा थोरामोठ्यांमुळेच समाजाचा तोल कायम राहतो असं मला प्रामाणिकपणे वाटत. आदर्शवादाची नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा स्वतःच आदर्श होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, नाही का? पुरस्कार प्राप्त होण आणि तो मिळवण यातला फरक सुज्ञ जाणतात.
समाजासमोर आदर्श दिसण आणि असण आवश्यक आहे हे तर खरंच आणि कांही पुरस्कारांचं व त्या प्राप्त व्यक्तींचं थोरपण निर्विवाद फार मोठ व आदर्श आहे हेही खरंच. पण वेगवेगळ्या नावांनी सरसकट दिले जाणारे पुरस्कार आणि भव्य स्वरूपात होणारे सन्मान पाहिले कि वाटत खरच कां एवढे आदर्श समाजात आहेत? कि आपलं नावं मोठ करून दाखवण हासुद्धा अलीकडच्या मार्केटिंग तंत्राचाच एक भाग आहे?
आपण चित्तपावन ब्राम्हण आहोत. आपल्या कुळाचा, ज्ञातीचा आणि हिंदुत्वाचा रास्त अभिमान बाळगण आणि आदर्श आचरण ठेवण हे आपलं आद्य कर्तव्य आहे, तो आपला स्वभावच व्हायला हवा.
माधव घुले
एप्रिल ते जून – २००५