संपादकीय
ध्येय असावे सुदूर कि जे कधी न हाती यावे |
जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे ||
प. पू. स्वामी स्वरूपानंद यांचे हे बोल म्हणजे साक्षात अमृतवाणीच होय. असं कांही ऐकलं, वाचलं, कि जीवनाचा अर्थ उलगडून पाहण्याकडे मन आकृष्ट होतें. मनुष्यजन्म हीच मुळी उन्नतीची वरची पायरी आहे. भगवंतांनी प्रदान केलेलं हे सुंदर जीवन अधिक सुंदर बनवायचं असेल तर अशा उंचीवरच्या ध्येयाप्रत स्वतःला न्यावं. ध्येय निश्चित करून प्रामाणिकपणे त्याची कास धरावी, सर्वस्व ओतून ते साध्य करण्यासाठी अविरत कष्ट घ्यावे, तेंव्हाच त्याच्या प्रकाशात आपण मार्गक्रमण करू शकतो. मानवाच्या प्रगतीचं लक्षण स्वामीजींनी कसं अचूक शब्दांत मांडलंय.
आपण प्रत्येक चित्तपावन व्यक्तींनी, व्यक्तीशः तसेच संघटितपणे परस्परांतील हेवेदावे मागे सारून स्वतःबरोबरच आपल्या ज्ञातीबांधवांना एका उच्च ध्येयाप्रत नेण्याची वेळ आली आहे. वेळीच स्वतःला सावरायला हंव. ज्ञात असा केवळ तीनशे वर्षाचा इतिहास असलेली ही ज्ञाती विविध क्षेत्रात शिरकाव करून आपली ओळख पटवून देते आहे. चित्तपावन ज्ञातानी त्या त्या काळात गुरु शोधत न बसता आपले मुळ पुरुष भगवान परशुराम यांनांच सतत गुरुस्थानी मानलं आणि तीच प्रेरणा त्यांच्या प्रगतीला प्रेरक ठरली. समाजाचं नेतृत्व करण्याची ताकद असलेली आपली ज्ञाती आता स्वच्याही पुढे जाऊन संधटीतपणे काम करू लागेल तो सुदिन म्हणायचा.
अर्थात ही जबाबदारी कांही एकट्या दुकट्याची व एखाद दुसऱ्या संधाची नाही. आमचे माहितीप्रमाणे महाराष्ट्रात तसेच बाहेरच्या रायात आणि निरनिराळ्या संकेतस्थळांवर अवतरलेले असे किमान ४२ संघ आहेत.
आपलं डोंबिवली शहर तर अनेक बाबतीत अग्रेसर ठरतंय. संघटितपणे कार्य उभारण्याचा आदर्श वस्तुपाठ घालून द्यायचं तर आतापासूनच आपण कटिबद्ध होऊया. आनंदाची बाब म्हणजे तरुण कार्यकर्त्यांची छोटी फौज आपल्या संघाला येउन मिळाली आहे. त्यांना बरोबर घेऊन सर्वांनीच स्वामीजींनी दाखविलेल्या प्रकाशात वाटचाल करुया. अस्तु!
माधव घुले
एप्रिल ते जून – २००४