अधिकार आणि कर्तव्ये – संपादकीय – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३

सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वाधिक प्रगत जीव कोणता याचे साधे उत्तर मानव हे होय यामध्ये दुमत असू नये. मग असं असताना जगननियात्याचे हे वरदान ओळखून त्याचे ऋण व्यक्त करणे आणि सकल प्राणिमात्रांमध्ये सलोखा राहिल याची जबाबदारी स्वत:हून पत्करणे हे त्याचे परम कर्तव्य ठरते. किंबुहना अशा प्रत्येक व्यक्तीमात्रेने ही परंपरा पाळली जाईल असे कटाक्षाने पाहणे हाही त्याच कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे असे समजावे. असे मूल्याधिष्ठित जीवन जगणे हे प्रगत माणसाचे प्रधान लक्षण मानले जायला हवे. अशी कर्तव्ये पार पाडत असताना ती स्वत: अंगीकारणे , याचबरोबर इतरांकडूनही ती पाळली जात आहेत यावरही कटाक्ष ठेवणे हे ओघाने आलेच. यासाठीच प्रत्येकाचा आचार विचार महत्त्वाचा. ‘ बोले तैसा चाले’ जसे मह्त्त्वाचे तसे ‘ आधी केले मग सांगितले’ ह्यावर भर असायला हवा. म्हणजेच समोरच्याने काय करावे याचे धडे देण्यापेक्षा स्वत:च्या वागण्याचा वस्तुपाठच घालून घ्यायला हवा हीच त्या व्यक्तीमात्रेची ओळख असावी.

 
पण प्राय: असे घडताना दिसत नाही. शिक्षणाने माणूस साक्षर होण्याबरोबरच संस्कारित व्हायला हवा, त्याची वैचारिक क्षमता वाढायला हवी, त्याचे मध्ये अनुभव समृद्धी यावी, प्रत्येक वैचारिक टप्प्यावर त्याने अधिक प्रगल्भ व्हावे अशा सुदृढ विचारांना विवेकाची जोड असायला हवी. त्यातील नीरक्षीरविवेक जाणायला हवा. अशानेच त्याची कृतीप्रवणता वाढीला लागेल. आपली कर्तव्ये जाणून त्याबरहुकूम कृती करताना त्याला असा प्रगत मानव असण्याचा अभिमान वाटेल.

 
पण लक्षात कोण घेतो? कर्तव्याची जाणीव आणि त्यानुसार कृती झाली की अधिकार आपल्या वाटेनी चालत येतील. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरजच नाही. कारण अधिकार अहंकाराचे अपत्य आहे हे लक्षात घेतले तर अधिकाराची मागणी करणे कसे चुकीचे आहे हे कळून चुकेल.असे कोणतेही गैरकृत्य कर्तव्यात बसतच नाही मग अधिकाराचा बडगा कशासाठी?कर्तव्यामध्ये जेव्हा कसूर होते , त्याचं लंगड समर्थन केले जाते. तिथेच मीपणा डोकावतो आणि अधिकाराचा जन्म होतो. कर्तव्याच्या पायऱ्या चढून गेलं की अधिकाराची शिडी सहजपणे प्राप्त होते.

 
अधिकार मागण्यापेक्षा कर्तव्याचा अधिकारी होणे हे अधिक महत्त्वाचं . मान आदर मागावा लागत नाही तो आपल्या आचरणातून आपसूकच मिळतो.म्हणजेच आचरण शुद्ध असायला हवे तेव्हाच कर्तव्यांची यथायोग्य जाणीव होते. अशी कर्तव्यतत्परता आपल्या कुटुंबातून वा समाजातून काम करताना ठळकपणे दिसायला हवी. अशा प्रत्येक स्व ची प्रगती म्हणजेच समाजाची प्रगती आणि असा प्रगत समाज म्हणजेच बलशाली राष्ट्राची निर्मिती.

 
मग प्रश्न पडतो की मानवाधिकार आयोग आहे तर मानवी कर्तव्य आयोग का नाही ? असा आयोग नेमणाऱ्या आणि तो चालवणाऱ्या विचारवंताना (?) आपल्या कर्तव्यांचा विसर पडतो हेच खरे. आपण प्रत्येकानेच हा विचार प्रामाणिकपणे करून कर्तव्यपरायण होवू. इत्त्यलम!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *