संघाचा रौप्य महोत्सव

वेचक-वेधक
संघाचा रौप्य महोत्सव (आमची गद्धेपंचविशी ?)

समीर आठवले – कार्यकर्ता ‘युवोन्मेष’

दोन्ही विश्लेषणे एका समान आकड्यासाठी आणि ती म्हणजे २५. किती वेगळेपण आहे या दोन्ही शब्दांत! एखादा तरुण जेंव्हा २५ वर्षाचा होतो तेंव्हा त्याला गद्धे पंचविशीत आलास असं म्हणतात, पण जेंव्हा एखादी संघटना आपल्या पंचविशीत प्रवेश करते तेंव्हा त्याला रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणतात. (अर्थात इथे व्यक्ती आणि संघटना असा मुलभूत फरक आहे.)

खरंच किती कठीण आहे एखादी संघटना २५ वर्षे चालविणे! त्यातही एखाद्या ज्ञातीसाठी आणि तीसुद्धा चित्तपावनांसाठी! आज संघ २५व्या वर्षात पाऊल ठेवतोय. आजपर्यंत आणि विशेषतः गेल्या दहा वर्षात संघाने कितीतरी नवीन उपक्रम राबवत आपल्या ज्ञातीबांधवांसाठी खूप कांही केले. पण राहून राहून एक गोष्ट मनाला पटायला जड जाते आणि ती म्हणजे २००० च्या जवळपास सदस्य असणा-या संघाच्या कार्यक्रमांना २०० च्या आसपास उपस्थिती मिळणेही कठीण कां जाते? आमचे घुले काका नेहमी अभिमानाने सांगतात की आज आपण २००० कुटुंबांपर्यंत पोहोचलो. पण उपस्थितीचा विचार करता आपण अजून १० टक्के लोकांपर्यंतही पोहचू शकलो नाही. त्याचे प्रत्यंतर ‘युवोन्मेष’चे काम करताना लगेच आले. युवोन्मेषच्या पहिल्या स्नेहसंमेलनाला असलेली ६०-७० जणांची उपस्थिती पुढील कार्यक्रमांना ६-७ वर येऊन घसरली आणि पुन्हा १० टक्के ही संख्या खुणावत राहिली.
श्री. घुले काकांना विचाराव्या वाटणा-या प्रश्नांची उत्तरे अवघ्या दीड वर्षात मिळाली आणि काकांना किती प्रश्न पडले असतील २५ वर्षात, ह्या कल्पनेनेच अस्वस्थ झालं. तीच अस्वस्थता आज शब्दांत उतरतेय.

खरंच संघाचे आणि संघाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न कुठे कमी पडतात कि प्रयत्नच होत नाहीत याचा विचार सुरु झाला पण याची खरी उत्तर त्या ९० टक्के सदस्यांच्या मनात दडली आहेत. निदान ती देण्यासाठी तरी या सभासदांनी यापुढे संघात यावे असे वाटते. गेलेल्या २४ वर्षात कदाचित नसेल जमलं पण येणा-या पुढील वर्षात तरी हे घडवून आणायला हंवं.

२५ वयां वर्षात आपण निदान २५०० कुटुंबांपर्यंत तरी पोचायला हंवे. संघाच्या सर्व कार्यक्रमांना १०० टक्के उपस्थिती देऊन नवीन कार्यकारिणीला दमवून टाकायला हंवे. या दमण्यातच त्यांचा खरा आनंद लपलाय, तो त्यांना मिळवुन देऊया. जे स्वप्न संघासाठी काम करणा-या कांही जणांनी बघितले ते निदान रौप्यमहोत्सवी वर्षात तरी पुर्ण करुंया. हो! आमच्या मित्रांसाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ही संस्था आपली कुटुंबीय आहे. दोन हजार सभासदांची, स्वतःची वास्तू असलेली, ज्ञातीबांधवांना आपलंसं करणारी ही संस्था यापुढेही कार्यरत ठेवण्याची जबाबदारी आपण घेऊया! संस्थात्मक कार्याचा अनुभव मिळवण्याची एक चांगली संधी या जेष्ठांनी आपल्याला दिली आहे, त्यांचा आशीर्वाद घेऊन ही संस्था मोठी करुंया!

‘युवोन्मेष’ आणि ‘चित्तपावन’ संघातर्फे सर्व सभासदांना दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा संघाच्या सर्व कार्यक्रमांना १०० टक्के उपस्थितीची विनंती करतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *