व्यक्तिविशेष – कै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर

व्यक्तिविशेष
कै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर
सौ. अलका चितळे-जोगळेकर

चित्तपावन ब्राम्हणांनी स्वतःपुरते नव्हे तर समाजाचे नेतृत्व स्वीकारून आपल्या गांवच्या व पर्यायाने देशाच्या विकासाला यथाशक्ति हातभार लावण्याचा ‘उद्योग’ नेहमीच केला पाहिजे. प्रस्तुत लेखाचा उद्देश अशा थोर व्यक्तींचा परिचय करवून तरुण पिढीस प्रेरणा देण्याचा आहे. डोंबिवलीकरांना सुपरिचित आपल्याच शेजारच्या भिवंडी गांवातील कै. महादेव विष्णू जोगळेकर या आदर्श व्यक्तिमत्वाचा परिचय विशेषत्वाने देताना आम्हास आनंद होत आहे.

माधव घुले-संपादक

भिवंडी शहरात सुमारे ९५ वर्षापूर्वी ‘यंत्रयुगाची मुहूर्तमेढ’ रोवणारे व भिवंडीसारख्या छोट्या खेड्यात औद्योगिक क्रांती घडवून आणली ते कै. महादेव कृष्ण जोगळेकर. त्यांना ‘यंत्रयुगाचे यांत्रिक’ म्हटले तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. कर्तृत्वाने थोर तरीही राजकारणापासून दूर राहिलेल्या अण्णांचा जन्म दि. १ मे १८७१ साली भिवंडी येथेच झाला. त्यांचे शिक्षण भिवंडी, ठाणे व नंतर त्यांच्या मामांचे गांवी नागपूर येथे झाले. परंतु इंग्रज सरकारची नोकरी करायची नाही ही स्वातंत्र्यलढ्यातील देशप्रेमाची प्रेरणा लो. टिळक व इतर पुढा-यांकडून अनेक तरुणांनी घेतली होती त्यातील अण्णा हे एक तरुण. इंग्रजांची नोकरी न करता स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्याचा मानस होता आणि म्हणूनच घरचा शेतीचा व हाती तांदूळ सडण्याचा व्यवसाय त्यानंतरच्या काळात त्यांनी सुरु केला. इंग्रजी राजवटीत युरोपातील औद्योगिक क्रांती झाली व तेथून राईस मिल मशिनरी भारतात आली होती. यंत्राच्या सहाय्याने आपल्या तांदुळाच्या व्यवसायाला नवीन वळण द्यावे हा विचार अण्णा जोगळेकर यांच्या मनाने घेतला व सन १९१० साली जर्मन मशिनरी असलेली भिवंडी शहरातील पहिली भातगिरणी ब्राम्हण आलीत कै. अण्णांनी सुरु केली. ती राईस मिल आजतागायत श्री. बाळासाहेब जोगळेकर व त्यांचे पुत्र यशस्वीपणे आहे त्याच जागी चालवित आहेत.

खाडयांनी वेढलेले भिवंडी हे गांव एखाद्या बेटाप्रमाणेच होते. त्याकाळी दळणवळणाची साधने म्हणजे फक्त बैलगाडी. तेंव्हा अण्णांनी ४ मोटारगाड्या खरेदी करून भिवंडी ते कल्याणचा पूल व भिवंडी ते वाडा अशी बससेवा लोकांसाठी सुरु केली. तो काळ १९१८चा; लोक मोटारीला घाबरत ती त्यात बसायला सुरवातीला तयारही होत नसत. हळुहळु लोकांची भीती दूर झाली व अण्णांचा हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला. या उद्योगामुळे त्यांनी चालक, वाहक, मदतनीस अशा कामांकरिता समाजातील काहींना कामधंदा मिळवुन दिला. स्वतःचा राइस मिलचा उद्योग १९२० सालापर्यंत जोरात चालू असताना कै. अण्णांनी अनेक सामाजिक संस्थांना साधाल हाताने मदत केली. भिवंडीतील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे देऊन मदत केली. ब्राम्हण आळीतील गणपति मंदिर देवस्थान ही इमारत एका टोकाला होती. त्यामुळे मंदिराला २००/२०० फुट एवढी कुंपणाची भिंत कै. अण्णांनी स्वखर्चाने बांधून दिली. देशात स्वातंत्र्यचळवळीचे व राजकारणाचे वारे वाहत होते. काँग्रेस ही मोठी संस्था काम करत होती. भिवंडी गांवातसूद्धा त्याकाळी अनेक सामाजिक संस्था सुरु होत्या. अनेक सामाजिक चळवळी चालू होत्या. उघडपणे कार्य करणे कठीण होई, कारण इंग्रजांचे बारकाईने लक्ष असे. सर्व जाती धर्माच्या लोकाना सभांना एकर्ता आणणे आवश्यक होते. परंतु त्यासाठी गांवात छोटे सभागृह उपलब्ध नव्हते. ही अडचण अण्णांच्या लक्षात आली. सामाजिक कार्याची तळमळ त्यांना होतीच. त्यांनी गांवकीसाठी एक सभागृह स्वखर्चाने बांधून दिले. पण त्याच सुमारास म्हणजे १ ऑगस्टला लो. टिळकांचे निधन झाले. कै. अण्णा हे लो.टिळकांचे भक्त होते. त्यांच्या कार्यातूनच अण्णांनी प्रेरणा घेतली होती. म्हणूनच त्यांनी या वास्तूला लगेच ‘टिळक मंदिर’ असे नांव दिले. भिवंडीतील गांवकरी चांगले विचार ऐकण्यास, विचारांची देव-घेव करण्यास टिळक-मंदिरात येत असत. ही परंपरा आजतागायत म्हणजे गेली ९० वर्षे चालू राहिली आहे. १९१९ ते १९३० पर्यंत ही वास्तू कै. अण्णांच्याच ताब्यात होती. गांवात वाचानायन नव्हते. ही अडचण त्यांच्या लक्षात आली. तेंव्हा ‘वाचन मंदिर’ या संस्थेस वाचनालय चालवण्यासाठी टिळक मंदिराची जागा १९३० साली दिली व ही संस्था तेव्हापासून आजपर्यंत टिळक-मंदिर वास्तूची देखभाल उत्तम त-हेने करीत आहे. १९२७-२८ च्या सुमारास ‘सायमन कमिशन’ भारतात आले तेंव्हा अण्णांनी, भारतातील परिस्थिती व त्यावर आधारित राज्यभतनेचा आसुडा स्वतः तयार करून ब्रिटीश सरकारला पाठविला.

सतत उद्योगी मन अण्णांना कधीही गप्प असू देत नव्हते. गांवातील त्यांचे मित्र श्री. दांडेकर व श्री. घुले यांना आपल्या बरोबर भागीदार म्हणून घेऊन अण्णांनी १९२५ला ‘भिवंडी इलेक्ट्रीक सप्लाय कंपनी’ ठाणे जिल्ह्यातील पहिले वीज निर्मिती केंद्र गावात सुरु केले. सुमारे ७८ वर्षापूर्वी रस्त्यावर भिवंडीत इलेक्ट्रिकचे म्हणजे पॉवरचे दिवे दिसू लागले. आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या वीज कंपनीने येथील गणपती मंदिराला पहिले वीज कनेक्शन दिले ते १९२७ साली. इतके सर्व उपक्रम राबवायला पैसा, वेळ, जागा या सर्व अडचणींना कै. अण्णांनी चिकाटी व धीराने तोंड दिले कारण या सर्वांच्यामागे त्यांची इच्छा एक व ती म्हणजे स्थानिक बेकारी कमी करणे. अनेकांना रोजगार मिळवुन देणे. गांवातील लोक वीज कनेक्शन घ्यायला घाबरत असत. त्यांनी वीज कनेक्शन नको सांगितल्याने कंपनीचे बरेच उत्पन्न बुडाले. टाटा कंपनीची करार करून काही वर्षे हा उपक्रम चालू ठेवला. नंतर दुसरे दोन भागीदार वेगळे झाले. अण्णांना मोठा आर्थिक फटका बसला. याच काळात जागतिक मंदीला सुरवात झाली होती. गांवातील इतर उद्योगधंद्यांना विशेष करून हातमागाच्या उद्योगाला विजेची जोड मिळाली असती तर त्याचा गावक-यांना फायदा झाला असता पण गांवातील लोकांना ही दूरदृष्टी नव्हती.ते कळ सोसायला तयार नव्हते. शेवटी अण्णांवर एकट्यावर कर्जाचा बोजा येऊन पडला. नंतर गावात ‘अमालगमेटेड वीज कंपनी’ सुरु झाली. जागतिक मंदी, इलेक्ट्रीक कंपनीचा बोजवारा या कठीण काळात त्यांचे मित्र सर्वश्री कर्वे, जोग व कुंटे यांनी परिस्थितीतून बाहेर येण्यात अण्णांना धीर दिला व योग्य सल्ला दिला. या सर्व परिस्थितीत अण्णांनी तग धरली व स्वतःचा चरितार्थाचा राईस मिलचा व्यवसाय तसाच नेटाने सुरु ठेवला.

अशा त-हेने भिवंडी या आपल्या जन्मभूमीलाच कर्मभूमी ठरवून, राजकारणाच्या मार्गाने न जाता सामाजिक बांधिलकी जाणुन, यंत्राच्या व विजेच्या सहाय्याने त्यावेळच्या छोट्या भिवंडी गांवाची सेवा कै. महादेव जोगळेकरांसारख्या उद्योजकाने केली. एका सामान्य कुटुंबातील या मुलाने धडपडीने, मेहनतीने आपले असामान्यत्व तर सिद्ध केलेच पण तहाचा तेव्हां व नंतरही कोठे गवगवा केला नाही.

अतिशय शिस्तबद्ध दैनंदिन जीवन जगणारे, कष्टाळू, प्रामाणिक, ध्येयवादी, प्रखर देशप्रेमी आणि समाजाशी वडीलकीचं नातं स्विकारून त्यात स्वतःला झोकून देणारे कै. अण्णा तथा महादेव विष्णु जोगळेकर यांचा आदर्श आपण प्रत्येकांनीच ठेवायला हंवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *