सभ्य गृहस्थ हो?

झोपाळा
सभ्य गृहस्थ हो?
– माधव घुले

प्रस्तुत लेखाचे शीर्षक वाचून आमच्या चतुर वाचकांची तात्काळ उमटणारी प्रतिक्रिया मीही चाणाक्ष असल्याने निश्चितच जाणुन आहे. पण ! हा पणच सभ्यतेच्या संदर्भात अनेकाअनेक प्रश्न उभे करतो. मुळात गृहस्थ म्हणणं हेच ज्याच्या त्याच्या सभ्यतेच्या प्रतिष्ठेला धरून असतं. त्यातही सभ्य असा उल्लेख करताना तो आदरपूर्वक केला जातो. हां, तसा अनेकदा तो उपरोधात्मक असतो हे खरं, पण मुळातच आचारविचारांनी परिपक्व असणं हेच सभ्य गृहस्थाचं लक्षण होय. पण आचार-विचार प्रत्यक्षात यथार्थ उतरायला हंवा; भगवंतानी गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे,
यद्ददाचरति श्रेष्ठत्ततदेवेतरो जनाः | स यत्प्रमाणं कुरुते, लोकस्तदनुवर्तते||

सभ्यता हा काही गप्पांचा विषय नाही. ती नखशिखांत आचरणात यायला हंवी. अवतीभवती आदर्श नाहीत असं न म्हणता स्वतःच आदर्श व्हायला हंवं. शिस्त, संयम, सचोटी, श्रद्धा, भक्ती, प्रेम, विनय, आदर्श, परंपरा असा सर्वांचा सुंदर समन्वय सभ्यतेमध्ये असायला हंवा. अशा सभ्य गृहस्थाच्या सहवासात राहणा-यालासुद्धा खूप काही शिकता येतं, अशा सभ्य गृहस्थाचा प्रभाव केवळ कुटुंबापुरताच नाही तर समाजातही प्रकर्षाने जाणवतो. डाव्या विचारांची माणसं अशा सभ्यतेची खिल्ली उडवतात पण असा गट समाजात असणारच हे तो जाणुन असतो.

कुटुंबात, शेजा-यांशी, छोट्या छोट्या समुहात वागणुक आदर्श हंवीच पण याहीपेक्षा व्यापक प्रमाणात आणि सर्वार्थाने ती समाजात वावरताना हंवी. चांगलं – वाईट, खरं – खोटं हे द्वैत कायमच राहणार आहे. कारण तो मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. पण जसं ‘असतो मा सदगमय | तमसोमा ज्योतिर्गमय | तद्वतच मानवाची खरी धडपड मानवी जीवन समृद्ध करणा-या अशा तत्वप्रणालिकडे असायला हंवी. थोरामोठ्यांकडून आशीर्वाद ‘ शहाणा हो, मोठा हो’ असाच मिळतो. कारण वयानी मोठं होताना प्रत्येक पायरीवर हे शहाणपण समृद्ध करायचं असतं. आपल्या मुळ स्वभावाला, हुशारीला पोषक असं वातावरण मिळत गेलं तर हे शहाणपण लवकरच येतं. सभ्यतेचा बुरखा चढवावा लागत नाही, तो एक स्वभावधर्म होऊन जातो.

समाजात वावरताना आपण अनेक गोष्टींना सामोरे जात असतो. अशा वेळी अधिक जागरूक रहायला हंवं. डोळसपणे चांगलं हेरून आत्मसात करावं, असभ्यतेवर आपल्या परीने प्रहार करावा. गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार हे सूत्र पक्कं ध्यानात ठेवावं. सार्वजनिक ठिकाणी वावर करताना आपली कृती भोवतालच्या लोकांकडून न्याहाळली जाते याचं भान हंवं. आपलं बोलणं, वागणं, हंसणं, चालणं, हावभाव हे कसं मर्यादशील हंवं. आपलं अस्तित्व हे समोरच्याला त्रासदायक होऊ नये अशी कृती हंवी, रस्त्यातून जात-येता खाण्यापिण्याचं नवीन फॅड सध्या सुरु झालाय. नागरिकशास्त्राच्या प्रत्येक धड्यातून याचा आवश्यक पाठपुरावा होऊनही माणसं नेमकं त्याच्या विरुद्ध का वागतात? अगदी आजी आजोबांपासून सुना-नातवंडांपर्यंत सर्व वयोगटातील माणसं बेताल का वागतात? आणि हीच माणसं मग संस्कृतीच्या नि संस्काराच्या नांवांनी गळे कां काढतात?

सभ्यता, सौजन्य, चांगुलपणा, शिस्तबद्धता, प्रामाणीकपणा, विनम्रता, औदार्य, ममत्व, आदरभाव, बंधुभाव, समाधानी, आनंदी वृत्ती ही मानवाची खरी नेमकी ओळख आहे. तोच त्याचा धर्म आहे, तेच त्याचे जीवन आहे आणि तेच त्याचे ध्येय आहे, असावं. मानव हा पृथ्वीतलावरचा सर्वात प्रगत प्राणी आहे. विश्वाचं गूढ उकलण्याचा सातत्याने प्रयत्न करताना आपल्या बुद्धीचा कस लावून त्याची अविश्रांत धडपड चालू आहे. त्याचा हा खटाटोप त्याला एक दिवस यशाचा मार्ग दाखवील यात शंका नाही. इत्यलम!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *