झोपाळा
आ बैल (कुत्ते) मुझे मार
-माधव बापट
शनिवारी मलाही हाफ-डे असतो. डोंबिवलीला येता-येता साडेपाच-सहा वाजले. घरी येऊन बघतो तर दाराला कुलुप. जवळच्या किल्लीनं दार उघडलं, तर टीपॉयवर पिंकीची, माझ्या मुलीची चिठ्ठी.
‘मी व आई आजोबांकडे जात आहोत. आईनं सोमवारी रजा टाकलीय. मंगळवारी ती परस्पर ऑफिसला जाईल. मी घरी येऊन शाळेत जाईन. दूध वेळच्यावेळी तापवून ठेवायला सांगितलंय. – पिंकी.’
उद्या जाणार होती नां? ठीकाय, गेली तर गेली. खरं तर मोकळं मोकळं वाटलं. उद्याचा रविवार सॉलिड एन्जॉय करायचा, बस्सं!
इतक्यात फोन वाजला.’हेलो, मी बोलतेय.’
‘हं’
‘रागावलात?’
(जसं काही माझ्या रागाला ही भीकच घालते.) ‘छे गं. एवी तेवी उद्या जाणार होतीस ते आज. दादा कसे आहेत? (तिच्या आईवडिलांची पर्यायाने माझ्या सासुसासा-यांची चौकशी केली. करावी, बरं असतं.)
‘ते मजेत आहेत. एक सांगायचं राहिलं, बाजूच्या सोसायटीतले भडसावळे आहेत नां?’
‘त्यांचं काय?’
‘त्यांचं काही नाही हो. ते उद्या इंद्रायणीनं पुण्याला चाललेत.’
‘मग मी काय करू?’
‘अहो असं काय करतायं! गेल्या महिन्यात ते आले होते बघा. त्यांनी नव्हतं का सांगितलं, की एखाद्या रविवारी ते ज्युलीला ते आपल्याकडे ठेवणारेत म्हणून.’
म्हणजे ते कुतरडं उद्या आपल्याकडं आणि मी घरात एकटा. हे बघ, हे मला जमायचं नाही. हो तू म्हणाली होतीस, मी नाही. मला कुत्रा हा प्राणी अजिबात आवडत नाही. अन् तुला हे सगळं माहिती असून तू निघून गेलीस.’
‘अहो माझ्याही लक्षात नव्हतं. मी निघता निघता भडसावळे काकुंचा फोन आला की, उद्या आणून ज्युलीला सोडते. आता मी चालले, तुम्ही तिची दुसरी व्यवस्था करा असं सांगता येतं कां?’
‘मला कुत्र-बिंत्र नाही आवडतं. त्यात त्याचं ते अंगाखांद्यावर उद्या मारणं, चाटणं या सगळ्या दळभद्री सवयी अगदी किळसवाण्या वाटतात. तुम्ही दोघी माझ्या माझ्याविरुद्ध कट करून निघून गेल्यात.’
‘हे बघा, तुम्हाला एवढं वाटत असेल तर सरळ त्यांना जमणार नाही म्हणुन सांगा.’ असं म्हणून तिनं फोन आपटला.
आत्ताच्या आत्ता भडसावळेंकडे जाऊन त्याला स्पष्ट शब्दात सांगून येतो की, मला हे जमणार नाही. बाजूच्या सोसायटीत भडसावळेकडे गेलो तर दाराला कुलूप आणि आंतून त्या ज्युली नामक कुत्राचा भू-भूत्कार ऐकू येत होता. म्हणून त्याच्याच बाजूच्या शरद काळेची बेल दाबली.
‘ये , ये ! अरे मी तुझ्याकडेच निघालो होतो. या वेळी भडसावळेनी तुला बकरा बनवला वाटतं. आमच्या सोसायटीत प्रत्येकाकडं ज्युलीला ठेवून झालंय.’
‘काय? अरे ते भडसावळे तर म्हणत होते गेले पाच वर्षे ते ज्युलीमुळे कुठेही गेलेले नाहीत. मेव्हण्याचं लग्न आहे म्हणून चालले.’
‘बरोबर. असंच सांगतात, परत सकाळी जाऊन संध्याकाळी येतो असंही सांगतात. त्यांची वाट पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं पण त्यांची इंद्रायणी काही येत नाही. दोन चार दिवसांनी ते उगवतात.
हि किल्ली घे. ओरडून ओरडून टाहो फोडला आहे त्या कुत्र्यानं आणि भडसावळ्यांनी हे पत्र दिले आहे तुझ्यासाठी.’
सुन्नपणे भडसावळ्यांचं पत्र मी वाचू लागलो;
स.न.वि.वि.
उद्या ऐवजी आजच ज्युलीस आपल्या हवाली करावं लागतंय याबद्दल खूप वाईट वाटतंय.मला माहित आहे, आमच्या ज्युलीला सगळे तिच्या मागं कुत्रं म्हणून हिणवतात, पण तिच्या तोंडावर तरी तिला कुत्रं म्हणु नका. तिला खूप राग येतो. त्याचप्रमाणे तिला हाड-हाड करू नये. तिचे आपल्याकडे वास्तव्य असेपर्यंत आपला तो कळकट चटेरी-पटेरी लेंगा आणि भोकाचा बनियन या ओंगळ घरगुती वेशाभूशेस रजा द्यावी. अशाने ती चिडते.
शक्यतो तिला बांधू नये किंवा डांबून ठेऊ नये. तिला हॉलमध्ये रहायला आवडतं. टी.व्ही.वर सुध्या कार्टून पहाणं ती पसंत करते व सकाळी मॉर्निंग वॉक व रात्रीचा राउंड चुकवू नये. आमच्या लुसलुशीत व देखण्या ज्युलीवर अनेक नाठाळ कुत्रड्याचा डोळा असतो, तेंव्हा फिरायला नेताना तिची काळजी घ्यालंच. तिचा ब्रेकफ़ास्ट…………’
पत्र खूपच लांबलचक होतं, ते वाचता-वाचता मी जागच्या जागीच वितळायला लागल्याचा मला भास होऊ लागला.