स्वाध्याय पोरका झाला

वेचक-वेधक
स्वाध्याय पोरका झाला
– विनायक जोशी

बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे भाऊबिजेच्या आदल्या दिवशीची तिथी. काय दैवयोग असतात पहा! नेमका त्याच दिवशी स्वाध्यायींचा मेरुमणी असलेल्या दादाजी नामक झंझावातास शांत करण्यास यमराजाला सवड मिळाली. देवाला चांगली माणसे आवडतात हेच खरे कारण मनुष्याला माणुसपण देणारी स्वाध्याय चळवळ फोफावत असताना त्याचे प्रणेत्यास, संस्थापाकासाच काळाने आपल्या उदरी घ्यावे हे आपणांस थोडे खटकतेच. फाशीची शिक्षा झालेले किंवा अन्य मरणासन्न अनंत देह मृत्युच्या वाटेवर आधीच बुक होऊनही त्यांचा मृत्यू पुढे पुढे सरकत आहे. परंतु आदरणीय असणा-या पांडुरंगाला मात्र प्रतिपदेस बळी करून परमेश्वराने मोठा अन्याय केला आहे.
वर्णाश्रमाची आताचे औद्योगिक क्रांतीची फळे चाखणा-या मिश्र समाजास अडचण होत असतांना रायगडमधील उच्चवर्णीयाचे पोटाचे मुलाने सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर दीन दुबळ्यांसाठी प्रत्यक्ष श्री कृष्णाचे काम हाती घेतले असताना ते अपूर्णावस्थेत ठेवण्याचा नियतीचा हा कठोरपणा मनाला क्लेश देतो हे नक्की. कदाचित यालाच दैवगती असे दुसरे नामाभिधान असावे.

हातांत घेतलेले कार्य एकट्याच्याने पुर्ण होणार नाही, त्याचे श्रेयास सर्व समाजाचा हातभार लागणार आहे याची पुर्ण कल्पना असताना आपले सुखवस्तू आयुष्य एका दीर्घकालीन चळवळीत समर्पित करण्याच्या विचारवंताची उंची नक्कीच हिमालयही भेदून आणि घेऊन जाईल याविषयी कोणताही संदेह नाही. स्वामी विवेकानंदांपासून जे कोणी विचारवंत या भारतभूमीत झाले त्यांनी परदेशांत केलेले कार्य, प्रकट केलेले विचार दुसरीकडे पचतात, रुचतात, मान्यता पावतात, मात्र भारताचे सुजलाम, सुफलाम भूमीतच रुजण्यासाठी अनंत विचारवंतांचे बलिदान, हौतात्म्य ही गोष्ट निश्चितच मनुष्य गौरवाची चळवळ पुढे नेणा-या भूमीस शोभादायक नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
आपली प्रतिष्ठा, वर्ण, समाजातील स्थान विसरून भिका-यालाही त्याचे भिकारीपण विसरायला लावून मनुष्यपणाचे गौरवशाली जीवन जगण्याची संधी निर्माण घेण्याची शिकवण देणा-या मार्गदर्शनाचा असा अस्थायी, अवेळी मृत्यू म्हणजे चळवळीस एक जबरदस्त तडाखा आहे हे निश्चित. मनुष्य जरी अमरापात्ता घेऊन आला नसला तरी अशी व्यक्ती सुदृढ व दीर्घायुषी असावी असे समाजास वाटणे स्वाभाविक वाटणे नव्हे काय?

संतांची वचने नुसती सांगून नव्हें तर प्रत्यक्ष आचरणांत त्यांचेसारखे वागणारेच संत पदापर्यंत पोहोचतात. एखाद्या संस्थेची मान्यता घेण्याचे पाश्चिमात्य सोहळे त्यासाठी करण्याची जरुरीच उरत नाही, हे दादांचे कार्य सांगून जाते व त्यांना आतापर्यंत मिळालेले स्थानाच माणसाचे गौरवाचा गौरव करते. म्हणुनच आतापर्यंत दाम्भिकपणे चळवळींचे नेतृत्व करून जे स्वतःचे नाममहात्म्य वाढवत होते त्यांचेपुढे दादा म्हणजे सूर्य आहेत असे म्हणावेसे वाटते. खरोखरच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले, हे त्यांचेपासून समाजानेच नव्हे तर राजकीय क्षितिजावर ढोंगीपणाने वावरणा-या नेत्यांनी लक्षात घ्यावे. मोत्यांचे, आदरणियांचे सत्कार करताना त्यांचे खुर्चीस खुर्ची लावून आपल्यावर प्रकाशझोत पाडून आरत्या ओवाळून घेणा-या या सम्राटांना दादा हा आदर्श वस्तुपाठ असायला हांवा. त्यांची सम्राटपदे धुळीला मिळतील पण दादांनी चालू केलेले कार्य हे संस्कारानं निर्माण केलेले बावनकशी सोने आहे आणि ते जगाचे अंतापर्यंत सूर्याचेही तेजापेक्षा जास्त तेजाने चमकणार आहे हे निश्चित.

माझ्या बंगल्यावर या, माझ्या पी. ए.ला भेटा, अशा आताचे संस्कृतीचे पार्श्वभूमीवर दादांचे प्रत्येकाचे घरांत जाऊन स्वतः त्यास कार्याची दिशा देणारे अलौकिक आचरण म्हणजे खरोखर वैचारिक मूल्यांचा वस्तुपाठ आहे. खरा स्वाध्याय तोच आहे. की जो माणूस स्वतःहून त्याचे कुवतीप्रमाणे करू शकेल व निष्काम, सृजनशील सामाजानिर्मितीचे चळवळीत मुंगीसारखा सतत कार्यप्रवण राहील. म्हणुनच हे महान कार्य पुढे नेऊन ते सतत वाढवत राहण्याची सततची धारावाही कार्यप्रणाली अखंडपणे सुरु राहणे हीच या गौरवमूर्ती मानवास मानावांजली ठरेल. याचसाठी दादांनी आयुष्यभर केलेल्या कामरूपी बलिदानातून समाजास उर्जा मिळो व दादांचे आत्म्यास शांती लाभो, ही मानावानिर्मितीचे सागरांत हेलकावे खाणा-या प्रत्येकाचीच इच्छा फलद्रूप होवो – जय योगेश्वर!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *