वेचक – वेधक
सनातन वैदिक धर्म
-विद्याधर करंदीकर (पंचागकर्ते)
सांप्रत, धर्म या विषयावर लिहिणे, बोलणे अनेक लोकांना कटू लागते. सर्वसाधारण वर्ग धर्म या विषयाकडे उपेक्षेने पाहतो असे वाटते पण हा बुद्धिविभ्रम आहे. औषध कडू लागले तरी आरोग्य प्राप्तीसाठी ते अत्यावश्यक आहे म्हणून जबरदस्तीने पाजावे लागते.
मानव यावत्सुखाची अपेक्षा करतो. तो सुख केंव्हा, कोठे मिळेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. सुखहेतुर्धर्मः असुखहेतुरधर्मः | हे सूत्र लक्षात घेता, धर्म हा सुख हेतू आहे हे लक्षात घेतच नाही. “धर्मेण राज्यं विन्देत” राष्ट्राचा अभ्युदय धर्मावरच अवलंबून आहे, यासाठी राजाने धर्माला संरक्षण देऊन जगविले पाहिजे. हे महाभारतकार आवर्जून सांगत आहेत. मानवाच्या उन्नतीला, राष्ट्राच्या अभ्युदयाला कारण फक्त सनातन वैदिक धर्मच आहे.
धर्म हा शब्द धृ-धारण करणे याचे सामान्य नाम आहे. नुसते “धर्म” उच्चारताच जगातील सर्व धर्म डोळ्यापुढे येतात. खरा कल्याणकारी धर्म कोणता? याचे ज्ञान होण्यासाठी धर्म या शब्दामागे विशेषण असणे जरूर आहे. कारण ” व्यावर्तकं हि विशेषणम् “थोडक्यात व्यावर्तक म्हणजे अन्य पदार्थाची निवृत्ती करणारे म्हणजेच इष्ट पदार्थाचे बोध करून देणारे असावे लागते. जे विशेषण द्यावयाचे ते त्या पदार्थाचे असावे लागते. उदा. “सशृंग शश” असे म्हटले तर ते योग्य होणार नाही कारण सशाला शिंग नसते. तेंव्हा सशृंग हे विशेषण येथे योग्य नाही. ते गाईच्या ठिकाणी योजले तर योग्य ठरेल. तेथे सुद्धा संभवासंभव आहे. म्हणजे एखाद्या गाईला शिंग नसेलही. म्हणून शास्त्रकार सांगतात ” संभवं व्यभिचाराभ्यां स्याद्विशेषण मर्थवत्” आपल्या धर्मामागे सनातन आणि वैदिक अशी दोन विशेषणे योजलेली आहेत. आपल्या धर्माचे नांव हिंदू धर्म नसून सनातन वैदिक धर्म असे आहे. परंतु हे फारच फारच थोड्या लोकांना माहित असावे असे वाटते. आपल्यापैकी कोणालाही तुझा धर्म कोणता? असे विचारले तर तो हिंदू धर्म असे सांगेल. कारण मुळातच आपल्या धर्माची ओळख करून दिली जात नाही.
आपल्या धर्माच्या विशेषणांना फार खोल अर्थ आहे. सनातन शब्दाचा अर्थ फार प्राचीन असा आहे.म्हणजेच आज जे धर्म प्रचलित आहेत त्या सर्वांत पूर्वीचा-चिरंतन असा आहे. तो किती पूर्वीचा याचा बोध वैदिक या विशेशणावरुन होतो.
वैदिक – वेदेभवः किंवा वेदेन प्रतिपादितः म्हणजेच वेदात असलेला किंवा वेदाने प्रतीपादिलेला होय. वेद ग्रंथ अति प्राचीन आहेत हे बहुतेक सर्वच लोकांना मान्य आहे. आणखी एक गोष्ट स्पष्ट होते की आमच्या धर्माचा कोणीही संस्थापक नाही आणि वेदकालापासून तो अनादि आहे. आतापर्यंत अनेक राज्यक्रांत्या झाल्या, परधर्मियांनी निरनिराळ्या युक्तीने आक्रमणाने आपला धर्म नामशेष करण्याचा प्रयत्न केला तरी तो अद्याप टिकून आहेच. आज पाश्चात्य आमच्या वैदिक धर्माचे अध्ययन, यज्ञप्रक्रियेचा श्रद्धापूर्वक अभ्यास करताना दिसत आहेत. आम्ही त्याचा विचार सुद्धा करताना दिसत नाही, तर आचरण दूरच राहिले.
चोदना लक्षणोSर्थो धर्मः (शंकर भाष्य) “चोदना एव लक्षणं – ज्ञापकं यस्यः” चोदना अमुक करावे असे विधि वाक्य. धर्मशास्त्रात विधि आणि निषेध असे दोन शब्द वारंवार येतात. विधीचे पालन करावयाचे असते आणि निषेधांचे उल्लंघन करावयाचे नाही. अर्थात वेदाने जी गोष्ट करावी असे सांगितले त्यानुसार करणे वागणे, म्हणजे आपला धर्म, तात्पर्य, सनातन वैदिक धर्माचे आचरण करणे महत्वाचे आहे.