निमित्त…
– माधव बापट
रक्षण आरक्षणांचे
“आपण या आरक्षणाच्या कुबड्या टाकून दिल्या पाहिजेत. आपल्या बुद्धीसामार्थ्यानिशी आपण इतरांशी स्पर्धा करायला हंवी. आर्थिक सहाय्य जरूर घ्यांव पण प्रवेशासाठी / नोकरीसाठी सर्वांना एकच कसोटी हवी.” असं बरंच काही मी बोललो. वर्ष होतं १९७२-७३. मी इंटरला होतो. आम्ही तरुण मंडळ स्थापन केल होतं. ते फक्त सुट्टीत चालायचं. एरवी मंडळातील माझ्यासारखे सदस्य कॉलेज शिक्षणाच्या निमित्ताने क-हाड साता-याला किंवा पुण्याला असायचे. माझं गांव औंध. औंध संस्थान. गांवचं वातावरण अतिशय मोकळ होतं. अस्पृश्यता वगैरे गावाच्या गांवीही नव्हतं.
त्या वर्षी असं ठरलं की, शिवजयंती तक्क्यात करायची. तक्क्या म्हणजे नवबौद्धांचं प्रार्थना मंदिर. गांवाबाहेर दलित वस्तीत हे छोटेखानी मंदिर. आदल्या दिवशी आम्ही सर्वांनी तिथली साफसफाई केली. भटाबामणांची व पाटील कुलवाड्याची पोरं आपल्या वस्तीत/आळीत साफसफाई करताय याचं वस्तीला भारीच कवतीक वाटत होतं. शिवजयंतीच्या संध्याकाळी शिवप्रतिमेची मिरवणुक प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाध्यक्ष बाबुराव जगताप होते आणि त्याच कार्यक्रमात मी बोलत होतो.
माझं बोलणं, लोकांना कितपत पसंत होतं माहित नाही पण मी शिवाजी महाराजांवर बोलता बोलता आरक्षणावर घसरलो होतो. एकतर मी इंटरला होतो आणि आरक्षणामुळे माझ्या इंजिनिअरिंगच्या प्रवेशाला आडकाठी येणार हे डोक्यात होतं. माझं भाषण संपलं आणि बाबुराव जगताप बोलायला उभे राहिले. बाबुराव म्हणजे एक बलदंड व्यक्तिमत्व होतं. वय साठीच्या आसपास, झुपकेदार मिशा, डोक्यावर परिट घडीची कोनात ठेवलेली गांधी टोपी, धोतर, झब्बा जाकीट आणि हातात काठी असा त्यांचा पेहराव. औंध हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय ! स्वातंत्र्ययुद्धात पत्री सरकारात बाबुराव क्रियाशील कार्यकर्ते होते. बॅ.आप्पासाहेब पंत आपले पहिले राजदूत, त्यांचे श्रद्धास्थान होते. तर बाबुराव बोलायला उठले आणि माझ्याकडे बघत म्हणाले “तरुण मंडळाचे मघाचे वक्ते आरक्षणाबद्दल काहीसं बोलत होते. झक्कास! विचार एकदम फ़स्टक्लास! आपल्या बुद्धीच्या जोरावर आमने सामने यायलाचं हवं, आमचा काही म्हंता काही विरोध नाही. पण प्रत्येक शरतीला (शर्यतीला) कांही कायदा कानू असतो, नियम असतो. आता जत्रंत आपण गाड्यांची शर्यत घेतो का नाय? आमच्या संपत पाटलाची बैलजोडी आख्या इलाक्यातप्रसिद्ध आहे. ती नंबरात येणार, तरीपण दुसरा, तिसरा, चौथा नंबर बी हायच की! इतर पाचपंचवीस बैलजोड्या शरतीलायेत्यांत पण गणूचांभाराच म्हननं काय नाय! तू बी या वक्ताला शरतीत येवं. तो म्हनला, बाबांनो, माझ्याकडे बैलजोडी हाय पर तेबी पोट खपाटीला गेलेली. आज कडबा मिळाला तर उद्या काय घालावं अशी हालत. बैलगाडी तर पार खिळखिळी झालीय. आन कसं काय शरतीत येणार म्या!
आन, मग बाबासाहेबांनी अशासाठी आरक्षण केलं. ‘तेचि बैलजोडी फुराफुरायाला लागू द्या. बैलगाडी तुमच्यासारखी नीटनेटकी होऊ द्या, आन मग तुमच्या बरोबरीनं गणूचांभारबी शरतीत उतरंल.” बाबूरावांनी सभेचा नूरच बदलून टाकला. माझं तोंड रडवेलं झालं!
आज पंचवीस वर्षानंतर आरक्षणाचा प्रश्न तसाच किंबहुना त्याहून बिकट होतं चाललाय. ओबीसीचं आरक्षण आणि आता उच्च वर्णियांच्या आरक्षणांवर घोळ चालू आहे. आज बाबुराव नाहीत पण त्यांचे चेले सर्वच, अगदी सर्व पक्षात आहेत, त्यांचे ध्येय फक्त निवडणूक जिंकणं ! आपला मार्ग आपणंच काढायला हंवाय हे त्यातलं सत्य आहे.
सभा संपली. बाबुराव माझ्याजवळ आले. पाठीवर हात ठेऊन म्हणाले,”चांगलं बोललास, खरं ते बोललास. आम्हाला मात्र बरं तेच बोलावं लागतं, इलेक्शन तोंडावर आल्यात” आणि गाडीत बसून धुरळा उडवतं बाबुराव निघून गेले.