वेचक-वेधक
अक्षय तृतीया
संकलक : मोरेश्वर फडके, माधव घुले
आपण जे साडेतीन मुहूर्त मानतो त्यात कार्तिक शुद्ध प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, अश्विन शुद्ध दशमी व वैशाख शुद्ध तृतीया असे आहेत. त्रेतायुगाचा आरंभ या दिवशी झाला असे पुराणे सांगतात.
या दिवसाच्या दानाला फार महत्व आहे. भविष्य पुराण तर सांगते, या दिवशी केलेल्या लहान अथवा मोठ्या दानाचे फळ किंवा पुण्य अक्षय म्हणजे चिरकाल राहते म्हणून या दिवसाला अक्षय व तिथी तृतीया असल्याने अक्षय तृतीया असे म्हणतात.(आखाती असेही म्हणतात.)
आता पुण्य या शब्दाची व्याख्या करणे फार कठीण आहे, परंतु प्रचारात असलेला पुण्यात्मा म्हणजे धर्माने वागणारे, धर्मांच्या अनेक व्याख्यांपैकी एक व्याख्या ज्या कृतीने समाजाचे कल्याण होते ती कृती म्हणजे धर्म व धर्मकृत्य म्हणजे पुण्यकर्म.हे सांगायचा उद्देश, अक्षय तृतीयेला जे दान सांगितले ते आरोग्यासाठी निगडीत आहेच पण त्याहीपेक्षा सामाजिक अर्थव्यवस्थेचा भाग आहे.वैशाखाचे उन तापते; नद्या नाले, ओढे कोरडे पडतात, पाण्याचे दुर्भिक्ष असते. वाटसरूंना पाण्याची, सावलीची सोय म्हणून पाणपोया सुरु करतात. तहानलेल्याला पाणी व भुकेल्याला अन्न हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. म्हणून बहुतेक धार्मिक कृत्यात जल, कुंभ व धान्याचे दान सांगितले आहे.
अक्षय तृतीयेला मातीचा जलकुंभ, गहू, जव यांचे दान सांगितले आहे. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. त्या सर्व विद्यार्थी संकुलाचा उदर-भरणाचा खर्च समाजच करत होता. वैशाखानंतर पावसाळ्याची बेगमी करणेसाठी गहू – जव असे धान्य ब्राम्हण किंवा गुरुकुल प्रमुखाला द्यायचे. ब्राम्हणांनी अध्ययन व अध्यापन करावे व समाजाने त्यांची दैनंदिन जीवनाची व्यवस्था करावी, अशी सामाजिक व्यवस्था असे. आरोग्यशास्त्रदृष्ट्या वणवा तापू लागला की उन्हाच्या झळा लागतात. लघुशंकेला त्रास होतो. जव (बारली) यात एक गुण आहे. उकळत्या पाण्यात जव टाकून पाणी प्यायले तर लघवीचा त्रास किंवा उन्हाच्या झळांचा त्रास होत नाही. आज बारली वॉटर बाजारात विकत मिळते.
आपण भारताबाहेर कोठेही गेलात तर पिण्याचे पाणीसुद्धा विकत घ्यावे लागते. पण भारतात आजही गरिबातल्या गरीबाकडे गेलात तर गुळाचा खडा व पाणी मिळणारच. तहानलेल्याचा आत्मा शांत करणेची पद्धत भारताची विशेषता आहे. आमच्या प्रत्येक क्षणात धर्मभावनेतून ऋतुमानाप्रमाणे त्याग, परोपकार व शारीरिक आरोग्य यांचा समन्वय साधला आहे.
अक्षय तृतीयेला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पितृ आज्ञापालनाचा आदर्श. उन्मत्त झालेल्या क्षत्रिय वृत्तीचा संहार करणारा, एकदा नव्हे तर एकवीस वेळा या क्षत्रिय वृत्तीशी भगवान परशुरामांनी लढाई केली. क्षत्रिय वृत्तीचा नाश केला. क्षत्रिय वृत्ती व क्षत्रिय राजे होते पण ज्यांची विध्वंसक दंडेली वृत्ती नव्हती, सत्ता व धन यांनी जे उन्मत्त नव्हते, ते वगळता इतर क्षत्रियांचा विध्वंस करण्यासाठी जमदग्नी व रेणुका मातेच्या पोटी याच दिवशी सायंकाळी परशुरामांचा जन्म झाला. परशुराम ऋषीकुळात जन्मले पण फक्त वेदांचे ज्ञान घेऊन थांबले नाहीत तर भृगुकुलोत्पन्न नरशार्दुलाने धनुर्वेदाचे अध्ययन नव्हे तर धनुर्विद्येत प्राविण्य संपादन केले. भृगुसंहितेमध्ये धनुर्वेदाचे वर्णन आहे. सहस्त्रार्जुनासाराख्या अनेक गर्विष्ठांचा परशुरामांनी नायनाट केला, पृथ्वी निष्कलंक केली.
आता क्षात्रवृत्ती संपली व ब्राम्हवृत्ती जागी झाली व त्यांनी सर्व पृथ्वी कश्यपांना दान दिली. पण काश्यपही या भृगुकुलोत्पन्नाला समजले नाहीत. दान दिलेल्या पृथ्वीचा त्याग करावा अशी आज्ञा त्यांनी केली. तेंव्हा याच परशुरामाने अपरातांची निर्मिती केली. अशा या पुरुषोत्तमाच्या जन्मदिनी शतशः प्रणाम!
आजही सत्ता व संपत्तीच्या जोरावर मदांध झालेल्या क्षतकार वृत्तीचा नाश करण्यासाठी एखाद्या चित्तपावन कुळांत परशुराम जन्माला येतील कां?