व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व

व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व
माधव नारायण घुले

व्यक्तित्व ही निसर्गाची देणगी आहे. प्रत्येक सजीव प्राण्याला व्यक्तित्व असते. कुत्र्या-मांजरालाही व्यक्तित्व आहे पण त्यांच्या बाबतीत व्यक्तिमत्व हा शब्द वापरता येत नाही. गोरा रंग, सुडौल बांधा, धिप्पाड शरीरयष्टी, आकर्षक-प्रसन्न चेहरा असणा-या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुरेख आहे असे आपण सामान्यपणे म्हणतो. पण मानसशास्त्राच्या दृष्टीने बाह्य दर्शानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवणे चूक होय.

व्यक्तित्व म्हणजे वेगळे अस्तित्व असलेली व्यक्ती. प्रत्येकास जन्मतः व्यक्तित्व आहे. या व्यक्तित्वावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यावर व्यक्तित्वाचे व्यक्तिमत्वात रुपांतर होते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे व्यक्तीची शारीरिक ठेवण, बुद्धी, चारित्र्य, कर्तृत्व, गुण आदींचा समावेश त्यात होतो. व्यक्तीचा शारीरिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तीचा हा घडलेला पिंड म्हणजे तिचे व्यक्तिमत्व. इंग्रजीत पर्सनेलिटी ही संज्ञा व्यक्तिमत्वास वापरतात. पर्सोना या शब्दापासून पर्सनेलिटी हा शब्द तयार झाला. पर्सोना म्हणजे मुखवटा. रोमन काळात नट तोंडावर मुखवटा घालीत व बोलत. जसे पात्र तसा मुखवटा. जसा मुखवटा तसा आवाज व भाषण. यावरून व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य दर्शन असा अर्थ घेतला गेला. व्यक्तिमत्वाचा हा अर्थ एकांगी आहे. यामधे व्ह्यक्तिच्या स्वभाववैशिष्ट्यांचा, बुद्धीचा, भावनांचा, गुणांचा व वृत्तीचा अंतर्भाव होत नाही. त्यामुळे ही व्याख्या बरोबर नाही. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टीकोनातून वेगवेगळा केला आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या वर्तनाची सर्वान्गास्पर्शी व संघातस्वरूप गुणात्मकता (Total Qulity of an individual) म्हणजे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वात व्यक्तीची शरीरयष्टी, चेहरेपट्टी, ठेवण, बांधा, त्याची बुध्दिकौशाल्ये, क्षमता, अभिरुची, आवडनिवड, संपादित गुण इ. चा साकल्याने विचार केला जातो. या सर्वांची व्यक्तीच्या जैविक देणगीपासून व्यक्तिजीवन जगण्यापर्यन्त झालेली वाटचाल म्हणजे व्यक्तिमत्व.

निसर्गाने कांही जीवन-बीजे दिलेली असतात. परिस्थितीनुसार त्या बीजांची वाढ होऊन जो जीवनवृक्ष निर्माण होतो त्याला व्यक्तिमत्व म्हणतात. अनुवांशिकता सुप्त शक्ती तसेच प्राप्त परीस्थी व जीवनात मिळालेल्या अनुभवांना व्यक्तीने आपल्या मताप्रमाणे दिलेला अर्थ, या तीन घटकांचा व्यक्तीविशिष्ट परिपाक म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तीच्या जैविक घटकांची व सामाजिक आणि नैसर्गिक घटकांची जी पारंपारिक आंतरक्रिया होते त्यालाच व्यक्तिमत्व म्हणतात. ही आंतर्क्रिया प्रत्येक व्यक्तीची विशेष आणि सुसंगत असते.

व्याख्या : व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तनविशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कार्यक्षमता, कर्तृत्व, कला यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात होय. – नॉर्मल एलमन

‘व्यक्तिमत्व’ म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण सामायोचन होत असते त्याला कारानिबूत असणारी व वर्तनाला चालना देणारी संघटना होय – ट्रक्सलर

Personality is a dynamic organisation within an individual of those psycho-physical systems that determines his/her unique adjustment with the envioronment – Alport.

वरील व्याख्यांवरून स्पष्ट होते की, व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या कोणत्याही एका शारीरिक, मानसिक, बौद्धिक गुणधर्मात साठविलेले नसून ते संघातस्वरूपी आहे. अजाणतेपणी व केंव्हातरी घडणा-या, कुठल्यातरी वर्तनावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरत नाही. व्यक्तिमत्व संघातस्वरूपी असल्यामुळे त्याच्यात सातत्य व सुसंगतपणा अभिप्रेत असतो. म्हणून नवजात अर्भकाला व्यक्तिमत्व नसते. त्याचे वर्तन विस्कळीत स्वरूपाचे असते. जसजसे लहान मुलाला परिस्थितीचे आकलन होते तसतसा त्याचा ‘स्व’ जागृत होऊ लागतो व ‘स्व’ ची जाणीव विकसित होऊ लागते. स्वत्वाची कल्पना ही व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू आहे. जीवनात विविध भूमिका वाटावीत असताना येणा-या अनुभवावरून व्यक्तीचे वर्तन विशेष ठरत जातात. विकासाबरोबर व्यक्तिमत्व बदलत जाते. वर्तन विशेषांना स्थैर्य प्राप्त होते. एकदा चौकट तयार झाली की ती पुढे फारशी बदलत नाही. क्वचितच काही प्रसंगाने कलाटणी मिळून व्यक्तिमत्व बदलते. उदा. वाल्याचा वाल्मिकी ऋषी. व्यक्तीचे सुसंघटित व्यक्तिमत्व घडविणे हे शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

व्यक्तिमत्वाची लक्षणे :
१. सर्वसमावेशक : व्यक्तीचा रंग, रूप, आकार, वजन
२. गतिमान : व्यक्तिमत्व सतत बदलत असते.
३. अजोड-अपूर्व : प्रत्येक व्यक्ती विशिष्ट्य प्रकारे समायोजन साधत असते.
४. सामाजिक : व्यक्ती सामाजिक परिसराशी समायोजन साधते.

व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करणारे प्रभावी घटक
१. शरीररचना : व्यक्तीच्या शरीररचनेचा परिस्थितीशी समायोजन साधताना परिणाम होतो. काही व्यक्तींना उंच, धिप्पाड, बांधेसूद शरीर लाभलेले असते तर काही ठेंगू, बुटक्या बेढब असतात. काहींचे शरीर व्यंगरहित असते तर काही अपंग, शारीरिक व्यंग घेऊन जन्मतात, त्यामुळे त्यांचा समाजात कमी प्रभाव पडतो. त्या समाजात मिसळू शकत नाहीत. शारीरिक दोषांचा त्यांच्या भावनिक, सामाजिक विकासावर अनिष्ट परिणाम होतो.व्यक्तीकडे उपजत गोष्टी असतात. त्यांना जैविक बीज म्हणतात. ही घेऊन व्यक्ती आपला जीवनक्रम पूर्ण करीत असते.
२. अंतस्त्रावी ग्रंथी : (नलिका विरहित ग्रंथी) या घ्रन्ठीतून होणार्या स्त्रावाचे प्रमाण व त्यातील समतोल यांचा व्यक्तीच्या वर्तनावर खूप परिणाम होतो. आपण सर्व आपल्या अंतस्रावी ग्रंथीच्या आधीन आहोत असे म्हटले जाते. अंतस्त्रावी ग्रंथीद्वारे निर्माण होणारी जैवरसायने रक्तात मिसळतात व शरीरातील सर्व अवयवांपर्यंत पोहोचतात. चयापचय क्रियेत बिघाड निर्माण होतो. वाढ खुंटणे किंवा वाढ जादा होणे, शरीररचना, स्वभाव, बुद्धिमत्ता यावर परिणाम होतो. त्याची अकार्यक्षमता इतर ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाते.
मस्तकपिंडातून (पिच्युटरी) होणारा स्त्राव प्रमाणापेक्षा जास्त झाला तर शरीराची अतिरिक्त अनैसर्गिक वाढ होते. कंठपिंडातून (थायरॉइड) जास्त स्त्राव निर्माण झाला तर वर्तनात अस्थिरता व चंचलता जास्त किंवा कमी झाला तर व्यक्ती सुस्त बनते. वृक्कस्थ (ओड्रेनल) पिंडातील स्त्रावामुळे भावनिक उद्रेकाच्या समयी शरीर व्यापारावर ताबा राहतो. जनन ग्रंथीतील ( सुप्रारिनल व गोनाड) स्त्राव कामवासना वाढवितात. थोडक्यात व्यक्तिमत्व विकासात अंतस्त्रावी ग्रंथींचा महत्वाचा वाटा आहे.
३. पर्यावरण/ परिस्थिती : कुटुंब, शेजार, मित्र, शाळा, समाज व संस्कृती यांचा सुद्धा व्यक्तिमत्वाच्या विकासावर परिणाम होतो. कुटुंबातील जिव्हाळा, प्रेम, मित्रांची संगत, शालेय वातावरण, शिक्षकांचा सहवास या दृष्टीने महत्वाचे होत.

कोणत्याही एका व्यक्तीचे व्यक्तिमत्व दुस-या व्यक्तीशी जुळत नाही. व्यक्तिपरत्वे शरीररचना, स्वभाव वैशिष्ट्य, बुद्धी, वृत्ती आदीमध्ये भिन्नता आढळते. तरीसुद्धा काही विशिष्ट्य पैलू विचारात घेऊन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचे वर्णन वर्गतत्वावर व गुणतत्वावर केले आहे.
१. शेल्डन : शारीरिक घटकानुसार वर्गवारी अ) बोजड, बुटके ब) बांधेसूद, पिळदार क) किडकिडीत, उंच.
२. अरिस्टोर्टल : वृत्तीभेदावर आधारित वर्गवारी : अ) कोपिष्ट (रक्तातिशयत्व), ब) रंगेल, क) थंड (आळशी)
३. थान्रेदाई : पंचेन्द्रीयांवर आधारित वर्गवारी अ) दृष्टी तीक्ष्ण ब) कान तीक्ष्ण क) चपळ ड) चविष्ट ई) घ्राणेन्द्रिय तीक्ष्ण
४. कार्ल युंग : समाजात मिसळण्याच्या प्रवृत्तीवर : अ) अंतर्मुखी – स्वतःच्या भावना, विचार, कल्पना यात मग्न, हळवी व भावनाप्रधान वृत्ती, मितभाषी. ब) बहिर्मुखी : खूप बोलकी, धीट, मनाने कणखर मात्र एखादी व्यक्ती सदा सर्वकाळ अंतर्मुखी अथवा बहिर्मुखी नसते. ति प्रसंगानुसार बदलते. आपले व्यक्तिमत्व उठून दिसावे. त्याची छाप इतरांवर पडावी म्हणुन प्रत्येक जण धडपडत असतो. योगाभ्यासाने व्यक्तिमत्वात सुधारणा करता येणे शक्य आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *