व्यक्तिविशेष – मराठी ग्रंथसूचीकार श्री. शरद केशव साठे

व्यक्तिविशेष
मराठी ग्रंथसूचीकार श्री. शरद केशव साठे
-माधव घुले

आपल्यातील प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा, समस्त डोंबिवलीकरांनाच नव्हे तर अन्य भाषिक वाङमय प्रेमींना ज्यांचा आदर वाटावा असा एक गुणी माणूस या डोंबिवलीत वास्तव्य करून आहे. “मराठी ग्रंथसूचीकार” असा गौरवपूर्ण उल्लेख ज्यांचा केला जातो अशी केवळ दोनच व्यक्तिमत्वं समस्त वाङमयकारांना ज्ञात आहेत. याचे पहिले मानकरी कै. शंकर गणेश दाते तर दुसरा मान आपल्या घरचे शरद केशव साठे यांचा आहे. कै. दात्यांच्या आकस्मिक निधनामुळे अपु-या राहिलेल्या कामाची जबाबदारी स्वतःहून शिरावर घेणारे शरदराव साठे चित्तवेधच्या पहिल्या अंकातील व्यक्तिविशेष या सदराचे पहिले मानकरी आहेत.

कै. शंकरराव दाते व श्री. शरदराव साठे ही दोन्हीही माणसं ख-या अर्थानं मोठी आहेत कारण मराठीमध्ये आजवर केले गेलेले कोश व सुचिकार्य, सर्व भारतीय भाषांचा तौलानिक विचार करता, एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ मराठीतच झाला असल्याचा निर्वाळा भारतातील विविध भाषा तज्ञांनी वेळोवेळी दिला आहे.

मराठी ग्रंथसूची म्हणजे मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या सर्व ग्रंथाची विषयवार यादी होय. अगदी तपशिलासहित म्हणजे ग्रंथाचा विषय, ग्रंथकार, ग्रंथ नाम, प्रकाशक, प्रकाशनस्थळ, प्रकाशन वर्ष, पृष्ठ संख्या, किंमत, इत्यादिंचीनोंद. ही ग्रंथसूची म्हणजे महाराष्ट्र सारस्वताची सगुण मूर्ती व प्रगतीची संदेश कथक आहे.

मराठी वाङमय हा विषय घेऊन एम. ए. ही पदवी आणि ग्रंथालय शास्त्राचं एक प्रमाणपत्र या पुंजीवर खर्डेघाशी करणारे शरदराव कमालीची जिद्द व अभ्यासू वृत्तीमुळे “ग्रंथासुचीकार” म्हणून नावारूपाला आले. कै. दाते संपादित मराठी ग्रंथसुचीचा पहिला भाग सन १९४४ मध्ये प्रकाशित झाला, ज्याचा कालखंड सन १८०० ते १९६७ एवढा मोठा आहे. सन १९३८ ते १९५० चा दुसरा भागही सन १९६१ मध्ये प्रकाशित झाला पण १९९४ मध्ये दातेसर निधन पावले आणि तिस-या भागाचं कामंच थंडावलं. बँकेची सुखवस्तू नोकरी व्ही. आर.एस.च्या व्हायरस पूर्वीच शरदरावांनी ख-या खु-या स्वखुशीने १९९५ मध्ये सोडली आणि अथक परीश्रमांती सन १९५१ ते १९६२ या कालखंडाचा तिसरा भाग फेब्रु.२००१ मध्ये प्रकाशित केला. सन १९६३ ते १९७२ चा चौथा भाग तर कार्यरत आहेच पण पुढील एकूण आठही भागांची सन २००० पर्यंतची सूचीमालिका करण्याचं प्रचंड काम शरद रावांची जिद्द व अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेनी संपूर्णतया शरदरावांवरच सोपवलं आहे. अर्थातच आपल्या ह्या अजोड कार्यात संस्थेच्या संचालिका डॉ. सरोजिनी वैद्य, विविध ग्रंथालयं आणि राज्य शासनाचा उल्लेख ते प्रामुख्याने करतात.

मित्रांनो, शरदरावांनी यापूर्वी केलेल्या सुचींचा संग्रह तुम्ही पाहाल तर तुमचा अभिमान शतगुणित होईल. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभावावरील शब्दसूची, ज्ञानेश्वरीची ओवीसूची, मर्ढेकरांची कविता, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, चांगदेव पासष्ठी या सर्वांच्या चरणसूची व शब्दसूची. हा असा अखंड निदिध्यास घेतलेले शरदराव हजारो रुपयांची पदरमोड केवळ आपल्या आनंदासाठी करतायत. मराठी वाङमयाभ्यास वा ग्रंथ पालन क्षेत्रातील एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीनं ग्रंथसुचीचं हे काम अधिक तंत्रशुद्धतेनं व परिपुर्णतेनं केले असते असे त्यांना अजूनही वाटतं. असा विनम्र भाव, ऋजुस्वभाव, शब्दाशब्दातून प्रकट होणारा आदरभाव, चेह-यावरचा प्रसन्नभाव, कमालीची जिद्द, अपार मेहनत, मराठी सारास्वतावरील गाढ श्रद्धा, प्रसिद्धी परांङमुखता ही खास वैशिष्ट्ये असणारे आमचे, आपले सर्वांचे एकारांत चित्तपावन असले तरी वैखरी माधुर्य जपणारे श्रीमान शरद केशव साठे यांना आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा. आपल्या शुभाकार्यासाठी आपणास दीर्घायुष्य लाभो ही श्री परशुरामचरणी प्रार्थना !

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *