कुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा? – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४

परशुराम हे ब्राह्मणांचे – विशेषत: चित्पावनांचे दैवत आहे. परशुरामाने विद्वत्तेबरोबरच शस्त्राचाही वापर करण्यास सुचविले होते. (शापादपि शरादापी) ब्राह्मणांची विद्वत्ता ही शक्ती आहे आणि आता या शक्तीला संघटन शक्तीची जोड देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ब्राह्मणांची अस्मिता जागी करण्याचा हा लेखन प्रपंच!

 
अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।।
इदं ब्राह्म्यामिदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

 
ब्राह्मणांचे दैवत असलेल्या श्री परशुरामांच्या या श्लोकाचे स्मरण ठेवून त्यानुसार पावले टाकणे आज गरजेचे झाले आहे. गांधीवधानंतर ब्राह्मण समाजाबद्दलचा द्वेष अकस्मात उफाळून आला. गांधीवध एका ब्राह्मणाने केला हे निमित्त जनतेला मिळाले. आणि ब्राह्मणांना झोडपण्याचे धोरण सुरु झाले. गांधीवधानंतर प्रथम ब्राह्मणाची घरे जाळण्याचा सपाटा लावला., नंतर कुळकायदा करून ब्राह्मणांच्या जमिनी काढून घेतल्या गेल्या, यानंतर अनेक जातींना आरक्षण देवून हळू हळू ब्राह्मणांची शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली. व शासकीय कामकाजातील त्यांच्या दृष्टीने अडथळा असणारी ब्राह्मणांची ढवळाढवळ बंद केली. ब्राह्मणांच्या बायकांना भांडी घासायला लावण्याची कल्पना एका मोठ्या मंत्रीमहोदयानी मांडली होती. मध्यंतरी कोण्या परकीय माणसाने आपल्या पुस्तकात मराठा जातीला बोचेल असा काही मजकूर लिहिला होता. यावर ब्राह्मणेतरांनी प्राचीन भारतीय साहित्य जपणाऱ्या भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये धिंगाणा घातला. तसेच दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून अन्यत्र कचऱ्याच्या गाडीतून हलविला गेला. ब्राह्मणांना दाबण्यासाठी कारणे शोधणे अवघड नव्हते. मग काय, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांवर अत्याचार केला , त्यांचा छळ केला असे दृश्य उभे केले. जातिभेद दृढ करून त्यांना ब्राह्मणांविरुद्ध भडकवायला सुरु केले.

 
वरील प्रत्येक वेळी ब्राह्मणांनी काय केले? फक्त सहन केले. ब्राह्मणांची घरे जाळली त्यावेळी ब्राह्मणांनी निषेध केल्याचे ऐकिवात नाही की नुकसानभरपाईही मागितली नाही. मध्यंतरी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जनतेचा शीख समाजावर रोष वाढला. त्यांचे खूप नुकसान केले गेले. यावर शीख बंधूंनी कोर्टात दाद मागितली व चौदाशे कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळविली शिवाय शीख समाजाची माफी मागितली गेली. गांधीवधानंतर ब्राह्मण

 
जातीबद्दल वैर धरले गेले तसे इंदिरा गांधींनंतर शीख समाजाबद्दल झाले नाही. कुळकायदा आला, ब्राह्मणांच्या जमिनी गेल्या आणि ब्राह्मणांनी सरळपणे जमिनीवरचां ताबा सोडून दिला. आपल्याकडे अनेक कायदेतज्ञ मंडळी आहेत पण कुळकायदा काय आहे , त्यावर दाद मागता येईल का या प्रकारचा विचारही कोणी केला नाही.

 
वरील सर्व गोष्टींवरून असा निष्कर्ष निघतो की एकतर ब्राह्मण मंडळी दुर्बल आहेत त्यामुळे त्यांना सहन करण्याशिवाय पर्याय नाही. निदान ब्राह्मणेतर मंडळी तरी असा समज करून घेतील. समजा , एखाद्या वस्तीत एक दोनच ब्राह्मण कुटुंबे आहेत अशा परिस्थितीत अन्य लोक गैरफायदा घेतात असे अनुभव आहेत.

 
तसं पाहू गेले तर आपण भारतीय लोकच जरा माघार घेणारे आहोत. आज भारतावर इतकी आक्रमणे झाली तरी आपण शांत राहिलो एवढेच नव्हे , आपण ती थोपवूही शकलो नाही. भारतात इंग्रज आले, मोगल,पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच आले ते इथल्या भूमीसाठी आपसांत लढले , पण आम्ही शांतच राहिलो. ही शांतताप्रियता की दुबळेपणा? ह्यालाही ब्राह्मण लोकच जबाबदार आहेत का? वास्तविक संरक्षण , लढाई हा क्षत्रियांचा धर्म . तरीही अनेकदा ब्राह्मणांनी शौर्य दाखविले, सत्ता गाजविली मग , ब्राह्मणांबद्दल आकस का? वरील परदेशी लोकांनीही भारतीय लोकांवर भरपूर अत्याचार केले मग त्यांच्याबद्दल तरी आकस धरला गेला का? आजही काश्मीरमध्ये मुस्लिम लोक भारतीयांवर अत्याचार करत आहेत. त्यांच्याबद्दल तरी शासनाने आकस धरला आहे का? मग ,ब्राह्मणांबद्दल एवढा आकस का? ह्यावर काहीजण म्हणतात की ब्राह्मणांनी सातत्याने अन्य समाजावर अत्याचार केले. त्यांना कमी लेखून अस्पृष्य केले …..वगैरे . पण इतिहास पहिला तर अन्यधर्मियांनीच भारतीयांवर अत्याचार केले , लुटालूट केली आणि आजही काश्मिरात असे अत्याचार चालू आहेत. पण या अल्पसंख्यान्काबद्दल लोकांना आजपर्यंत कायमस्वरूपी आकस निर्माण झाला नाही.उलट सर्वधर्मसमभाव बाळगून त्यांच्याबद्दल आकस धरला नाही . मग,ब्राह्मणांबद्दलच आकस का? खरे सांगायचे तर , अल्पसंख्यांक जमातीतील मंडळी ताकदवान आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध जाण्याची कोणाची हिम्मत होत नाही. त्यापेक्षा ब्राह्मण लोक तसे गरीबच किंवा दुबळे . कितीही त्रास दिला तरी त्यांच्याकडून कोणाला धोका नाही. सहन करतात बिचारे!

 
कोणी म्हणेल ही परिस्थिती खरी असली तरी त्यामुळे आमचे काही बिघडणार नाही. आज आमच्या घरटी एक माणूस परदेशात आहे असेच आम्ही उभारी घेत राहू. यावर असे वाटते कि आमचे भारतातील स्थान आणि आम्ही जतन केलेली संस्कृती सोडून टाकायचे का? म्हणजेच आम्ही धर्मसंस्कृती सोडून देवून आमचे स्वत्व विसरून जायचे का? हे मनाला पटत नाही. का आम्ही स्वत:ला परके करून घ्यायचे? मग काय करायचे? दोन मार्ग दिसतात.पहिला मार्ग म्हणजे काही इलाज नाही म्हणून असेच सहन करायचे किंवा दुसरा मार्ग म्हणजे काहीतरी ठोस हालचाल करून नव्या जोमाने कामाला लागायचे. पण म्हणजे नक्की काय?उत्तर एकच! आम्ही दुबळेपणा सोडून बलवान व्हायचे तेही भारतातील सर्व जाती आणि समाजाचे भले करण्यासाठी! स्वज्ञातीसह हिंदुत्वाच्या बळकटीसाठी! देशाच्या भल्यासाठी एकत्र येवून!

 
त्यादृष्टीने काही विचार -


 
१. संघटन- आम्ही दुर्बल होण्याचे कारण आमच्यात एकी नाही. आमच्यातील प्रत्येक माणूस स्वतंत्र विचारांचा स्वतंत्रपणे जगणारा. दुसऱ्यांशी जमवून घेणे जमत नाही. त्यामुळे आपण संघटीत होत नाही. एखाद्याने काही चांगले विचार मांडले तरी एकमत न होता उलट संघर्षच होतो. आपल्यातील प्रत्येकजण हा कुटुंबवत्सल आहे. आपण बरे, आपला परिवार बरा ही आमची वृत्ती. पण जर आपण संघटीत झालो तर अनेक प्रकारचे उपक्रम करू शकतो. संघटन करून आपली शक्ती वाढवू शकतो.

 
आपली इतरही शक्तिस्थाने आहेत. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, कर्तबगारी आहे, क्षमताही आहे. आपल्यातल्या कित्येक लोकांनी आपल्या कर्तबगारीवर देशातच काय परदेशातही भरीव कामगिरी केली आहे. अशा सर्व लोकांची यादी केली तर एक पुस्तकच तयार होईल.आणि खरोखरच अशा पुस्तकांचे ‘चित्पावन ब्राह्मण चरित्रकोश ‘ या नावाचे खंड निघत आहेत. सर्वशाखीय ब्राह्मणांचा कोश केला गेला तर १०० तरी खंड निघतील.अशी सर्व मंडळी एकत्र आली तर जगात खळबळ माजविण्याइतके काम होईल. ही आमची ताकद असताना आम्ही स्वत:ला दुबळे का म्हणायचे?संघटन म्हणजे नुसते एकत्रीकरण करणे असे नाही. तसे अनेक ब्राह्मणसंघ आहेत . चित्पावन ब्राह्मण संघ आहेत, सर्वशाखीय ब्राह्मण संघ आहेत, कुलांचे संघटन आहे. पण ही सर्व मंडळी आपल्या गावापुरती मर्यादित असतात. त्यांचे ठराविकच कार्यक्रम होत असतात. ते म्हणजे हळदीकुंकू , वधूवर सूचक मंडळ , ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार वगैरे. हे योग्य आहे तरी पण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. म्हणजे , एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर संशोधन करत असेल तर त्याला मदत करणे, एखादा कोणी अडचणीत असेल तर त्याला योग्य ती मदत देणे, एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे ह्या कारणाने तिला त्रास दिला जात असेल तर अशा वेळेस सर्वांनी मिळून त्याला सावरले पाहिजे . एखाद्याला एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्याला सर्वांनी मिळून सर्व प्रकारची मदत करावी.

 
मध्यंतरी एका ब्राह्मण संघाने सर्वांनी मिळून शेती घेऊन एकत्रितपणे कसण्याचा उपक्रम केला. एखाद्या ब्राह्मणाची शेती असेल तर त्याला अन्य समाजाकडून त्रास होतो. पण एकत्रित पणे शेती केली तर आपली शक्ती वाढते. आपण ब्राह्मण मंडळी बुद्धिवान असल्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग करून नव्या सुधारणा करू शकू. (आजसुद्धा ब्राह्मण कसत असलेल्या शेती फायद्यात आहेत) वरीलप्रमाणे विचार करून त्यांनी शेतजमीन खरेदी केली व आता ती विकसित होत आहे. एवंच ठराविक कार्यक्रम करण्यापेक्षा भरीव कामे होतील असे उपक्रम राबविले जावेत.

 
२. सहकार्य- संघटनाबरोबर सहकार्यही आवश्यक आहे. समजा, एखाद्याचे दुकान आहे तर ब्राह्मणांनी त्याच्याकडून खरेदी केली पाहिजे. एखादी ब्राह्मण व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली तर सर्व च्या सर्व ब्राह्मणांची मते त्या व्यक्तीला मिळाली पाहिजेत. मग तो उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो. त्यामुळे ब्राह्मण मतांचे महत्त्व वाढेल
आम्ही राहत असलेल्या वारजे भागात मागील वर्षी एक उमेदवार ब्राह्मण मतांवर निवडून आला होता. त्यावेळी ब्राह्मण मतांचे महत्त्व वाढले. त्यामुळे नंतर सहा महिन्यांनी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्राह्मण मतांना भाव आला आणि सर्व उमेदवार ब्राह्मण संघटनांकडे मते मिळविण्यासाठी धडपड करू लागली.
नुकतीच वारजे भागात B (फौन्डेशन ) संस्था काढली गेली. ही संस्था ब्राह्मणांना सर्वतोपरी सर्व प्रकारची तत्परतेने मदत करीत असते. असेच धोरण सर्वत्र राबविले जावे.

 
३. संशोधन व नवनिर्मिती : बुद्धी हीच ब्राह्मण समाजाची शक्ती आहे. या बुद्धीच्याच जोरावर ब्राह्मण तग धरून आहेत. आणि म्हणूनच त्यांचे कडून भरीव कामगिरी झाली पाहिजे. पुरातन भारतीय विज्ञानाची प्रगती आधुनिक विज्ञानाच्या तोडीची होती. ह्या गोष्टीचा व पुरातन विज्ञानाचा फायदा घेवून , नव्या शोधांची देणगी जगाला देता येईल. नुकतेच एका ब्राह्मण वैज्ञानिकांनी आयुर्वेदिक औषधाचा अभ्यास करून अश्वगंधा नावाच्या औषधाचे पेटंट मिळविले आहे.

 
लोखंडासंबंधीचे शास्त्र भारत देशात प्रगत झाले होते असे आता आम्ही म्हणतो अशाच काही शास्त्रांचा पुन्हा अभ्यास करून आम्ही अजून काही शोध लावू शकणार नाही का? प्राचीन भारतातील लोकांनी विमानासंबंधीचे विज्ञान शोधून काढले होते असे ऐकिवात होते. हे जर खरे असेल तर तशी विज्ञान क्षेत्रे आम्ही का शोधू शकलो नाही?आमचे विज्ञान पाश्चात्य लोकांनी चोरले अशी ओरड नेहमी ऐकू येते. पण अशा वेळी हे जाणवते की या आधीही आम्ही खडबडून जागे होऊन , अशा विज्ञानावर पुन्हा अभ्यास का केला नाही?

 
विचार केल्यास असे जाणवते कि भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि विकास आपण करू शकू. त्यासाठी काही लोकांनी एकत्र येवून अनेक क्षेत्रात संशोधन करून भारतीय विज्ञानाची प्रतिमा उजळ करावी. याप्रमाणे ब्राह्मण मंडळींनी कंबर कसून कामाला लागणे. देशात किंवा परदेशात भरीव कामगिरी करून दाखवणे गरजेचे आहे.

 
वरील गोष्टी साधताना आपले काही दोष आड येतात यावर विचार करून ते काढण्याचा प्रयत्न करावा. त्यातील जाणवणारे दोष असे –

 
१. आपण आपल्या कुटुंबाचा व जवळच्या नातेवाईकांचा एक कोश करून त्यात सुखाने राहण्याचा प्रयत्न करत असतो. बहुतेकांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने सुधारली असल्याने त्या कोशास भक्कमपणाही आला आहे . आपले लक्ष सणवार , समारंभ , कलाक्षेत्र यात गुंतून घेतले आहे. अधून मधून एखादी टूर काढतो . हे जरी खरे असले तरी एक विचार व्हावा की हा कोश अखंड टिकून राहिलं का? की जबरदस्त ब्राह्मणद्वेशापोटी हा कोश फुटून जाईल?तेव्हा आपल्या कोशातून बाहेर येवून काही प्रमाणात तरी आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी वेळ द्यावा.

 
२. आपल्या लोकांचा कल सर्वांनी मिळून काम करण्यापेक्षा एकमेकांत वाद घालून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यातच असतो. एखाद्याने उपक्रम करायचे ठरविले आणि तो उपक्रम चांगला असला तरी त्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर त्याचे महत्त्व वाढेल आणि पर्यायाने आपले महत्त्व कमी होईल अशा विचाराने पुढे जाणाऱ्याला अडथळा करून त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न करून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात आपल्या वृत्तीतही बदल व्हायला हवेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *