वेचक-वेधक
वृद्धाश्रम नव्हें, आनंदाश्रम!
– विनायक जोशी
एक ऑक्टोबर हा सर्वत्र अगदी परदेशातही जागतिक वृद्धादिन म्हणुन ‘पाळला’ नाही तर ‘साजरा’ केला जातो. जसे कॉलेजमध्ये वेगवेगळे दिन पाळले जातात तसेच सामाजिक क्षेत्रात हा दिवस अलीकडे गाजावाजा करून “पाळण्याची” पद्धत सुरु झाली आहे. मेडिकल चेकअपचे नांवानी शंभर रुपयात सर्व चेकिंगचे “कॅम्प”चे पेव फुटते आणि त्यात अडकलेले मासे २/३ महिन्यांची औषधे (बहुदा टॉनिकच) गळ्यात मारून घेतात. मात्र “वृद्ध” होऊनही हे त्यांच्या लक्षात येत नाही की आतापर्यंत त्यांनी खालील पथ्ये पाळली असती तर आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली नसती.
झोपण्यापूर्वी दोन तास आधी व जेवणानंतर १५ मिनिटे शतपावली केली पाहिजे. दिवसभर बसून काम असेल तर तासाने पाच मिनिटे तरी चालून आले पाहिजे. निदानपक्षी डोळे मिटून स्वस्थ बसावे. बसून काम करताना किंवा प्रवासात कमरेला मऊ छोट्या उशीचा आधार घ्यावा. अंघोळीपूर्वी अंगाला नियमितपणे तेल लावावे म्हणजे त्वचा कोरडी पडत नाही. सूर्योदयापूर्वी निदान अर्धा तास तरी फिरून यावे. हलकासा व्यायाम केल्यास उत्तम. पण बारा सुर्यनमस्कार तरी शास्त्रोक्त पद्धतीने घालावेत. केवळ रतीब घालू नये. उठता बसता घाई करू नये. हाडे ठिसूळ झालेली असतात, त्यामुळे मोडल्यास ती सांधणे कठीण असते. स्वतःजवळ आपले ओळखपत्र कायमच बाळगणे.
लक्षात ठेवा ‘वृध्द’ होणे आपल्या हाती नाही. पण ‘निर्बुद्ध’ होऊ न देणे आपल्या हाती आहे. क्रुद्ध तर मुळीच होऊ नका. त्यामुळे रक्तदाबासारखी समस्या उद्भवू शकते. त्याने ‘हृदयविकार होण्याची व दृष्टीवर विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे ‘जीभ जिंकणारा जग जिंकतो’ म्हणजेच खातांना व बोलताना जिभेवर ताबा असू द्यावा. जास्त खाण्याने आपणच दुःख विकत घेतो, जास्त बोलून अप्रिय होण्यापेक्षा आवश्यक बोलून सर्वांचीच तब्येत उत्तम राहते. आपण फक्त खाण्यासाठी जगात नसून जगण्यापुरतेच खाण्याने जीवनानुभव अमृतमयी होतो. सात्विक आहाराने चारित्र्यात सूर्याची तेजस्विता येते तर अंतःकरणात चंद्राची शितलता पाझरते व मन क्षमाशील होते. शरीराने वृद्ध झालात तरी चालेल पण मनाने आणि बुद्धीने वृद्ध होऊ नका. दुस-यांच्या चुका शोधण्यात आपली उर्जा खर्च करू नका तर दुस-यांचे गुण शोधून ते आपण अंगी बाणवण्याचा प्रयत्न हा देवपूजेएवढाच पवित्र आहे.
आपण वृद्ध – म्हातारे आहोत हि कल्पनाच मनातून काढून टाका. आयुष्याकडे सौंदर्य जोपासण्याच्या वृत्तीने पहा. मग म्हणाल, ‘जशी दृष्टी, तशी सृष्टी’ – वृद्धत्व हा शाप नसून एक ‘स्थिती’ आहे, हे एकदा मनाला पटले की, पांढरे केसही काळे दिसू लागतील. हाच वृद्धत्वावर विजय मिळवण्याचा व दृष्टीकोन विकसित करण्याचा संकल्पाचा दिवस.
‘कठीण नाही कांही जगी, जो प्रयत्ने सर्व उपभोगी’. ‘भोग नाही चुकत कोणा, विश्वास ठेऊ नका उणा’. जगलेल्या आयुष्यातील वर्षाची आठवण म्हणजेच वाढदिवस. म्हणजेच आयुष्याच्या जमाखर्चाचा ताळेबंद, लेखाजोखा; आढावा दिन; न झालेल्या, जाणलेल्या गोष्टी करण्याचा ‘संकल्प’ दिवस. प्रत्येकाला विनाशाकडे जायचे आहे, याची पुर्ण कल्पना असताना त्याचा विचार करण्यापेक्षा झाडाला जशी नवीन पालवी येते व ते पुन्हा जसे जोमाने तेजोमय होताना आपण पाहतो. त्याच अवस्थेचे स्वागत आपल्या आयुष्यात करायचे आहे असे समजून कालक्रमणा करण्यातच खरे सुख आहे. वृद्धाश्रमाकडे डोळे लाऊन बसू नका तर ते निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष पुरावा. आपल्या बरोबरच्यांच्याच संगतीत उर्वरित आयुष्य जगण्याचा “आनंदाश्रम” निर्माण करा. हाच या व्रुद्धदिनाचा संदेश आचरणात आणा व पसरावा सा-या पृथ्वीवर सूर्याचे प्रभात किरणांसारखा !