आरक्षण – एक इष्टापत्ती !

निमित्त…..
-माधव बापट
आरक्षण – एक इष्टापत्ती !

‘आरक्षण रद्द झालेच पाहिजे. रात्रीचा दिवस करून मर-मर मारून अभ्यास करायचा, ९०-९५ टक्के मार्क मिळवायचे आणि ‘तो’ दाखला नाही म्हणून प्रवेशाला वंचित व्हायचं हे किती दिवस चालणार? त्यातून प्रवेश मिळालाच तर दाखलेधारी बाजूच्या बाकावर! जिथं खरं तर एखाद दुस-या मार्काने प्रवेश गेलेला खरा हक्कधारी हंवा. आम्ही असं काय घोडं मारलंय म्हणून आमची लायकी असूनही आम्हाला रोखलं जातंय?’

१० – १२ वीचे निकाल लागताच अशा अर्थाचे संतापजनक उद्गार पोळलेल्या उमेदवारांकडून, त्यांच्या पालकांकडून ऐकायला मिळतात. आपण ते शांतपणे ऐकतो. त्यांना समजावण्याचा, दिलासा देण्याचा वरवर प्रयत्नही करतो.आपण त्याच लाईनीत असलो तर जरा मोठा आवाज करतो. आता कुणी आपलं लवकर त्यात अडकणार नाही, सगळे रांकेला लागलेत असे असेल तर फारसं मनावर घेत नाही. नोकरीतही तुमच्या मागून आलेला, लायकी नसलेला एखादा तुम्हाला लाथ मारून पुढे जातो आणि तुम्हालाच शिकवू लागतो. तेंव्हां होणारा संताप, मनाची तडफड आणि अन्याय फक्त आपण सहन करतो. हतबल होऊन पहात राहतो.

पण मग, या समस्येवर कांही करण्याचा आपण प्रयत्न करणात आहोत की, नुसतीच चर्चा? आज पन्नास टक्के राखीव झाले. इतर राखीव धरून ही संख्या अजून बरीच पुढे जाते. प्रत्यक्षात फार थोडी टक्केवारी आपल्या वाट्याला येते. राज्यकर्त्यांना यात काहीही देणं-घेणं नाही, त्यांना व त्यांच्या सगेसोय-यांना याची कसलीही फिकीर नाही. शिक्षण संस्थाही त्यांच्याच आहेत. शिक्षण सम्राट सर्व फायदे घेऊन करोडोची माया जमा करतायत. तरीही या शिक्षणसम्राटांचे तसे आपल्यावर उपकारच आहेत. पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी व मेनेजमेंटची विद्यालयं होती. या शिक्षण साम्राटांच्याच आशीर्वादानंच शेकडो विद्यालय निर्माण होऊन अशा संधी निर्माण झाल्याहे नाकारून चालणार नाही. पण या संधीचा आपण पुरेपूर फायदा मात्र करून घेतला पाहिजे. हे शिक्षण महाग आहे म्हणून त्याकडं पाठ फिरवता कामा नये कारण फक्त शिक्षण आणि शिक्षणच आपल्याला आता हात देणार आहे.

मग त्यासाठी कांही वेगळं करता येईल का? आपल्यातले उद्योजक, व्यावसाईक, नोकरदार या सर्वांनी एकत्र येऊन एखादा कॉरपस फंड उभारून आपल्या विद्यार्थ्यांना अशा संधीचा पुरेपूर फायदा उठवता येण्यासाठी आर्थिक कर्ज (मदत नव्हे) म्हणून देता येईल का; याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज आपले हजारो तरुण परदेशात आहेत. त्यांनी सर्व माहिती संकलित करून तिथल्या संधीचा इथल्या तरुणांना उपयोग करून देता येईल अशी एखादी मध्यवर्ती यंत्रणा उभारता येईल का? हेही पाहिलं पाहिजे.

आरक्षण अटळआहे. दिवसेंदिवस हे वाढतच जाणार आहे. आज सरकारी नोक-यांचं आरक्षणाचं लोण उद्या खाजगी नोक-यातही येऊ पहात आहे. अशावेळी आपल्या उद्योजकांच्या मदतीनं आपल्यातील कुशल, होतकरू व पात्र लोकांना संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली गेली पाहिजेत. जिथंजिथं म्हणून ‘आपला’ आहे तिथं तिथं आणिक ‘आपले’ एक व्रत म्हणून घेतले गेले पाहिजे. असे सगळे ‘आपले’ जर एकत्र तर ‘राखीव’ची राखरांगोळी व्हांयला वेळ लागणार नाही.हे राखीवचं अरिष्ट अडवण्यासाठी एकत्रपणाची भक्कम भिंत उभारली तर कांहीच अशक्य नाही आणि मग ती आरक्षणाची आपत्ती इष्टापत्ती ठरल्याशिवाय राहणार नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *