निमित्त…
-माधव बापट
जर्रे ने (कण) आफताब से (सूर्य) कहा,
मैं तुममे समाया हुआ हूँ, मुझे अपना लो |
हंसकर आफताब ने कहा,
ज़रा अपने भीतर देखो, खुदको पहचानो, स्वयं कुछ बनो,
कल तुम्हारा होगा, तुम खुद रोशनी फैलाओगे |
सकारात्मक किंवा पोझीटिव्ह थिंकिंगचं उत्तम उदाहरण म्हणून वरील पंक्तीकडे पहावंच लागेल. आपल्या संघाच्या संदर्भात सुरवातीची काही वर्ष आणि मधल्या काळातील सुमारे सात वर्ष ही आत्मविश्वास काहींसा गमावाल्यासारखी झाली होती. पहिल्या सहा वर्षात ७५० आजीव सभासद आणि ब-यापैकी कार्य करणारी ही संस्था त्यानंतर जणू स्वत्व गमावून बसली होती. उत्साहाच्या भरात सुरु केलेली संस्था बंद होणार की काय अशी अनामिक भीती आणि त्यामुळे काळजी वाटू लागली.
पण संघाचे माजी कार्यवाह श्री. वा. गो. परांजपे या स्वाभिमानी चित्तपावनी वृत्तीला ही खंत अस्वस्थ करूं लागली. शाखेच्या अस्तित्वाची अनावश्यक बंधने झुगारुन संघाची स्वतंत्र स्थापना करावी ही संकल्पना मुळ धरू लागली, आणि माझ्यासह श्री. बापूसाहेब कर्वे (अध्यक्ष- १९९४) आणि श्री. भालचंद्र कोल्हटकर (अध्यक्ष- १९९८) यांचं उत्स्फूर्त सहकार्य मिळत राहिलं. समोरच्यांनी मोठे होण्याचा आशिर्वाद देण्यापूर्वीच स्वत्व राखण्याच्या आणि स्वबळावर यशस्वी होण्याच्या विश्वासामुळे यथावकाश म्हणजे ऑगस्ट २००० मध्ये ‘चित्तपावन ब्राम्हण संघ, डोंबिवली’ अशा स्वतंत्र नामाभिधानाने पाया भक्कम झाला. आता तर दिवसागणिक ही संस्था ज्ञातीभिमुख होते आहे, सभासदांचा विश्वास संपादन करीत आहे, ‘युवोन्मेष’ सारखा तरुणांचा गट कार्यरत होतो आहे, नवीन सभासदांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर विशेष बाब म्हणजे जुने सभासद वाढीव वर्गणीसाठी केलेल्या आवाहनाला उत्साहवर्धक प्रतिसाद देत आहेत.
नवनवीन उपक्रम, बहारदार कार्यक्रम, व्यावसायिकांचा मेळावा, व्यावसायिकांची आकर्षक सूची, ‘चित्तवेध’ त्रैमासिकाचं तीन वर्षापासून सातत्यानी प्रकाशन, कालबद्ध निधी उभारणी, शिस्तबद्ध संघटन व नियोजन यासारख्या बाबींमुळे संघ सतत प्रगतिपथावर आहे.
संस्थेच्या उभारणीपेक्षा अधिक महत्व ती कार्यरत ठेवायची, नावारूपाला आणायची, आत्मनिर्भर करायची याला आहे, असतं, असं जाणकार सांगतात आणि म्हणूनच व्यक्ती नव्हे, संस्था मोठी आहे. संस्थेमुळे व्यक्ती घडत जाते. आपल्या कामावरील निष्ठा, व्यवहारातील पारदर्शीपणा, अनेकांना जोडण्याची, सामावून घेण्याची कला, प्रसंगी कर्तव्यकठोरता, शिस्त व वेळेचं महत्व ओळखून जवळपास अचूक निर्णय घेण्याची क्षमता, ‘मी’पेक्षा ‘आम्ही’ ला अधिक महत्व देण्याची वृत्ती, भगवंतावरची अढळ श्रद्धा आणि ‘मी करतो’ म्हणण्यापेक्षा ‘तो करवतो’ हा स्वभाव, या सारख्या कार्यकर्त्यांमुळे या संस्थेला आज हे भाग्य लाभले आहे.
संस्थेच्या जडणघडणीत खारीपासून ते हत्तिएवढा वाटा उचलणारी ज्ञात-अज्ञात मंडळी आहेत हे निःसंशय. संपादक सदस्य सर्वश्री दिलीप आमडेकर, मुकुंद गाडगीळ, नारायणराव व सौ. नलिनी घुले, काका म्हसकर आणि कै. दा. रा. गाडगीळ यांचेमुळे या संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली हे काम जेवढे मोठे तेवढेच सर्वश्री ऍड.विवेक वाटावे, डी. पी. म्हैसकर, मधुकर चक्रदेव, डॉ. जयंत गोखले, डॉ. उमेश दाते, अनेक देणगीदार, प्रायोजक, जाहिरातदार, निवडक कार्यकारी सदस्य आणि निःस्वार्थी कार्यकर्ते यांचेमुळे ही संस्था टिकून राहिली, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत राहिली. त्यांचंही मोल मोठं आहे.
अशा महोत्सावाचं निमित्त करून उत्साहाच्या भरात कांही जणांकडून संकल्प केले जातात. त्यात व्यवहारीपणा कमी आणि प्रसिद्धी जास्त. अनेकांकडून सुचना येतात पण त्यामध्ये त्यांचा सहभाग असतोच असं नाही. त्यापेक्षा आपल्यासारख्या समविचारी, कृतीशील, व्यवहारी, निःस्वार्थी व्यक्तींचा गट बनवून, भान ठेवून, कामाची आखणी करावी आणि बेभान होऊन कार्यवाही करावी हेच योग्य. जुलैच्या चित्तवेधमध्ये आम्ही एक प्रश्नावली दिली असून त्यासारखी बरीच कामं करता येण्यासारखी आहेत. आपल्या ज्ञातीबांधवांसाठी काम करतांना दुजाभाव नसावा, स्पर्धा असलीच तर निकोप असावी, वाणी मधुर आणि कृती संयमी असावी, आचरण ब-याच अंशी नेमके व शुद्ध असावे, समोरच्याचं कौतुक करतांना मोकळेपणा असावा, केवळ छिद्रान्वेषी असू नये.
संघाची स्वतःची एक भव्य वास्तू असावी असं अनेकांना वाटतंय आणि त्यासाठी आम्हीही गेल्या दोन वर्षापासून प्रयत्नात आहोत. एवढं मोठं काम उभारायचं म्हणजे अनेकांचा सहभाग विविध स्तरांवर हांवा. आपण सर्वांनी नेटाने प्रयत्न करूया आणि हे स्वप्न सत्यात आणूया.
बुद्धिमत्ता आणि क्षमता असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे आपले हुशार विद्यार्थी महाविद्यालयीन वा उच्य शिक्षणापासून वंचित राहतात आणि दुर्धर आजारांनी त्रासलेले आपले बांधव जीवनानंदापासून दूर राहतात, त्यांना सक्षम करण्यासाठी मोठा निधी उभारायाचाय. सरकारी स्तरावर नोकरीचं दारं बंद, त्यातून उद्योग जगतातील अस्थैर्य आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत. त्यांच्यामध्ये विश्वास जागावायाचाय, त्यांना आत्मनिर्भर करायचय. असं आणखी बरंच काही !
आपण चित्तपावन आहोत, समाजाचं नेतृत्व करणा-या दिग्गज विभूती फार मोठे कार्य करून गेल्या. प्रसिद्धीपराङमुख आणि झोकून देणारी माणसं आजही आपल्यामध्ये आहेत. त्यांचा आदर करायला हंवा, आदर्श ठेवायला हंवा, त्यांचे मार्गदर्शन मिळवायला हंवे. ह जगन्नाथाचा रथ पुढे पुढे नेण्यासाठी अनेकांचा हातभार हंवा आहे. भगवान परशुरामांचा आशीर्वाद तेंव्हाच मिळेल. इत्यलम् !