निमित्त…..
-माधव बापट
पावसाळा……..मनांतला
आमच्या भागात घाटावर मुळातच पाउस कमी. वळवाचे झडझडून दोन-चार पाउस ठरलेले. मृगाच्या मुहूर्तावर वरुणराजाचं आगमनही ठरलेलं. कधी थोडं मागं पुढं व्हांयचं इतकंच. आठवडाभर हजेरी लावून परत शेतीकामाला उघडीप. पेरण्याबिरण्या झाल्या की परत शिडकावा, पण संततधार पाउस असा नाही. माझा गांव डोंगर पायथ्याशी वसल्यामुळं ना नदी ना मोठा ओढा.
पावसाळी हवा मात्र नवरात्र दर-यापर्यंत असे.आषाढातली रिपरिप संपली की श्रावणातला ऊनपावसाचा खेळ चालू व्हांयचा. याच दिवसात घरोघरी पोराटोरांच्या बागकामाला ऊत यायचा. प्रत्येक घराला अंगण असायचं. परसादारही असे. छपराच्या पाण्याखालची जमीन बागेसाठी ठरलेली. पावसांत ओली झालेली जमीन खणायला विशेष कठीण जात नसे. बरं त्यासाठी मोडकी पळी, लोखंडी सळी, लाकडाची टोकदार ढलपी कांहीही चाले. झकास वाफा तयार झाला की इकडून तिकडून विटांचे तुकडे जमा करून त्याला छानशी किनार लावायची. हे काम दर पावसाळ्यात ठरलेलं.कारण पावसाळ्यात लावलेली तेरडा, झेंडू, डेलिया, शेवंतीची रोपं आपापला फुलं उधळायचा कार्यक्रम करून हळूंच निरोप घ्यायची. जास्वंद, तगरी, चमेली, गुलाब मात्र उन्हाळ्यातही जीव धरून राहायचे.
नर्सरीतून रोपं आणणं हा प्रकार आम्हाला माहीतच नव्हता. तेरडा, झेंडू, डेलियाची रोपं नाल्याच्या कडेला, इकडं तिकडं कडेला उगवलेली सापडायची. ती आणून वाफ्यात लावायची. छाटणी केलेल्या गुलाबाच्या फांद्या मिळवून घरातल्या अडकित्यावर हंळूच कब्जा करून त्याचे वितभर लांबीचे तुकडे करायचे, बुडाशी थोडंस शेणखत घालून गुलाबाच्या काटक्या ओळीनं वाफ्यात लावायच्या आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक छोटा शेणगोळा लावायचा. शाळेत जाता-येता खेळायला पळताना पहिला कार्यक्रम वाफ्यातली झाड किती मोठी झाली ते बघायचं. कुठल्या कलमाला डोळा फुटला ते निरखायचं. बरं हे बागकाम सगळ्याच घरांच्या अंगणात. त्यामुळे कुणाच्या गुलाबाला आधी डोळा फुटतोय याची चढाओढ . कलमांना डोळे फुटले की, सगळ्यांना दाखवण्यासाठी घालमेल. बरं हे फुटलेले डोळे बोट वाकडं करूनच दाखवायचे, सरळ नव्हें!
गांवालगतच शेती, काही बागायती. आमच्या शाळेला लागूनच चांगलं पंधरा – वीस एकराचं वावर (शेत) होतं. शेतात आमराई अशी वेगळी नव्हती पण आंब्याची झाडं मुबलक होती आणि विशेष म्हणजे त्यात मोर होते. तेव्हा मोरांची शिकार वगैरे होत नव्हती. मोरापिसांसाठी मोर मारल्याचं कधी कुणी वडीलधारे बोलल्याचही ऐकिवात नव्हतं. मोरांनाही गांवकरी अंगवळणी पडले होते. पांच-दहा हातावरून कोणी चाललं तरी ते बिचकत नसत. पिसारा फुलवून नाचणारे मोर या दृश्याचं आम्हाला कधीच अप्रूप वाटलं नाही. आमच्या शाळेपाशी रोजच हा नयनरम्य सोहळा आम्ही पाहायचो.
प्रत्येकाच्या पुस्तकात एखाद दुसरं मोरपीस हटकून असायचंच. बरं ते नुसतं ठेवायचं नाही, त्याच्या डोक्यावर कुंकू घालायचं. असं रोज कुंकू घातलं की म्हणे त्या पिसातून दुसरं पीस मिळायचं. सोन्या फडणीस, विन्या जोशी हटकून महिन्या दोन महिन्याने पिस मिळाल्याचं सांगायचे, नव्हें तसं छोट्या पिसावर मोठं पिस दाखवायचे. पण आमची बरीच बुकं नुसत्याच कुंकवानं लालेलाल झाली. आई-बाबांचा प्रसादही त्यासाठी अनेकदा खाला. एके दिवशी मलाही एक छोटंसं पिस मिळालं. मी माझ्या बुकात ठेवलेलं ते पिस मोठ्या रुबाबात वर्गात दाखवलं.
पाच-पंचवीस असे पावसाळे पाहिल्यावर मी मुंबईला आलो. घड्याळ्याच्या काट्याला बांधलेली लोकलची चाकं आणि त्याच्याभोवती आपल्याला गरागरा फिरवणा-या या वेगळ्याच चक्रात अडकलो. तिन्ही त्रिकाळ घामाच्या धारा – बाहेर पावसाच्या कोसळणा-या धारा – ट्रेनचा विस्कळीतपणा, त्यांचं वेळी अवेळी धावणं – दरम्यान ट्राफिक जाम होणं, गटारं तुंबणं… एका पावसाळ्यामागुन दुसरा जातोय. मधेच एखादा २६ जुलै जबरदस्त तडाखा देऊन जातो. अनेकांच जीवन होत्याचं नव्हतं करतो. पण मुंबईकरांना हे पावसाळे तितकेच सुखद व आश्वासक वाटतात. मीही आता कांहीसा सरावलोय पण तरीही मनांत कुठेतरी पहिले दहा पंधरा पावसाळे दडी मारून बसलेत, कायमचे!