नववर्ष स्वागत यात्रा

निमित्त…..
-माधव बापट
नववर्ष स्वागत यात्रा

दोन तीन आठवड्यांपूर्वी एका रविवारी मी आणि माधवराव घुले आपल्या संघाच्या कार्यालयात बसलो होतो. माधवराव संघाच्या वार्षिक अहवालावर शेवटचा हात फिरवत माझ्याशी बोलत होते, इतक्यात संघाच्या युवोन्मेषचे टवटवीत चेहरे आंत डोकावले. ‘अरे या, या. ‘ माधवराव म्हणाले, आणि बघता बघता संघाची तरुणाई कार्यालयात स्थानापन्न झाली. ‘साप्ताहिक बैठक कां?’ मी विचारले. ‘नाही, नाही. आज आम्ही स्वागत यात्रेच्या तयारीनिमित्त जमलो आहोत.’ एकानं सांगितलं.

‘गतवर्षी ऐनवेळेस ठरलं, पण यावर्षी जरा जास्त तयारीनं सामील होऊयाअसं आम्ही सर्वांनी ठरवलं’.

पुढे मग काय करायचं , कसं करायचं ही चर्चा चालू राहिली. अगदी सकाळी प्रथम संघाच्या कार्यालयात येवून गुढी उभारायची, पूजन करायचे आणि नंतर स्वागतयात्रेत सामील व्हांयचं, मग त्याचे बॅनर वगैरे इतरही चर्चा. गेल्या दोन वर्षात माधवरावांनी प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या आपल्या तरुणाईचे आता युवोन्मेष असं त्यांनीच नामाभिधान केलं होतं आणि त्याचेच कार्यकर्ते नववर्ष यात्रेतील चर्चा करत होते. मला वाटतं नववर्ष स्वागतयात्रेची ही सर्वात जमेची बाजू आहे. आपला सांस्कृतिक वारसा हातातून निसटतो की काय, तरुण तरुणी दिशाहीन झाल्या की काय? अशी नुसती ओरड करत बसण्यापेक्षा त्याला योग्य वळण दिलं तर त्यातून खूप काही चांगलं निर्माण होऊ शकतं.

असाच दुसरा प्रसंग. आमच्या सोसायटीतील काही मुली एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की सोसायटीच्या आवारात यावर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येस चांगली वीस फुट व्यासाची रंगावली काढायची. त्यांना हवी असलेली सर्व मदत सोसायटीच्या पदाधिका-यांनी देण्याचं मान्य केलं. तशी आमची सोसायटी उपरस्त्यापासूनही खूपच आंत आहे. तरीही स्वागतयात्रेतील सुंदर-सुंदर रांगोळ्यांनी आमच्या सोसायटीतील मुलींनाही एक वेगळीच प्रेरणा मिळालेली दिसून आली आणि त्यांनी ठरवले. छोट्या- छोट्या मुलीही आता दारासमोर आधी रांगोळी काढायची प्रॅ क्टिस करतायत, त्याहून थोड्याशा मोठ्या स्केचेस बनवतायत, दोघी-तिघींनी संस्कार-भारतीच्या एकदिवसीय कार्यशाळेस हजेरीही लावलीय. त्यांच्या आयाही त्यांना मार्गदर्शन करतायत.

स्वागतयात्रेचं फलित काय म्हाणून उगाचच कंठशोष करणा-यांचा आपण बिलकुल विचारच न केलेला बरा. स्वागतयात्रेमुळं डोंबिवलीच्या एकूण समाज जीवनात आपल्या संस्कृतीचा वारसा हळुहळु झिरपतो आहे, त्याचीच ही दोन प्रातिनिधीक उदाहरण म्हणावी लागतील.

बेबंद, बेभान, बेलगाम प्रवृत्तीना आलेला ऊत आणि ऐहिक जीवनापलीकडचं काही नाही असंच जणू काही चित्र उभं करणा-या, तिन्ही त्रिकाळ सर्व वाहिन्यांवर चालू असलेल्या मालिका यामुळं आपलं सामाजिक, सांस्कृतिक जीवनच उध्वस्त होतं की काय असं वाटत असतानाच स्वागतयात्रेच्या संकल्पनेला इतक्या उत्स्फुर्तपणे जो विस्मयकारी प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे अजून सर्व काही हाताबाहेर गेलेले नाही असं वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात वर्षप्रतिपदेला विराट स्वरूपात दिसणारी डोंबिवलीच्या काना-कोप-यातून शिस्तबद्धपणे अवतरणा-या स्वागतयात्रेची तयारी मात्र तशी महिना दीड महिना आधी चालू असते. थोडासा कानोसा घेतला तर कुठे ढोलताशांच्या साथीने लेझीमचे हात बसतायत, कुठे चित्ररथांची जुळणी चालू आहे, तर कुठे यावर्षी कुठलं पथनाट्य करायचं याचाही विचार होताना दिसतो. सर्व थरातील आबाल-वृद्धांना आकर्षित करणारी ही स्वागतयात्रा आता डोंबिवलीच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिली आहे. वर्षप्रतिपदेच्या स्वागतयात्रेत सामील होऊन आपण सर्वजण हा आनंद लुटुया आणि येणा-या प्रत्येक वर्षाकांठी तो बहरत राहावा अशी श्री गणेशचरणी प्रार्थना करुया!!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *