निमित्त – नेमेचि येतो मग

निमित्त…..
-माधव बापट
नेमेचि येतो मग…..

नेमेचि येतो मग पावसाळा! हे जितकं खरं इतकचं नेमेचि येतो निकाल दहावी बारावीचा हेही खरं. ज्यांचा पाल्य दहावी व बारावीत असतो त्यांची ती वर्षे म्हणजे युद्धच! बेबीची किंवा रोहनची दहावी किंवा बारावी म्हणजे ते पूर्ण कुटुंब मी माझे आई वडील, असल्यास भाऊ व बहिण प्रचंड तणावग्रस्त असतं.

आपल्या सा-या आशा आकांक्षा हे त्या विद्यार्थी नामक गाढवावर लादून हे पालक दारावेशासारखे दिग्र्यांच्या बाजारात लाईन लावून उभे असतात. ‘शन्ना’ नेहमी सांगतात तसं, रेसमध्ये धावणा-या घोड्याला धावायाचं एवढंच माहीत असतं, शर्यत वर बसणा-या जॉकीला जिंकायाची असते . माझा पाल्य डॉक्टर व्हांवा, इंजिनियर व्हांवा, अमुक व्हांवा, त्यानं एखादं वाद्य शिकावं, नृत्यही आलंच पाहिजे, चित्रकला हंवीच हंवी, बोलणा-यांचा जमाना आहे, त्यात मागं नाही राहता कामा. क्रिकेट ओघानंच आलं. थोडक्यात ज्याचा ज्याचा आम्हाला गंधही नाही ते सारे गुण बेबी किंवा बाब्यात ठासून भरायला हवेत आणि ते अगदी सोप्प आहे. संस्कारापासून झाडून सगळं आता ‘कोचिंग’ क्लासेस मध्ये त्यांच्या त्यांच्या दरानुसार प्रतवार बाजारात मांडून ठेवलंय. लादा आपल्या गाढवावर आणि आणा त्याला पाहिलं. त्याची शाळा कुठली असावी हे तर आम्हीच ठरवणार ना ! माध्यम ? इंग्रजी ! हे काय विचारण झालं ? पण त्यातही बेस्ट शाळा निवस्डली, दि बेस्ट क्लास लावले. दहावी, बारावीत तर नेहमीच क्लास शिवाय प्रत्येक विषयात स्पेशल कोचिंग, पंधरा वीस हजार प्रती विषय मोजलेत, महाराजा आहात कुठं ? मग एवढं करून त्याचं नाव मेरीट लिस्टमध्ये आलंच पाहिजे. आम्ही म्हणतो तीच त्याची लाईन. आणि तेच त्याचे भवितव्य, बस्स !.

मुळात आपली कर्तव्य लेकराला जास्तीत जास्त क्लास लाऊन जे हंवं ते सारं त्याच्यापुढं उपलब्ध करून देऊन आणि त्याला सारखं शर्यतीत पळवून संपताहेत, असं मानण्यातच कुठंतरी प्रचंड घोटाळा झालाय. तुम्ही हंवा तेवढा पैसा फेकताय, थोडासा वेळ तुमच्या मुलांसाठी द्यावा की त्याची भूक तुमचा सहचर ही आहे. प्रोग्रेस रिपोर्टवर सही करतांना पाच मार्क कमी कां? क्लास्स्वाली काय करतेय, मग दुसरा क्लास लाव. इथं संपत नाही. त्याच्या बरोबर बसायला हंवं. त्याला काय अडतंय हे तुम्ही समजून घ्यायला हंवं. एखादा विषय आलाच पाहिजे म्हणून येत नाही, तुम्हाला आला का? नाही नां? मुलांच्यात, तेही आपल्याच, जास्तीत जास्त वेळ घालवलात तर त्याचा काळ समजेल, त्याची आवड कळेल, आणि मग त्यांना मार्गदर्शन करा. त्यांचे मार्ग ठरवू नका शेजारच्या घरातला बोर्डात आला म्हणून तुला यायलाच पाहिजे, तो डॉक्टर, मग तुही कां नको? हा आपला हट्ट त्याच्यावर लादण्यापेक्षा त्याची निसर्गतः आवड, त्याचा स्वभाव, त्याची बौद्धिक झेप याचा आपण विचार करुंया. जे आहे ते उत्तम बनविण्याचा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करू, मग क्षेत्र कुठलं का असेना, यशाचा झेंडा तुमच्या पाल्याच्याच हाती असेल याची खात्री बाळगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *