वेचक-वेधक
दिव्या दिव्या दिपत्कार!
सौ. मालती काळे
पुण्याला आम्ही दर दिड-दोन महिन्यांनी जातोच. तिथेही आमचं स्वतःचं घर आहे; पण माझं मन तिथे रमत नाही. असंच एकदा पुण्याला गेलेले असताना दिवसभर झाडझूड व स्वच्छता करून मी थकून गेले होते. बाहेर जावंसं वाटत नव्हतं. बाहेर गेल्यावर फ्रेश वाटेल म्हणुन ह्यांनी खूप आग्रह केला, पण छे! मी कांही गेले नाही.एकटीच घरात बसून राहिले.खिडकीत बसून राहिले.खिडकीत बसून सूर्यास्ताची शोभा पहात होते. काय मजा आहे ना! समोर डोंगराच्या मागे जात असलेला लाल भडक सूर्य आपल्या रंगांच्या विविध छटाञ्चि आकाशात उधळण करत होता. ते दृश्य फारच विलोभनीय होते आणि असा सूर्यास्त मी माझ्या घरात बसून एकटक पहात होते. त्यामुळे माझं मन खूप प्रसन्न झालं. आणि नकळत माझे हात जोडले गेले.
“मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज जोडूनी दोन्ही करा”, हा दिनकर लहान-थोर, गरीब-श्रीमंत,राजा-रंक असा कोणताही भेद न करता सर्वांना सारखा प्रकाश देतो. त्याच्या अस्तानंतर मात्र घरात सर्वत्र अंधार पसरला होता. घरातील दिवे लागले होते. तेंव्हा मनात आलं की, परमेश्वराने लावलेला हा दिवा जोपर्यंत आकाशात आहे तोपर्यंत आपले सर्व व्यवहार सुरळित चालतात, मग घरात दिवे नसेनात का!
दिव्याची ही कल्पना त्या परमेश्वराला कशी सुचली असेल? सगळंचं अजब आहे आणि मग हळूहळू त्या दिव्याच्या अनेक रूपांचं चित्रण माझ्या मनात सुरु झालं. आपल्या जन्मापासून शेवटापर्यंत दिव्याची किती रूपं आहेत याची उजळणी करू लागले.
मुलगा जन्माला आल्यावर ‘वंशाचा दिवा जन्माला आला हो!’ असं म्हणुन तिथपासूनच सुरवात होते. त्या बाळाच्या ५-६ वीच्या दिवशी जेंव्हा जिवती-सातवी आपलं भाग्य रेखाटायला येतात तेंव्हा त्यासाठी पेन्सील, वही व दिवा अशी तयारी करून ठेवतो.बारशाच्या वेळेला पाळण्याखाली दिवे ठेवून बाळाचे नांव ठेवण्याची पद्धत आहे. तेंव्हा मात्र हे दिवे पिठाचे केलेले असतात.देवाजवळ आपण समई लावतो व दररोज संध्याकाळी शुभंकरोती म्हणताना त्याला वंदन करून म्हणतो, “दिवा जळो देवापाशी, उजेड पडो तुळशीपाशी” त्याच्या उजेडाने घरामध्ये इडा-पीडांना स्थान नसते. मात्र बाहेरून येणा-या लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग सुकर होतो आणि त्याचबरोबर आपल्या धन्याला उदंड आयुष्य मिळो अशी आपण त्याची प्रार्थना करतो. हळूहळू ते मूल मोठं होतं. खूप शिकून परदेशात सुध्दा जातं, तेंव्हां खूप समाधान मिळतं. आपल्या वंशाचा दिवा तेजाळत आहे असं पाहून जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एखादा मुलगा द्वाड बनतो, कुमार्गाला लागतो अशावेळी असंही म्हटलं जातं, काय दिवे लावणार आहे कोणास ठाऊक!
कोणत्याही कार्यक्रमात दीप प्रज्वलित करून त्याच्याच साक्षीने कार्यक्रम उजळून निघू दे, चांगला होऊ दे असं म्हणुन सुरवात होते. लग्नकार्यात तर जावयाला औक्षण केल्याशिवाय जणु मांडवात येण्यास परवानगी नाही. औक्षणासाठी दिवा अत्यंत आवश्यक आहे. इथे लामण दिवा किंवा निरंजन वापरतात. हा दिवा तेलाचा असतो. त्यात अशावेळी नेहमी दोन वाती करून मगच ओवाळतात. अशी समजूत आहे की, ह्या दोन वाती म्हणजे प्रकृति व पुरुष म्हणजेच स्त्री-पुरुष यांचं मिलन. म्हणजेच माया आणि परमेश्वर एकत्र येऊन विश्वाचा प्रपंच करतात आणि म्हणूनच स्त्री पुरुष एकत्र राहिले तरच ते हा संसार सुखाने तरून नेऊ शकतील. हे भगवंतांनी आपणास दाखवून दिलेच आहे आणि ही पृथ्वी त्या दोघांचं चंद्रसूर्याच्या दिव्यांनी औक्षण करत आहे.
त्याप्रमाणे आपण वाढदिवस, पाडवा, भाऊबीज अशावेळी औक्षण करतो आणि मुख्य म्हणजे असा आशीर्वाद देतो किंवा मागतो की ह्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रत्येकाचे आयुष्य उजळू दे व त्याचा प्रकाश किर्तीरुपाने पसरू दे. हे फक्त आपल्या भारतीय संस्कृतीतच अनुभवण्यास मिळते. पाश्चात्य देशांत दिवा (मेणबत्ती) विझवून समारंभ साजरा करतात.
ह्या दिव्याचे विविध आकार व प्रकार आहेत. कुठे मातीचे , कधी धातूचे, कधी काचेचे कंदीलही आपण पाहतो. दिवाळीत तर कागदाचे व थर्मोकोलचे दिवे करून आकाशात सोडतात. म्हणजेच आकाशकंदील लावतो. ह्यावरून आठवण झाली. आमच्या काकड आरतीत एक गाणं आहे “हृदय आकाशी आकाशदीप सदगुरूने त्या लाविला” म्हणजेच प्रत्येकाच्या हृदयात चैतन्यारुपाने हा दिवा तेवत असतो. तो सगळ्यांच्या हृदयात आहे. पण त्याची जाणिव मात्र आपल्याला नसते. ती जाणीव सदगुरूच करून देतात. त्यासाठी संतांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे. ह्या दिव्यात सतसंगतीचे तेल घालायचे आणि हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजेच काय तर आपण परमेश्वराशी नामाने अनुसंधान ठेवले तरच ते शक्य होते.
तुळशीजवळ दिवा लावून आपण म्हणतो की, ह्यामुळेच माझ्या घरात धनलक्ष्मी व सास्वती वास करत आहे. त्यामुळे एकमेकांच्या प्रेमाची वृद्धीही होते. असं चालत असताना माणुस ६० वर्षाचा केंव्हां होतो ते कळतही नाही. मग त्याची साठी शांत करतात.
एका मोठ्या तबकात ६० दिवे लावून त्या व्यक्तीला औक्षण करतात. तसेच ८० वर्षानंतर त्याला सहस्त्रचंद्र ज्योतींचे दर्शन होते व ते पुण्या पदरात पडते. म्हणून तोही सोहळा होतो. अखेर माणसाचा अंत होतो. तेंव्हां त्याची आत्मज्योत १० दिवस आपल्यामध्ये रहावी म्हणून आपण १० दिवस दिवा लावतो.
दीपदानाचे महत्व फारच आहे. अधिक महिन्यात जावयाला अनारशाच्या वाणामध्ये दिवा लावून देण्याची पद्धत आहे. ब्राम्हणालाही दीपदान करतात. पूजेमध्ये तर प्रथम दिव्याची पूजा करतात आणि नंतर इष्ट देवतेची. नवरात्रात तर ९ दिवस देवीच्या पुढे अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे. त्याची रचना अशी असते. एका बाजूला शंख, दुस-या बाजूला घनता आणि मध्ये दिवा. शंख हे शौर्याचे प्रतिक, घनता हे नादाचे प्रतिक तर दिवा हे शक्तीचे प्रतिक म्हणून मानतात.
अरे, ह्यामध्ये हे सांगायचंच राहून गेलं, ते म्हणजे घरातील विजेचे दिवे. ह्याचा शोध एडिसनने लावला आणि हळूहळू त्यात प्रगती कौन अनेक ठिकाणी त्याचा उपयोग केला. पण त्यामुळे आपण परावलंबी मात्र झालो. बरीचशी कामे आपण त्याच्या मदतीने करू लागलो. हळूहळू त्याचे दास बनलो. तो नसला म्हणजे आपली कामे ठप्प होऊ लागली. अशा त-हेने ह्या दिव्याच्या बाबतीत किती सांगितले तरी कमीच आहे.