निमित्त…..
– माधव बापट
मला असं वाटलं नव्हतं !
नव-वर्ष स्वागत यात्रा डोंबिवलीतच नव्हे तर महाराष्ट्रातही ठिकठीकाणी इतक्या उत्साहात दरवर्षी निघेल असं कधी वाटलं नव्हतं. संस्कृती रक्षणाचा हा अक्सर ईलाज इतका परिणामकारक व सर्वसमावेशक ठरेल असं कधी वाटलं नव्हतं.
मला असं वाटलं नव्हतं की, स्वातंत्र्यवीर सावराकारांच तैलचित्र संसदेत समारंभपूर्वक लावलं जाईल. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांना जाणीवपूर्वक डावललं गेलं, ज्यांच्या विचारांना प्रयत्नपूर्वक दडपून टाकण्यात आलं, त्या राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि त्याग यांचं दुसरं नांव सावरकर! बॅ.तात्यासाहेब सावरकर !! असं असतानाही तैलचित्राच्या अनावरणापूर्वी व नंतर जे वाद झाले, चालू आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर असावा असंही कधी वाटलं नव्हतं!
एकेकाळी फक्त दोन खासदार संसदेत असताना भाजप केंद्रात सत्तेवर येईल असं कधी वाटलं नव्हतं. सत्तेत आल्यावर एकदा १३ दिवस, मग १३ महिने राहिल्यानंतर २३ जणांच्या कडबोळ्यात पुढील पाच वर्षे काढील असं मला वाटलं नव्हतं!
ज्यांची भाषणे ऐकण्याकरीता आम्ही कॉलेजवीर ७१-७२ च्या दरम्यान क-हाड साता-याहून पुण्यापर्यंत जायचो, सर्वांगाचे कान करून शब्द न शब्द गात्रागात्रामध्ये साठवून ठेवायचो, त्यांचाच पुढे शब्द न शब्द ऐकायला पाच पाच मिनिटे थांबून राहावं लागेल असं कधीही वाटलं नव्हतं.
विरोधी पक्षनेते असताना ज्यांनी आपल्या वाणीच्या अमोघ अस्त्रानं अवघ्या भारतीयांच्या मनात ‘त्यांच्या’विरुद्ध एक कोपरा कायमचा धगधगत ठेवला पण ते स्वतः सत्तेत आल्यावर संसदेवरचा ‘त्यांचा’ हल्ला उधड्या डोळ्यांनी पहात राहतील असं कधी वाटलं नव्हतं. १६ जवानांची कातडी सोलून त्यांच्यावर कमालीचे अमानुष अत्याचार करून त्यांची पार्थिवं अत्यंत विटंबित झालेली पाहून आमचं रक्त तापून उठत नाही. त्याचा बदला तर सोडाच पण फक्त ‘यह बरदाश्त नही हो सकता’ असं म्हणण्यापलिकडे आम्ही जाणार नाही असं कधी वाटलं नव्हतं.
सामान्यांची गरज होऊन राहिलेला टेलिफोन इतका महाग होईल आणि त्या महागाईचं कारण माननीय महाजन ठरतील असं कधी वाटलं नव्हतं.
पाच वर्षात अगदी कायापालट होईल असं कधी वाटलं नव्हतं पण परकाया प्रवेश केल्यासारखे हे आणि ते इतके एकरूप झाल्यासारखे दिसतील, वागतील असं मात्र कधी वाटलं नव्हतं. केंद्र सरकार पाच वर्षे झाल्यावर लाखो रुपयांच्या जाहिराती छापून आपली पाठ थोपटून घेईल असं कधी मला वाटलं नव्हतं.
असं मला वाटलं नव्हतं
पण बरचसं आंत कुठेतरी साठंल होतं !
वरवर तसं सारं शांत होतं
पण आतल्या आंत काळिज फाटलं होतं !!