संस्कार आणि आदर्श सांप्रत काळाची गरज

वेचक-वेधक
संस्कार आणि आदर्श
सांप्रत काळाची गरज
– सौ. पुष्पा दीक्षित

तेजःस्पर्शाने दूर होई अंधार
जसा मुळांचा वृक्षा असे आधार
मना घडवी संस्कार

संस्कार ही एक दृश्य संकल्पना आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या उक्ती आणि कृतीतून व्यक्त होत असते. एखाद्या प्रथमदर्शनातच त्या व्यक्तीचा वक्तशीरपणा, आदाब, संघभावना समाजाच्या मनावर ठसा उमटवून जाते. संस्कार म्हणजे शिस्त, संस्कार म्हणजे विनम्र भाव, संस्कार म्हणजे थोरामोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी. संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. मनाची अवस्था आहे. स्व पासून सुरु होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोचवू शकतो.

संस्कार हा कालातीत आहे. समाजाला संसाक्रांची गरज पिढ्यानपिढ्या भासत आली आहे. सांप्रत काळात त्याची आवश्यकता जरा जास्तच आहे एवढेच. १७व्या शतकात समर्थ रामदासांनी जे महान कार्य केले त्यात त्यांनी लिहिलेले ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ सारखे मनाचे श्लोक हे तर लहानथोर सर्वांच्याच मनावर संस्कार करून जातात. आपण सारे भारतीय संस्काराप्रीय आहोत. संत तुकाराम, संत एकनाथांसारख्या संतश्रेष्ठीपासून लो. टिळक, स्वा. सावरकर, समाजसुधारक आगरकर यांचेसारख्या समाजधुरिणांचे आपण कायम ऋणी राहिले पाहिजे.

बालवयात होणारे संस्कार हे अधिक परिणामकारक असून ते आईवडील व शिक्षक यांचेकडून होत असतात. मानवाच्या ‘अनुकरणप्रियता’ या गुणामुळेच संस्कारप्रसार होत असतो. संस्काराच्या पाय-या चढतचढतच माणुस आदर्शापर्यंत पोचू शकतो. वस्तुतः संस्काराचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे कौटुंबिक संस्कार आणि दुसरे सामाजिक संस्कार. मुल जन्माला येते तेव्हां सर्वप्रथम घर हेच त्याचे विश्व असते. घरातील माणसे हीच त्याची आदर्श असतात. कुटुंबियांच्या आपापसातील वागण्याचा चांगला अगर वाईट ठसा मुलांच्या मनावर कोवळ्या वयातच उमटला जातो. मुल जेव्हां घराचा उंबरठा ओलांडू लागते तेव्हां शेजारी व शाळेत जाऊ लागते तेव्हां गुरुजन, शिक्षक हे त्याचेसाठी आदर्शच असतात. परंतु आजच्या काळात आईवडील दोघेही करियरप्रेमी असतात. संस्कार करायला घरात आजी आजोबा असतातच असे नाही. शाळांमधून मुलांची पटसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे तिथेही संस्काराची ऐशीतैशीच असते. संस्काराची गरज तर असतेच असते मग यावर उपाय म्हणुन संस्कार केंद्र बनतात. पैसे देऊन मुलांकरीता संस्कार विकत घेतले जातात.

वाचन – संस्कार हा एक चांगला संस्कार पूर्वी मुलांच्या मनावर होत असे. परंतु सध्यस्थितीत ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. वाचनसंस्कार हा युवापिढीला तर अधिक परिपक्व करू शकतो परंतु काय वाचावे याचे योग्य मार्गदर्शन त्यांना होत नाही. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आज वाचन – संस्कृतीवर दूरदर्शन – संस्कृतीने जबरदस्त हल्ला केला आहे. दूरदर्शन – संस्कार हा एक प्रचंड विषय आहे. त्यावर कांही न लिहिणेच उत्तम, या दृकश्राव्य माध्यमाच्या सततच्या मा-यामुळे माणसाच्या माती बधिर झाल्या आहेत.

शैक्षणिक संस्काराबाबाताची दुरावस्था तर विषण्ण करणारी आहे. इयत्ता २ रीच्या परिसर विज्ञान पुस्तकात संयुक्त कुटुंब दुःखी? छोटे कुटुंब – सुखी कुटुंब आई, वडिल, मुलगा, मुलगी; मोठे कुटुंब – दुःखी कुटुंब – आई, वडिल, मुलगा, मुलगी, आत्या, काका, आजी, आजोबा. वास्तविक, मोठ्या कुटुंबाविषयी समजावून सांगाताना आई वडिल व दोनपेक्षा अधिक मुले अशी कुटुंबाची व्याख्या करायला हंवी होती. संयुक्त कुटुंबालाच मोठे कुटुंब संबोधून दोषी ठरवले जाते. संकल्पनांचा असा गोंधळ शालेय अभ्यासक्रमातच केला आहे. अशी चुकीच्या कल्पना मुलांच्या मनावर कुठले संस्कार करणार?

शाळेत मूल्यशिक्षण नांवाचा विषय असतो. मुल्यशिक्षणातील मुल्ये लहान वयातच मुलांच्या मनावर कोरली गेली तर तिथेच सामाजिक संस्कारांची सुरुवात होते. आता प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धा आहे. पदव्युत्तर महाविद्यालये फक्त पदवीधर बनवणारे कारखाने झाले आहेत. तिथे त्यांच्यावर समाजानिष्ठेचे संस्कार कोण करणार? सैन्य दलात करिअर करणा-याला घरातून पाठींबा मिळेलच असे नाही. ब-याच वेळेला समाज कार्याची सुरुवात कोठून करायची याचे योग्य मार्गदर्शन युवापिढीला मिळत नाही. कांही महाविद्यालये मात्र याला अपवाद आहेत. रक्तदान मोहीम, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निवारण अशा उपक्रमात तेथील विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी होताना दिसतात.

ही काळाची गरज आहे, ती काळाची गरज आहे असं म्हणतां म्हणतां आपण विज्ञान – तंत्रज्ञानात कितीतरी झपाट्याने प्रगती करीत आहोत. सर्वांगीण शिक्षण, संगणकीकरण, स्त्रियांचा अंतरीक्शापासून सर्वच क्षेत्रात झालेला प्रवेश या निश्चितच अभिमानाच्या गोष्टी आहेत. प्रसारमाध्यमाद्वारे देश – परदेशही जवळ आले आहेत. मात्र स्वातान्त्रापुर्वीची ध्येयनिष्ठा राष्ट्राप्रती असायची ती आता पैशाप्रती होत चालली आहे. संगणकीय तंत्रज्ञान व त्याबरोबर मिळणारा पैसा हेच आजचे आदर्श आहेत. एखादी व्यक्ती किती कमावते यावर तिचे मोठेपण ठरवले जाते. ती व्यक्ती वडिलधा-यांचा सांभाळ करते कां? समाजाचा आर्थिक स्तर जसजसा उंचावत चालला आहे तसतशी समाजात विलासी वृत्ती, चंगळवाद, भ्रष्टाचार बोकाळत चालला आहे. देशांतर्गत प्रश्नाकडे कुणी गांभीर्याने पाहत नाही. हिंसाचार, दंगली, संप, मोर्चे यामुळे समाजात प्रचंड असंतोष माजला आहे. माणसाचा तोल तर धळलाच आहे पण निसर्गाचाही तोल माणसाने बिघडवला आहे. गुंडशाहीपुढे सुसंस्कृतपणाला मान खाली घालावी लागत आहे. या सा-या गोष्टींचा वाईट परिणाम युवकांच्या विचारांवर नकळत होत आहे. संसद – विधानसभा याठिकाणी चालणारा गदारोळ व तो दाखवणारे दूरदर्शन यावरून काय बोध घ्यायचा?

परंतु अशा समाजातही काही दीपस्तंभ सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत ताकतीने उभे आहेत आणि तेच पुढील पिढ्यांचे आदर्श आहेत. उदा. महाराष्ट्राचेच नव्हें तर सर्व जगाचे भूषण ठरलेले कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे ‘बाबा आमटे’ भारतीय तरुणांच्या मनाची जडणघडण करण्याचे एक भव्य स्वप्न उराशी बाळगुन आहेत. दुसरे म्हणजे सर्वश्री अभय बंग व राणी बंग. आज सगळी तरुणाई अमेरिकेकडे वळत असताना अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘जॉन्स हॉपकिन्स’ विद्यापीठात गुणवत्तेचं रेकॉर्ड करणारी ही दोघं ‘गडचिरोली’ सारख्या मागास भागात आदिवासींसाठी काम करीत आहेत. बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी जातात आहेत. प.पु.कै.पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्वाद्ध्याय परिवारातर्फे तळागाळातल्या माणसांपर्यंत स्वाध्याय – चळवळ पोचवून समाजावर स्वाध्याय-संस्कार केले आहेत. त्यांच्या या संस्कार – वृद्धीच्या कार्यामुळे तेही समाजात एक आदर्श बनले आहेत. इतकं असूनही संस्कारक्षम मनं निर्माण करण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागतील. थोडक्यात संस्कार ही काळाची गरज होती, आहे व असेल.

सध्याच्या जागतिकरणाच्या काळात अत्याधुनिक तन्त्रड्न्यानाबरोबर मनुष्यबळही तितकेच प्रभावी असायला हंवे. त्यासाठी सुशिक्षित युवा-वर्गाने अशिक्षित वर्गाला सुधारण्याचे व्रत स्वीकारायला हंवे. परंतु त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. स्वतःच्या व्यवसायात राहूनही प्रत्येकजण जनसेवेचे व्रत अंगिकारू शकतो हे युवा पिढीच्या मनावर ठसवणे गरजेचे आहे.

सारांश-
जर अंगी बाणाल संस्कार
मिळे स्वप्नांना आकार
स्व-पासून समाजाच्या,
आदर्शाच्या धुंडाळत वाटा
भावी पिढीकडून आशा करुंया उद्याच्या!

Join the Conversation

1 Comment

  1. Very nice
    समाजातीलचांगले विचार एकापासून अनेकांपर्यत
    पोहचतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *