व्यक्तिविशेष
श्री विष्णू शंकर ( दाजी ) दातार
‘श्री लॉंड्री’
-माधव घुले
निसर्गरम्य, शांत डोंबिवलीच्या अवघ्या बारा-पंधरा हजार वस्तीमध्ये एक सनातनी ब्राम्हण कुटुंबातील कॉलेज युवक एका खांद्यावर दप्तर आणि दुस-या खांद्यावर लोकांचे धुलाईचे/इस्त्रीचे कपडे घेऊन रेल्वेतून आणि घरोघर हिंडतो हे दृश्य आणि हाच युवक त्यानंतरच्या केवळ वीस बावीस वर्षात स्वकर्तुत्वाच्या बळावर याच नगरीचा एका लाखावर वस्तीच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो यासारखी अभिमानाची बाब कोणती असू शकेल? नगराध्यक्ष पद भूषवित असताना लॉंड्रीकामाचा वाढवलेला मोठा पसारा स्वतःच्या मोटारीच्या टपावरून कपड्यांची मोठी गाठोडी वाहून नेतांना आमच्या ‘दाजीबानी’ कधी लाज बाळगली नाही. सचोटी व स्वयंशिस्त या अंगभूत गुणांबरोबरच अफाट परिश्रमांनी हा युवक डोंबीवलीकरांना आपलसा करता झाला.
१९४९साली सुरु केलेल्या या व्यवसायाचा सुवर्णमहोत्सव एका साध्या घरगुती पण आनंदसोहळ्यात संपन्न झाला तेंव्हा दाजींना खूप भरून आलं. दाजींसारखीच मेहनत आणि दिवसरात्र कामं करून त्यांचे बंधू कै.आप्पा दातार व चंदूशेट आणि पुतण्या मोहन शेट यांनी हा व्यवसाय बरकतीला आणला, आणि त्याच सचोटीने व दिमाखात आजतागायत वृद्धिंगत केला, मुळापासूनच अनेकांचं प्रोत्साहन आणि कौतुकामुळे एरवी निव्वळ धोबीकाम वाटणांर हे काम दातार बंधूंनी ‘श्री लॉंड्री’ या नांवानी नांवारुपाला आणलं.
पहिली चार वर्ष मुंबईच्या धोबिघाटावरून कपड्यांची गाठोडी स्वतः ने-आण केली पण कपडे हरवण्याच्या त्रासामुळे डोंबिवलीत स्वतःचा धोबीघाट सुरु केला. त्यासाठी सातारहून धुलाईयंत्र आणण्यापूर्वी या व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. आणि पुढे १९५८मध्ये स्वतःच्या मोठ्या धुलाइयन्त्रावर काम सुरु केले. मधल्या काळात म्हणजे १९५२मध्ये अपघाताने लॉंड्री जळाली तेंव्हांही आणि त्यानंतर १९७०च्या दंगलीमध्ये मुद्दाम जाळली तेंव्हाही दातार बंधूंनी स्वतःहून अनेकांना नुकसान भरपाई दिली. ब्राम्हणी संस्कार म्हणतात तो हा!
दाजींच्या स्वभावात ऋजुता आहे. समोरच्या माणसाला दुखावणं त्यांच्या स्वाभावातच नाही. अहंकाराचा वारा त्यांना कधी शिवला नाही की स्वतःच्या कार्याची प्रसिद्धी त्यांनी केली नाही. दाजी, बंधू कै.आप्पा आणि चंदूशेट हे तर अजातशत्रू. घरामध्ये आणि समाजातही यांच्या कर्तृत्वाची भरारी मोठी. सामाजिक संस्थाना या कुटुंबाचा खूप मोठा आधार वाटतो. घरातलं वातावरण कसं सौम्य आणि आदर्श आहे हे अनेक डोंबिवलीकारांनी जवळून पाहिलंय, अनुभवलंय.
डोंबिवली पूर्वेस स. वा. जोशी विद्यालयाजवळ ‘गुरुमंदिर’ आणि बेळगांवचे त्यांचे गुरु काणे महाराज यांचा मठ म्हणजे दाजींचं प्रमुख श्रद्धास्थान आहे. त्यांच्या कामाचा आणि सर्व्हिसचा दर्जा त्यांच्या प्रामाणिकपणाचे द्योतक आहे. सुरवातीच्या दुग्धव्यवसायातून परिटकामाकडे नेलेला हा वेगळा मार्ग यशस्वीपणे आणि तेवढ्याच विनम्रपणे राजमार्गाकडे नेलेले आमचे दाजीसाहेब दातार आणि त्यांचे परिवारास ‘चित्तवेध ‘च्या उदंड शुभेच्छा!
Can you please share Datar sir’s photo?