देशातील संस्थात्मक जीवनाचा ह्रास हा राष्ट्रीय संकटाच्या मुळाशी आहे. ज्येष्ठ विचारवंत व व्यासंगी पत्रकार श्री. गोविंद तळवलकर यांनी केलेल्या ह्या विधानावर दै.लोकसत्ताच्या दि. २७ नोव्हेंबर च्या अग्रलेखात यावर उत्तम भाष्य केले गेलेले आहे. तरीही , मा. गोविंदरावांच्या मूळ विवेचनासोबत हे वाचायला हवे आणि योग्य तो बोधही घ्यायला हवा.
माणूस हा समाजप्रिय आहे असे म्हटले जाते . म्हणजेच तो व्यक्तिगत असण्यापेक्षा समाजगत असणे हे ओघानेच आले. समाजातील अनेक धुरिणांनी आजपर्यंत विविध संस्थाना जन्मास घातले ते राष्ट्रउभारणीच्या उद्देशानेच .अशा धुरिणांचे व्यक्तिगत जीवन हे संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच संस्थागत राहिले कारण बलशाली समाजामुळेच राष्ट्र समर्थ होते.ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच संस्थात्मक विचारांशी अधिकाधिक जुळते घेवून कार्य करणे हेच प्रत्येकाच्या हिताचे ठरते.
तुमच्या आमच्या आणि प्रत्येकाच्या संस्थास्थापनेमागे हाच विचार प्रामुख्याने होता व आहे. पण त्याकडे लक्ष देण्यास व त्याचे महत्त्व जाणण्यास अनेकांना रस नाही हे खरे दुर्दैव आहे. खरे पाहता , कुटुंबसंस्थेपासून आपले संस्थाजीवन सुरु होते म्हणजेच कुटुंब ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्था आहे, व्यवस्था आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे कल्याण साधणे हे त्या व्यवस्थेचे निदर्शक आहे. कुटुंबातील प्रमुख त्याची जबाबदारी घेत असून तोच ह्या व्यवस्थेचा पालक असतो. तद्वतच जबाबदारी स्वत:हून स्विकारणाऱ्या अशा विविध पालकांकडून संस्थांची निर्मिती होत आली आहे. स्वत:बरोबरच अशा समविचारी सहकाऱ्यांना सोबत घेवून या संस्था प्रगती करत आहेत. कारण व्यक्ती ही संस्थेपेक्षा कधीच मोठी नसते हे तत्व त्यांनी पुरेपूर जाणले आणि पाळले.
परंतु हे चित्र आता झपाट्याने बदलते आहे. बदल हवा हे ही खरे पण तो व्यक्तिगत स्वार्थ वा असूयेतून येता नये. व्यक्तिस्तोम माजतं ते इथे आणि म्हणूनच व्यक्तीची इमेज ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्याची इथे स्पर्धा लागते. रचनात्मक विधायक बदल करायचे तर त्यासाठी हवी ती निरलस वृत्ती, मेहनतीची तयारी आणि विचारांचा मोकळेपणा , दुसऱ्याचा आदर करण्याचा मोठेपणा आणि मुख्यत: पत्करलेल्या कामाचे संपूर्ण पालकत्व. माणसं जोडणे ही जर कला आहे तर ती आत्मसात करून एखादी संस्था आपलीशी करावी. काम असं असावं की व्यक्ती म्हणजे संस्था आणि संस्था म्हणजे व्यक्ती होऊन जावं मग तिथे मी पणाचा लवलेश राहत नाही. ‘आम्ही ‘च्या भक्कम पायावर अनेक मी ना उभे करून यशाचा मार्ग दाखवता येतो आणि म्हणूनच मा. स्वामी विवेकानंदांचे उत्तुंग व्यक्तिजीवन आदर्श संस्थाजीवनातून आविष्कृत करणारे मा. एकनाथजी रानडे आज हवे आहेत.
आपला ब्राह्मण समाज अशा व्यक्तीजीवनाचा आणि संस्थाजीवनाचा आदर्श आहे. व्यक्तीनं संस्थागत , समाजगत असणं हाच राष्ट्राला बलशाली करण्याचा मंत्र आहे. हा मंत्र आपण प्रत्येकाने जाणूया, उच्चारुया आणि जपूया . संस्थाउभारणीच्या कार्यात झोकून देणाऱ्यांना बळ देणे ही काळाची गरज आहे. भगवान श्री परशुरामांचे तेज पुन्हा आम्हाला हे सामर्थ्य खचितच देईल पण समर्पित वृत्तीनं त्यांना शरण जायला हवं.