निमित्त…..
-माधव बापट
Happy New Year
“मग काय? आज तू परस्परच ऑफिसमधून जाणार असशील ना ?” वंदनानं, सुधीरच्या बायकोनं कांहीशा नाराजीनं सकाळी डबा भरता – भरता विचारलं.
“हो, कां?” सुधीर तिरकसपणे बोलला.
“कुठं काय ! मी सहजच विचारलं”
“हे ‘सहज’ मला कळतंय. आम्ही सगळे एकत्र येतो मजा करतो म्हणून तुम्ही जळता. तुम्ही बायका जा नां. तुम्हाला कोण नाही म्हणतोय? ”
” मी जाऊ ? अरे, ऑफिसमधून यायला मला तासभर उशीर झाला तर तुला चालत नाही. लगेच पिंकींचं काय झालं असेल? तुला एवढं समजत नाही कां? माझी आई तुला मोलकरीण वाटते कां? एक ना हजार ! लगेच चालू करतोस. तू मात्र केंव्हांही येणार, जाणार.”
“वंदना, सकाळी – सकाळी माझं डोकं फिरवू नकोस.”
इतक्यात पिंकींनं धावत धावत येऊन सुधीरच्या पायाला मिठी मारली, त्याने तिला उचललं. “पप्पा, आई म्हणते आज हॅपी न्यू एअरला तुम्ही ऑफिसमधल्या काकांच्या बरोबर बाहेर जाणार आहात म्हणून….. पप्पा थांबा ना घरी, आपण खूप – खूप मजा करू.”
“पिंकी, पप्पांना जाऊ दे. मज्जा काय, आपणही करू,”
“मग आजी-आजोबांना पण बोलावू या ना. का आपणच तिकडे जाऊया?”
“हे बघ आतातरी मी तुला जाता – जाता आजीकडे सोडते. मी आल्यावर काय ते ठरवू.” सुधीर कडून पिंकीला घेता घेता वंदना म्हणाली.
“तू डबा देतेस की मी निघू?”
“ओट्यावर ठेवलाय.”
आत जाउन सुधीरनं तो बॅगेत ठेवला आणि जाता जाता तीन-चारशे वंदनाकडे देत म्हणाला, “हे ठेव.” ‘एवढे माझ्याकडेही आहेत रे. मला तीन-चारशे रुपये नकोत. तू थांबला असतास तर लाख मोलाचा आनंद झाला असता.’ वंदनाच्या मनात आलं.त्याच्या हातातल्या नोटांकड बघून ती थंडपणे म्हणाली, “नकोत, माझ्यापेक्षा तुझ्याच आज उपयोगी पडतील.” बॅग घेऊन सुधीर तिरमिरीत बाहेर पडला.
जाता – जाता त्याला हेमंतचं बोलणं आठवलं. कांहीना कांही कारण काढून गेल्या पाच – सहा वर्षात हेमंत ३१ डिसेंबरची पार्टी टाळत आलाय. यावर्षी कांहीही करून त्याला बरोबर घ्यायचंच, म्हणून त्याने हेमंतला गाठलं होतं.
“खरंच तू मला आग्रह करू नकोस. मला नाही जमणार. तू अगदी खानापातीलाच बसला आहेस म्हणून सांगतो. ३१ डिसेंबर मी माझ्या कुटुंबासाठी राखून ठेवलाय. नववर्षाची सुरवात गतवर्षाच्या ताळेबंदाने व्हांवी असं मला वाटतं. गेलं वर्षभर तुमच्या सुख-दुःखात जिने तुम्हाला खरीखुरी साथ दिली, त्या बायकोबरोबर, आपल्या मुलांबरोबर नववर्ष साजरं करण्याचं सोडून उगीच कुठल्यातरी फार्महाऊसवर किंवा कोणाच्या तरी बायकोला माहेरी कातावून आख्खी रात्र खाण्या-पिण्यात बुडवायची. अरे त्यापेक्षा आपल्या घरी रहा. उद्याची स्वप्न आपल्या बायको-मुलांबरोबर पहा. बघ तुला जमलं तर! आपल्या माणसात ३१ डिसेंबरची मजा काही औरच असते” हे हेमंतचे शब्द आणि “पप्पा आज थांबा ना तुम्ही आमच्या बरोबर” हे पिंकीचं आर्जव सुधीरच्या डोक्यातून जाता जाईना. खरंतर त्याला काहीही कारण काढून आज ऑफिसमधून लवकर सटकायचं होतं. सगळेजण बसस्टॉपवर भेटणार होते आणि मग तिथून रवि साटमच्या घरी. बायकोला त्याने आज माहेरी पाठवले होते. रात्रभर नुसती धमाल. त्याला काय काय आणायचं होतं त्या लिस्टवर त्याने एकदा नजर फिरवली. पण बेचैनी वाढतच होती. शेवटी त्याने रविला फोन केला. रवि मी आज येऊ शकत नाही. का?, कसं? बराच वेळ चाललं होतं. काहीतरी इकडची तिकडची कारणं सांगून सुधीरनं जायचं टाळलंच आणि लगेचच त्यानं मी आज रात्री घरीच येतोय म्हणून सांगायला वंदनाला फोन केला.