भारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे

वेचक-वेधक
भारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे
जन्म – १८४६
मृत्यू – १९०५

आपल्या मराठी मातीत अनेक प्रकारची पिके उगवतात आणि त्यातच एक भर म्हणजे – “स्वाभिमान”, गेली अनेक शतके ही मराठी माती याची साक्ष आहे. थेट ज्ञानेश्वरांपासून …… समर्थ रामदास…. वासुदेव बळवंत फडके…. बाळ गंगाधर टिळक ….. वगैरे वगैरे. वर्षे १८४६ मध्ये असेच एक स्वाभिमानाचे पीक आले. ते होते “विष्णु मोरेश्वर छत्रे.”

या छोट्या विष्णुने पहिली चमक दाखवली ती आपल्या मित्रमंडळीत. त्या मित्रमंडळीनी त्या विष्णुला गाणे म्हणण्याचा आग्रह केला. विष्णुला गाणे येत नाही हे सर्वांना माहीत होते. त्यावेळेला विष्णुला गाणे म्हणता येईना. त्याचवेळी त्याने प्रतिज्ञा केली ” मी गाणे शिकेल. एवढेच नव्हे, तर तुम्हांला त्याची तालीम देईन.” त्या बाणेदार तरुणाने कांही दिवसात हे सिद्ध करून दाखवले. पंडित विष्णुपंत छत्रे – धृपद गायक असा नावलौकिक मिळवला आणि दुसरा स्वाभिमान जागविला तो सर्कस बाबतीत. सहजगत्या विष्णुपंत मुंबईस आले. उत्सुकतेपोटी विल्सन साहेबाची सर्कस पाहण्यास गेले. त्या युरोपियन साहेबाने,’या एतद्देशीय भारतीय काळ्या लोकांना हे सर्कस काढणे, खेळ करणे कधीच शक्य होणार नाही!!’ असे उद्गार काढले! विष्णूची अस्मिता जागृत झाली. स्वाभिमान उफाळून आला आणि त्याच ठिकाणी त्या साहेबाला ठणकावून बजावले की मी असा खेळ, असा प्रयोग, अशी सर्कस काढूनच दाखवीन आणि खरोखरी विष्णू मोरेश्वर छत्रे यांनी वर्ष १८८२ दस-याच्या शुभमुहुर्तावर मुंबई – क्रॉस मैदानावर पहिला भारतीय सर्कशीचा खेळ मांडीयेला!! आणि एवढेच नव्हे तर काही वर्षांनी त्याच विल्सन साहेबाची ती सर्कस विष्णुपंतांनी लिलावात विकत घेतली आणि ते मराठी मातीत वाढलेले स्वाभिमानाचे कणीस डौलात झळकू लागले!! विष्णुपंतांची ही पहिली भारतीय सर्कस ‘ग्रँड इंडियन सर्कस, गांवोगांवी, शहरा शहरातून फिरू लागली. सर्व भारतभर त्यांचे खेळ झाले. त्याचबरोबर आपल्या मित्राला गुरुबंधूला आसरा दिला व संगीत शास्त्राचा अनमोल हिरा गावी रहिमत खाँसाहेब जनतेपुढे, रसिकांपुढे सादर झाला.

या महान विष्णुपंतांचा एक दंडक होता. ज्या गांवांत सर्कशीचा खेळ होईल त्या गांवातील एका शिक्षण संस्थेला उदारहस्ते देणगी देऊनच खेळ सुरु होई!! अशा थोर व्यक्तिमत्वाला काय म्हणावे; सुरात श्रेष्ठ! स्वारात (घोड्यावर) श्रेष्ठ आणि दानातही श्रेष्ठ!! अशा ह्या दिव्य आत्म्याला मृत्यू आला माघ कृष्ण १२ मंगळवार शके १८२७ या दिवशी. भारतीय सर्कशीचा जनक अनंतात विलीन झाला!!
श्री काशिनाथपंत छत्रे

विष्णुपंत गेले …… पण त्यांची “ग्रँड इंडियन सर्कस” पुढे चालूच राहिली. नव्हे जास्तच फोफावली!! विष्णुपंतांचे धाकटे बंधू (पुढे दत्तक पुत्र) काशिनाथपंत छत्रे यांनी ही सर्कस पुढे चालू ठेवली. त्या सर्कशीचे खेळ भारतातच नव्हें तर परदेशातही गाजू लागले. हे सर्व करीत असताना त्यांनी आपला स्वाभिमान, देशाभिमान कधीच बाजूला सारला नाही. स्वातंत्रासाठी लढणा-या क्रांतीकारकांना, नेत्यांना (पुढारी मंडळी) पुर्णपणे सहकार्यच करीत होते. भूमिगत कार्यकर्त्यांना सर्कसचे डोअर कीपर करून परदेश व देशांतर्गत हालचालीसाठी पूर्णतः मदत करीत असत. “छत्रे” या नावांशी लो. टिळकांचा फार घनिष्ट संबंध आहे. केरुनाना छत्रे त्यांचे गुरु, सर्कसवाले काशिनाथपंत त्यांचे परममित्र. नेपाळच्या मुक्कामात लो. टिळक त्यांच्याबरोबर सर्कशीत रहात होते व तेथेच त्यांची स्वातंत्र्यलढ्यातील गुप्त खलबते होत असत. अशा बंधुद्वय (पिता-पुत्र) यांना त्या दिव्य आत्म्यांना कोटी कोटी प्रणाम!!

अशा थोर व्यक्तिमत्वांची छायाचित्र व स्मृतिचिन्हांकित पाकिटाचा अनावरण समारंभ विजापूर येथे दि. १९/११/२००६ रोजी विष्णुपंतांचे पणतु श्री दिलीप छत्रे व अन्य कुलबंधूंच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Join the Conversation

1 Comment

  1. kerunana vyasangi hote. tyanche charitra ani mahiti yababat adhikrut thikan konte.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *