श्री व्याडेश्वर महात्म्य हे काव्य श्री. विश्वनाथ पित्रे नामक कवीने वर्ष १६३५ मधे म्हणजे सुमारे ४०० वर्षापूर्वी रचले आहे. त्यात श्री देव व्याडेश्वरांबरोबर श्री परशुराम , गुहागर वगैरेचे तपशिलासह अतिशय सुंदर वर्णन आले आहे. त्यात सर्ग ५ , श्लोक ३० ते ३७ मध्ये पुढीलप्रमाणे वर्णन आले आहे.
रामतीर्थ व नदी ह्यांच्या पश्चिमेकडून दक्षिण दिशेपर्यंत त्या ब्राह्मण श्रेष्ठ परशुरामाने ब्राह्मणांची स्थापना केली. अशा रीतीने अधिकारानुरूप रम्य व समृद्धीयुक्त घरे वसविल्यानंतर पूर्णकाम परशुरामाचे मन शांत झाले. त्या अत्यंत आकर्षक अशा नगरला त्याने चित्तपावन हे नाव दिले. व त्यामुळे तेथे राहणारे सर्व ब्राह्मण चित्तपावन (चित्पावन) म्हणून गणले गेले. II ३०-३२ II
मग तो कमळासारखे नेत्र असणारा परशुराम आपल्या ब्राह्मणांना म्हणाला, हे क्षेत्र म्हणून स्वीकारलेले शहर श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी निर्माण केले व आता आपण सर्वांनी ह्याचा निवासस्थान म्हणून स्वीकार केला असल्यामुळे तोच सुरुवातीचा दिवस असे समजून ह्या माझ्या पृथ्वीची प्रत्येक वर्षी आदरयुक्त होऊन पूजा करा. आपण सर्व ब्राह्मण माझे आहात व ही पृथ्वी माझी आहे. II ३३-३५ II
हरीच्या म्हणजे विष्णुरूपी परशुरामाच्या त्या शहरात श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी रामाने पालन केलेल्या ब्राह्मणांकडून आजही ती पूजा विधिवत केली जाते. II ३६ व ३७ II
विश्वनाथ कवीच्या काळी कदाचित अशी पूजा होत असेलही परंतु गेली अनेक शतके (कदाचित अनेक सहस्त्रके सुद्धा) असे पूजन झाल्याचे उपरोक्त उल्लेखाशिवाय अन्य उल्लेख नाही. कुळधर्म , कुलाचाराच्या रुपात ह्या पूजेचे अवशेष देखील दिसून येत नाहीत. अशी पूजा कोणी केल्याचे ऐकिवातही नाही. गेल्या वर्षी रिसबूड कुटुंबियांपैकी सर्वश्री सतीश, डॉ.प्रसाद, राहुल ह्यांनी पुढाकार घेवून श्रावण महीन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशीच्या दिवशी (६ सप्टेंबर २०१० रोजी ) संध्याकाळी चिपळूणात श्री रामतीर्थावर श्री देव परशुरामभूमि पूजनाचा कार्यक्रम यथासांग घडवून आणला. चिपळूण येथील ज्येष्ठ नागरिक श्री. कपिल भगवान रिसबूड ह्यांनी प्रत्यक्ष पूजा केली. चिपळूणचे आदरणीय वे. शा. सं.श्री. फडके गुरुजी ह्यांनी पौरोहित्य केले. ही पूजा दरवर्षी करावी अशी श्री परशुरामांची आज्ञा असल्याने अशी पूजा दरवर्षी करण्यात येणार आहे. ह्या वर्षीची पूजा ह्याच ठिकाणी दिनांक २६ ऑगस्ट २०११ रोजी आयोजित केले आहे. गुहागर येथील श्री देव व्याडेश्वर संस्थान, श्री दुर्गादेवी देवस्थान, लोटे परशुराम येथील श्री परशुराम संस्थान व चित्पावन ब्राह्मण महासंघ ह्यांनी ह्या कामी भविष्यात पुढाकार घ्यावा असे सुचवावेसे वाटते.
प्राचीन काळी सत्तेमुळे क्षत्रिय उन्न्मत्त झाले होते म्हणून परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. ह्या कथेचा कोणीही कसाही अर्थ काढला तरी एक गोष्ट प्रकर्षाने ध्यानात घेण्यासारखी आहे ती म्हणजे उन्न्मत्त व जुलमी राजसत्तेच्या विरोधात एक ब्राह्मण खंबीरपणे उभा ठाकला. राजसत्तेच्या विरोधात उभे राहताना त्याने हातात शस्त्र देखील धारण केले आणि सत्तेचा उन्मत्तपण संपुष्टात आणला.
आजदेखील सत्तेचा उन्मत्तपणा ठायी ठायी दिसून येतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत ब्राह्मणांनी उन्मत्त व जुलमी राजसत्तेच्या विरोधात उभे राहणे हे ही श्री परशुरामाचे स्मरण करणे व आज्ञा पालन करणेच होय. यासाठी श्री परशुरामभूमी पूजन अधिक व्यापक व विस्तृत प्रमाणात व्हावे ही अपेक्षा.