फोन महिमा

झोपाळा
फोन महिमा
– माधव घुले

सद्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात “फोन” चं महत्व आणि स्थान फार वरचं आहे. फोन व्यावसायिकांनाच लागतो असा एक समाज होता पण आता मात्र तो घरीही असायलाच हंवा असं मानलं जातं. विशेषतः ते एक प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. त्यातूनही दोन खोल्यांच्या जागेतसुद्धा ” हॅंडसेट” आणि केवळ “स्टाइल” मारायला किंवा दुस-यांवर / दुसरीवर छाप पाडायला म्हणून महागडा मोबाइल हंवा असतो. मात्र बिलाची रक्कम पाहिल्यावर वडिल मंडळी कावरीबावरी होतात. अनेक प्रकारचे निर्बंध आपल्यापरीने लादण्याचा प्रयत्न करतात, पण घरातील मुलं विशेषतः तरुण तरुणी यांकडे फारच सहजतेने पाहतात. त्यांच्या मते त्यांना आवश्यक अशा सेवांमध्ये फोन असतो त्यामुळे बिलाची रक्कम ते गौण मानतात. अर्थात हा काहीसा वादाचा मुद्दा होऊनही फोनची उपयुक्तता हा मुद्दा अधिक महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यापासून मिळणा-या लाभाचं प्रमाणही तुलनेने अधिक आहे. त्यामुळे सध्या तरी फोनला पर्याय नाही असे म्हणता येईल कारण सोय, वेळ, श्रम व पैशाची बचत आणि त्वरित निर्णय मिळणे ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. दूरध्वनी, मंजुळध्वनी, भ्रमणध्वनी आदि नांवाने आपण ज्याचं नामकरण केलं त्या फोनला आपण आपला मित्र मानलं तर त्याचा खूपच चांगला उपयोग करता येईल. फोनवरून बोलणे, दुस-यांचं ऐकून घेणे ही एक कला आहे. ती अनेकांना साधत नाही. बोलतांना आवाज मृदू हंवा, चेह-यावरचे हावभाव आणि हातवारे यांना जरुरीपुरतं महत्व असावं, आक्रस्ताळेपणा करूं नये, आवाज उगीचच मोठा असू नये, अति आणि अवास्तव माहिती देऊ नये, आपण फोन केला असता प्रथम आपलं नांव व ठिकाण सांगून अभिवादन करावे आणि मगच विषयास सुरवात करावी. कोण बोलतयं असा विचारण्याचा अडाणीपणा वा उद्धटपणा करूं नये. आपलं काम आधी सांगावं आणि मगच समोरच्याकडून मदतीची व कामाची अपेक्षा करावी. अपरात्री, सकाळी घाईच्या वेळात, दुपारी जेवणाच्या व झोपेच्या वेळात आणि केवळ स्वतःची सोय होते म्हणून फोन करू नये. तुमचा फोन राँग नंबर म्हणून लागला तर समोरच्याला त्याचा नंबर न विचारता स्वतःला हंवा असलेला नंबर सांगून त्याला सॉरी म्हणावे. थोडक्यात म्हणजे आपलं काम करून हंवं असेल तर आपण हे सारं कसोशीने पाळायला हंवं.

ज्या व्यक्तीला फोन करायचा वा ज्याचेकडून फोन आला असेल त्याला फार काळ ताटकळत ठेऊ नये अथवा तशी वेळ आल्यास त्याला थोड्या वेळाने फोन करतो असे म्हणावे वा त्याचा नंबर टिपून घेऊन नंतर फोन करावा. फोनवर बोलणे झाल्यावर फोनचा रिसीवर अलगद ठेवावा अथवा प्रथम क्रेडेल दाबून मगच रिसीवर ठेवावा म्हणजे पलीकडच्या व्यक्तीला फोन आपटल्यासारखे वाटणार नाही व त्यामुळे तो प्रसंगोपात अपमानितही होणार नाही. फोनवरील संभाषण संपल्यावर प्रसंगानुरूप ‘धन्यवाद, हॅव अ नाइस डे, यु आर वेलकम” यासारखी संबोधने वापरावी म्हणजे पलीकडील व्यक्तीलाही सन्मानित झाल्यासारखे वाटते. फोन आल्यावर आपल्याला वेळ नसल्यास समोरच्याचा नंबर घेऊन त्यास आपण घाईत असल्याने मीच पुन्हा फोन करेन असे आवर्जुन सांगावे. आपण बोलत असताना मध्येच अन्य कोणाशीही बोलावयाचे झाल्यास, वा समोरच्या व्यक्तीशी बोलणे नको असल्यास प्रथम माउथपिसवर हात ठेवावा व मगच पुढील कृती करावी. त्यामुळे गैरसमज टाळता येतात. फोनवरील व्यक्तीचा निरोप लिहून घेण्यासाठी वा आपली माहिती देण्यासाठी फोनाशेजारी छोटी वही, पेन तसेच आपला मजकूर तयार ठेवावा म्हणजे वेळेचा अपव्यय टळतो. अशाच अनेक बाबी क्षुल्लक वाटतात पण त्या खूप महत्वाच्या आहेत. आत्तापर्यंत टेलिफोनसाठी आपण सरकारी खात्यावर अवलंबून होतो पण आता आणि यापुढे अनेक मोठमोठ्या कंपन्या आपलं अस्तित्व स्पष्टपणे जाणवू देत आहेत. टेलिफोनचं जाळं भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विणलं जातंय. वर नमूद केलेल्या अनेक बाबींबाबत पूर्वी खात्याकडून एक मार्गदर्शक पुस्तिका दिली जात असे. खाजगी कंपन्यांनी आता यामध्ये लक्ष घालून निव्वळ आपला धंदा न पाहता लोकांना मार्गदर्शन करावं. टेलिफोनची ही संस्कृती आत्मसात करणं अतिशय आवश्यक आहे कारण या सततच्या बदलत्या आणि गतिमान युगात कम्युनिकेशन साधताना आपण कॉरसपॉंन्डन्सकडे दुर्लक्ष करतोय. पत्रलिखाण ही तर फार मोठी कला आहे. नुसतं छान छान बोलणारा पत्र लिहिताना गडबडून जातो. चार ओळी लिहायच्या म्हणजे त्याला संकट वाटतं. बोलताना जशी सुसूत्रता हंवी त्यापेक्षा लिहिताना ती अधिक हंवी. त्यामध्ये मुद्देसूदपणा असावा. अलीकडे तर अनेकांचं लिहिणं लुप्त झालंय. पत्राला कसा एक वेगळाच सुगंध असतो. ते परत परत वाचावंसं वाटतं, ते जपून ठेवता येतं, पत्राच्या प्रत्येक शब्दातून, अक्षराच्या वळणातून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद घेता येतो. जुनी पत्र वाचायला बसावे तर वेळहि छान जातो आणि जुन्या आठवणीत रमताही येतं. उत्तम पत्र लिखाणातून मार्गदर्शन झाल्याची, स्वभावात बदल झाल्याची आणि अवर्णनीय आनंद झाल्याची अनेक उदाहरणं ऐकायला मिळतात. असो! आपण प्रत्येकाने संभाषण आणि पत्रलेखन या दोन्हीचा आनंद घ्यावा हे मात्र नक्की!

इति फोन कहाणी, साठा उत्तरी, सुफळ संपूर्ण.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *