भावनांक – रणजित करंदीकर

वेचक-वेधक
भावनांक
रणजित करंदीकर

आपण बहुतेक सर्वजण स्वतःबद्दल बोलत राहतो. आपण स्वतः, आपले कुटुंबीय, आपला स्वभाव, आपली मुले, आपण मिळवलेल्या गोष्टी, आपल्या कामात आपण कसे निष्णात आहोत, आपला भूतकाळ, आपल्याला नशिबाची साथ कशी मिळाली नाही तरीही……वगैरे वगैरे अशा आपल्यासंबंधीच्या अनेक गोष्टींवर आपण तासनतास बोलतो. त्याचवेळी दुस-यांच्या कुचेष्ट्ता करणे, त्यांच्यातील दोष वारंवार बोलून दाखवणे, स्वतः मोठे आहोत हे शाबित करण्यासाठी दुस-याची निंदा करणे, द्वेष करणे या गोष्टी चालूच असतात. या सा-या गोष्टींमुळेच ताणतणाव निर्माण होतात. संबंधात परकेपणा येतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे आपली स्वतःची परिणामकारकता कमी होते.

कुटुंबात व समाजात वावरताना आपले ताणतणाव निर्माण करते. त्याचा विपरीत परिणाम आपल्या क्रियाशीलतेवर व आरोग्यावर होतो.

अत्यंत जवळकीचे व घट्ट असे प्रेम व आपुलकी यावर आधारलेले मैत्रीसंबंध ही जीवनाची मुलभूत गरज आहे. हे मैत्रीसंबंध विचार करणे, बोलणे, वागणे, निर्णय घेणे व समाधानाने जगणे या सर्वांवर सखोल परिणाम करीत असतात. असे मैत्रीसंबंध भावनांक चांगला असण्याची एक खूण आहे.

कांही वेळा यशस्वी व्यक्तींबद्दल बोलताना त्यांचा निग्रह, करारीपणा, परिश्रम करण्याची तयारी, जिद्द, दूरदृष्टी याबाबत बोलले जाते. यशस्वी व्यक्तींचे अगोदर वर्णन वर्णन केलेले गुण म्हणजे दृष्टीकोन. हे दृष्टीकोन कौटुंबिक संस्कारातून मिळालेले असतात किंवा तिने ते परिश्रमपूर्वक मिळवलेले असतात.

सर्व यशस्वी व्यक्ती तणावमुक्त जीवन जगात असतात कां? त्यांच्या आगमनाने त्यांच्या सहका-यांमध्ये आनंद निर्माण होतो कां? त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे कृतीमधून ठामपणा दिसून येतो कां? त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ ची सर्वसमावेशक चौकट असते कां? यशाचा अर्थ बरोबरच्या सर्वांना घेऊन पुढे जाणे असा ते लावतात कां? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्री त्यांना गाढ झोप लागते कां? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर त्या यशस्वी माणसाचा भावनांक उच्च आहे असे समजायला अजिबात हरकत नाही.

आज समाजाच्या दुरावस्थेचे कारण म्हणजे बुद्ध्यांकाला दिले जाणारे अवास्तव महत्व. अकारण स्पर्धा (मत्सर) व ‘मी’पणा ही दुसरी दोन कारणे माणसांना एकमेकांपासून दूर नेतात. उच्च बुद्धी असलेल्या व्यक्ती, बुद्धीसंबंधी मोठी कामे करतात. शोध लावतात, उच्चपदावर आरूढ होतात आणि व्यक्ती म्हणुन मोठ्या होतात. उच्च भावनांक असलेली सर्वसाधारण व्यक्ती बुद्धिमत्तेच्या हजारो, लाखो माणसांना एकत्र आणून प्रचंड कार्य उभे करतात; असे कार्य जे भावी पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे असते. स्थिर मन, विश्वसनियता, कुशल नेतृत्व व आस्थेवाईकपणा यासारखे गुणविशेष त्यांच्यामध्ये असतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *