दिनचर्या नित्य पाळावी
ऋतूचर्या अवलंबावी
-वैद्य पराग पटवर्धन
सर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्या सर्वांना सुख-समृद्धीचे, भरभराटीचे जावो आणि आरोग्य लाभो अशी भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना!
गेल्या अंकात आपण वसंत ऋतुविषयी माहिती बघितली. त्यामध्ये आपण निरोगी राहण्यासाठी वमन क्रिया कशी करावी हे बघितलं. आपण सर्वांनी वमन केलंही असेल. या अंकात ग्रीष्म ऋतुचर्या बघणार आहोत. पण पाडव्याच्या निमित्ताने कडूनिंब या वनस्पतीचे महत्व आहे. कडूनिंब कफघ्न, शीत, जंतुघ्न, रक्तशुद्धिकारक आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला कडुनिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे.आपल्या भागात साधारण एप्रिल सरताना ग्रीष्म सुरु झालेला असतो. हवेतील उष्णता जास्त असते. उष्णतेमुळे सृष्टी व शरीर दोहोतील ओलावा, जलतत्वाचे शोषण होत असते. त्यामुळे शरीराचा दाह होतो; हात, पाय गरम होतात; पायाला भेगा पडतात; तहान जास्ती लागते; भूक मंदावते; थकवा वाढतो; उष्णतेचे आजार होतात; डोळ्याची आग, गुददाह, नाकाचा घोणा फुटणे इत्यादी अशा रोगांपासून वाचण्यासाठी शितोपचार करणे आवश्यक आहे.
ग्रीष्म ऋतूमध्ये मधुर, किंचित आम्ल व लवणयुक्त आहार घ्यावा. त्यामध्ये विविध फळांचे रस वा चिंचा पानक, आंब्याचे पन्हे, आवळा सरबत, कोकम सरबत यांचा वापर करावा. पेप्सी, कोलासारखी थंड पेयं कटाक्षाने टाळावी. आईसक्रीमही जरा बेताने खावे. आहार स्निग्ध, हलका, सुपाच्य असा असावा. उन्हातून आल्यावर बर्फाचे पाणी पिऊ नये.
स्नानासाठी थंड पाण्याचा वापर कारावा. पाणी चंदन, वाळा इत्यादी सुगंधी औषधांनी सुगंधी करावे. विविध प्रकारची सुगंधी, नैसर्गिक, सौम्य अत्तरं अंगाला लावावी. थंड हवेची ठिकाणं, नद्या तळी-तलावाच्या सान्निध्यात राहावे. नौकाविहार करावा. थंड पाण्याची कारंजी जेथे आहेत त्या ठिकाणी बसावे.मोगरा, गुलाब अशी शीतल फुले घरात सजवावी. पाण्यातही मोग-याची फुलं, वाळा घातल्यास पाणी थंड व सुगंधी होते.
उन्हात घराबाहेर पडू नये. पडायचे झाल्यास डोक्याला टोपी, सुती कपडे, पांढ-या रंगाचा वापर जास्त करावा.अभ्यंग करावा. दिवसा झोपावे वा आराम करावा. औदुंबर जल, चंदनासव, सारीवाद्यासव,कामदुधा रस,गुलकंद, प्रवाळभस्म यासारखी दाहशाम औषधी घरात असावी.
अशाप्रकारचे विविध उपचारांच्या उपयोगाने ग्रीष्मातील उष्णतेचा त्रास कमी होतो.
शुभं भवतु!
औदुंबर जलाविषयी शोधताना तुमचा हा लेख
मिळाला. त्याविषयी म्हणजे त्याच्या फायद्यांबद्दल
अजुन माहिती मिळेल का?