चित् व चित्त शब्दांचे अर्थ आणि चित्तपावन अथवा चित्त्पावन शब्दाची भ्रांती

आपल्या पूर्वजांचे मन, त्यांची विचारप्रणाली व बुद्धी (चित्) शुद्ध (पावन) असल्याने त्यांना चित्पावन हे संस्कृत संबोधन प्राप्त झाले. पंधराव्या शतकात सांख्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणारे श्री गणेशदीक्षित भावे, महान ज्योतिषी नृसिंहभट्ट व दादाभाई, ‘माझा प्रवास’ लिहिणारे विष्णूभटजी गोडसे यांच्या सारख्या कित्येक संस्कृत भाषातज्ञांनी तसेच पेशवे, त्यांचे सरदार व अधिका-यांनीही आपल्या जातीचे नाव चित्पावन असेच नमूद केले आहे. त्यांना चित् शब्दाचे अर्थ ज्ञात होते.

चित् व चित्त हे सर्वस्वी भिन्न आहेत. संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळे चित् व चित्त शब्दाचे अर्थ समजू न शकलेल्या बहुतांश लोकांनी गेल्या पन्नास वर्षात चित्तपावन शब्दाचा भरपूर गैरवापर केलेला आढळतो. काही चित्पावन संघांनी आपल्या संस्थेचे नाव बदलले. चित्पावन नाव कोरलेल्या संगमरवरी लाद्याही बदलल्या व चित्तपावन नाव कोरले. त्यामुळे चित् व चित्त यांच्या अर्थासंबंधी थोडे विवेचन आवश्यक आहे.

वेदोत्तर वाङ्मयातील उपनिषद साहित्यात तत्वज्ञान विचाराच्या अनेक विद्या दिल्या आहेत त्यात चित्त शब्द विविध अर्थाने वापरलेला आढळतो. कौशल्याला कला म्हणतात. कला शिकवण्यायोग्य झाली तर ती विद्या होय. कारणपरंपरा देऊन सूत्रबद्ध करण्याएवधी विद्या प्रगल्भ झाली की ते शास्त्र होय. त्यामुळे चित्त शब्दाचा योगशास्त्रातील अर्थ प्रमाण मानावा लागतो. महर्षी पतञ्जली यांची योग शास्त्रावरील सूत्रे ‘पातञ्जल योगदर्शन’ म्हणुन विख्यात आहेत. त्यांच्या आधीही अनेक योगशास्त्रे होती पण महर्षी पतञ्जलीचे योगशास्त्र अद्वैताधारित व तर्कशुद्ध असल्याने ते सर्वमान्य झाले आणि आपले अस्तित्व टिकवू शकले. हे योगशास्त्र म्हणजेच वैदिकपरंपरेतील अंतःकरणशास्त्र होय. त्यात चित्त शब्दाचा अर्थ दिलेला आहे. योगविद्येचे अद्विताधारित (द्वैताधारित) असे दोन मत प्रवाह असले तरी दोन्ही मतानुयायी महर्षी पतञ्जलीच्या योगशास्त्राला आधारग्रंथ मानतात.

पुढे योगशास्त्रातील माहिती थोडक्यात दिली आहे. पूर्वस्मृती व तात्कालिक स्मृती अंतःकरणाचे अविभाज्य अंग असल्याने त्यांच्याशिवाय अंतःकरणाचे कार्य होऊ शकत नाही. अद्वैतवादी विचारसरणीप्रमाणे अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त व अहंकार असे चार भाग कल्पिलेले आहेत. सुखकारक व दुखःकारक संवेदनांमुळे आवड, नावड, निवड आणि भावना मनात ठरतात. त्यात गरजेनुसार संकल्प व कार्यप्रव्रुत्ती निर्माण होते. ज्ञानेंद्रियांकडून आलेल्या संवेदना चित्ताद्वारे बुद्धीकडे जातात. जाणिवा व पुर्वस्मृतीची सांगड घालताना बुद्धी विविध कसोट्या लावते. त्यानंतर जे विषयज्ञान होते ते अहंकाराचे लक्षण होय.(अहंगंड हा अर्थ तेथे अभिप्रेत नाही, जाणणारा मी म्हणजेच परब्रम्ह असा त्याचा अर्थ होतो) अशी संक्षेपात अंतःकरणप्रक्रियेची माहिती देता येईल.

येथे संगणकाचे उदाहरण देणे योग्य ठरेल. संगणकाच्या कार्याचे वर्गीकरण अंतःकरणाच्या वर्गीकरणासारखेच आहे. जशा संवेदना चित्तामार्फ़त अंतःकरणात जातात तशाच रीतीने कीबोर्ड, माऊस, स्केनर, माइक, वेबकेम इत्यादी उपकरणांच्या संवेदना इनपुटमार्गे संगणकात पाठविल्या जातात. बुद्धीचे कार्य मनोधारणेनुसार होत असते. तसेच निश्चित केलेल्या तर्काच्या आज्ञाप्रणालीनुसार प्रोसेसिंग युनिट बुद्धीचे कार्य करते. अहंकाराचे लक्षण म्हणजेच निष्कर्षसिद्धी होय. अंतःकरणाच्या प्रत्येक कार्यात स्मृती आवश्यक असते तशीच संगणकालाही असते. पूर्वस्मृती हार्डडिस्कवर साठवलेल्या माहितीप्रमाणे तर तात्कालिक स्मृती केचमेमरी व मेमरीअॅरे प्रमाणे असते. कलुषित मनोधारणा असली व चित्तातून पुर्वाग्रहादोषित संवेदना अंतःकरणात गेल्या, तर भ्रामक जाणिवा निर्माण होतात. चुकीचे निर्णयही चुकीचे ठरतात तसेच विकृत माहिती संगणकाला दिली किंवा सदोष आद्न्याप्रणालि वापरली तर निष्कर्ष चुकीचे ठरतात.

मनोधारणेचा चित्तावर प्रभाव वाढला तर मनोधारणा चित्ताला बुद्धीचे कार्य करण्यासाठी उद्दुक्त्त करते. चित्त द्न्यानेन्द्रियाकदुन आलेल्या संवेदना व पुर्वास्मृतींची सांगड घालण्याचा वृथा प्रयत्न करते. त्यालाच चिंतन अथवा विचार करणे म्हणतात. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृती या चित्तवृत्ती आहेत. ज्ञानेन्द्रीयाकडून आलेल्या संवेदना म्हणजेच विषयज्ञान असे मानण्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात.त्याची पुर्वास्मृतीशी सांगड घालण्याचे प्रयत्न म्हणजे अनुमान प्रमाण होय. ग्रंथोक्त अथवा माता-पिता-गुरु यांच्या शिकवणीनुसार संवेदनांचा अर्थ करणे हे आगम प्रमाण होय. बुद्धीप्रमाणे या प्रमाणांची पुर्वस्मृतींशी सांगड घालण्याचा प्रयत्न चित्त करत असले तरी क्षमता नसल्याने पूर्णतया सांगड घालू शकत नाही, त्यामुळे निर्णय करू शकत नाही. चित्त निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे द्विधा अवस्था प्राप्त होते. विशायाद्न्यान न झाल्याने चित्त एखाद्या गोष्टीला भलतेच मानते (जसे दोरीला साप, सापाला दोरी) याला याला विपर्ययवृत्ती म्हणतात. कधी नसलेल्या गोष्टी असल्याचे किंवा अशक्य बाबी शक्य असल्याचे भास होऊ लागतात (जसे पुरुष बाळंत झाला, अमावस्येच्या दिवशी चंद्राला ग्रहण लागले, इत्यादी) त्या वृत्तीला विकल्प असे म्हणतात. ज्यावेळी चित्त पुर्वास्मृतींमध्ये रमते व तीच आजची स्थिती आहे असे मानते त्याला स्मृतीवृत्ती म्हणतात. श्रमामुळे ज्ञानेंद्रियांच्या संवेदना ग्रहान करण्याची क्षमता कमी होते तेंव्हा चित्त निद्रावृत्तीत असते. तंद्रा हे त्याचेच उपांग आहे.

वृत्तीत लिप्त झालेल्या व ज्ञानेन्द्रीयांकडून आलेल्या संवेदना बुद्धीकडे न पाठवणा-या चित्ताला मूढ म्हटले जाते. चिंतन अथवा विचार एकाच विषयावर केंद्रित होऊ शकत नाहीत तेंवा चित्ताला चंचल म्हटले जाते. निद्रावस्थेतही चित्त कार्यरत असते. त्यावेळी चालू असलेली चित्तातील विचारप्रक्रिया म्हणजे स्वप्न होय. त्यामुळेच स्वप्ने असंभाव्य, एकमेकांशी संबंध नसलेली व भरकटलेली असतात. चित्ताच्या चान्चालातेचे हे चांगले उदाहरण आहे. ज्यावेळी सामान्य माणसाचे चित्त नकळत किल्मिशविरहित होते व ज्ञानेन्द्रीयांकडून आलेल्या जाणिवा अंतःकरणात पाठवू लागते तेंव्हा त्याच्या चित्ताला प्रसन्न म्हटले जाते. एका विषयावर केंद्रित केलेल्या चित्ताला एकाग्र म्हणतात. ही योगसाधनेची पहिली पायरी आहे. चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग होय. म्हणुन सिद्धायोग्याचे चित्त निरुद्ध असते असे म्हणतात. यावरून चित्ताला कशा प्रकारची विशेषणे लावली जातात ते कळून येईल.

योगसाधनेत प्रथम काही चित्तवृत्ती व त्यांचे काही भाग शुद्ध करावे लागतात त्यायोगे चित्तव्रुत्तिञ्चा निरोध साधता येतो. काही ठिकाणी चित्ताला शुद्ध, पवित्र अशी व्हिशेशणे लावलेली आढळली तर ती शुद्ध झालेल्या चित्तवृत्तीला असतात. निद्रा ही सुद्धा एक चित्तवृत्तीच आहे. सिद्धयोगी ही निद्रा प्राप्त करून घेऊ शकतो पण ती निद्रा स्वप्नाविरहित असल्याने शांत असते आणि शरीरस्वास्थ्याला आवश्यक तेवढ्याच कालावधीची असते. तेंव्हा ‘शांत’ हे विशेषण निद्रावृत्तीला लावलेले आहे, चित्ताला नव्हे हे कळून येईल. संगणकाचा कीबोर्ड, माउस, स्कॅनर, या उपकरणातून येणा-या संवेदना ज्यामार्गे (इनपुट) संगणकात योग्य रीतीने पोहचतात त्या मार्गाला शुध्द किंवा पावन म्हटले जात नाही. यावरून चित्ताला पावन म्हणणे कसे निरर्थक आहे हे कळून येईल. मनोधारणा, मन, बुद्धी, विचारप्रणाली असा अर्थ असलेला ‘चित्’ हा शब्द योग्य असून त्यात व चित्त या शब्दात गल्लत करू नये.

स्मिताहिनतेमुळे अजूनही बरेच जणांचा पाश्चात्यांच्या लिखाणावर विश्वास असतो. त्यांच्यासाठी इनसाक्लोपिडीया ब्रिटानिका मधील संदर्भ देणे योग्य ठरेल. त्यात चित्त शब्द (Chitta) असा अक्षरबद्ध केलेला आहे. तसेच चित्तपावन (Chittapavan) शब्द न वापरता हा चित्पावन (Chitapavan) असा शब्दप्रयोग केलेला आहे. चित्पावनांची देशावर ये-जा वाढल्यानंतर त्यांना स्थानदर्शक कोकणस्थ ब्राम्हण म्हणु लागले. पेशवाईत हा शब्द अधिक रूढ झाला. कोकणातील चित्पावन जातीलाच ब्राम्हण मानतात म्हणुन जर कोकणस्थ ब्राम्हण शब्द वापरला तर तो अर्थवाही असल्याने स्वीकार्य आहे पण चित्तपावन मात्र नाही.

काही चित्पावन संघांनी पूर्व काळात चित्पावन किंवा चित्तपावन असा बदल केला असल्याने त्या संघांनी पुन्हा चित्पावन हे नाव स्वीकारण्यास अडचण नसावी. चित्तवेध या शब्दाचा अर्थ चित्त वेधणे किंवा चित्ताचा शोध घेणे असा असल्याने तो अर्थवाही आहे. चित्वेध हा शब्द अधिक व्यापक आहे. त्याचा अर्थ मनोधारणा, मन, बुद्धी, विचारप्रणाली यांचा शोध घेणे असा असला तरी तो वापरण्याची आवश्यकता नाही.

प्रकाश नरहर गोडसे,
गोरेगांव, मुंबई ४००१०६

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *