चित्पावनांच्या क्षात्रतेजाबद्दल स्पष्ट विवेचन करता येते. शिवाजी महाराजांपूर्वी समाजातून क्षात्रधर्म नष्ट झाला होता, हे सर्वमान्य आहे. देवगिरीच्या यादवांचे वंशज व राणा प्रताप यांच्या सिसोदिया घराण्यातील शहाजीसुद्धा मुसलमानांकडे चाकरी करण्यात धन्यता मानत होते. संत रामदासांच्या अस्मितावार्धक बालोपासानेने जागृत झालेल्या समाजात राजमाता जिजाबाई व गुरु दादोजी कोण्डदेव यांच्या संस्कारातून महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. व महाराष्ट्रात क्षात्रधर्म पुन्र्स्थापित झाला हे सत्य इतिहासकार मानतात. केवळ महाराजांच्या अंगी अस्मिता निर्माण झाली व त्यांचे राज्य अस्तित्वात आले एवढा मर्यादित अर्थ कोणी काढू नये. समर्थ रामदास स्वामींमुळे समाजातील विविध अंगात अस्मिता सामावली गेली होती. महाराजांच्या कार्याला क्षत्रिय वर्णापेक्षा जनसामान्य जनतेने म्हणजेच शूद्र वर्णाने जास्त प्रमाणात हातभार लावला हेहि सर्वमान्य आहे. काशी येथील गागाभट्ट ह्या श्रेष्ठ विद्वानाने महाराजांचे क्षत्रियत्व सिद्ध करून राज्याभिषेक केला ह्या घटनेची माहिती सर्वत्र होती. श्रींची इच्छा फलद्रूप झाली होती.पण संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठेशाही कोसळू लागली. वीरता विस्कळीत झाली, सूत वर्गाच्या इच्छा शक्तीचा ह्रास झाला. कोकणातील चित्पावन शुद्ध ब्राह्मण असल्याने ते वेदविद्येचे प्रतिपालक होते. त्यांना ब्राह्म -क्षात्र धर्माची जाण होती. वेदांगाचा अभ्यास सातत्याने करावा लागत असल्याने आचार विचारात शिस्त होती. धर्मशास्त्रे माहित होती. पुराणांच्या निरुपणाने श्री परशुरामाने क्षत्रियांना क्षात्रधर्म शिकवला. शस्त्र धारण करूनही ते ब्राह्मण श्रेष्ठ व अवतारी पुरुषोत्तम ठरले हे हि ज्ञात होते. समर्थ रामदास स्वामी व शिवाजीमहाराजांचे हिंदवी स्वराज्य ढासळायला लागल्यावर जर क्षत्रिय व सूत वर्गीय स्वराज्य सांभाळू शकत नाहीत तर आपण धर्मकर्तव्य म्हणून श्री परशुरामांसारखे शस्त्र का धारण करू नये अशा विचाराने काही चित्पावनांचा व्यक्तिमत्त्व विकास झाला हे स्वीकारण्यात अडचण असू नये. जगाच्या इतिहासात देखील अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. रशियाचा लेनिन व जर्मनीचा हिटलर जनसामान्यातीलच होते. एक साम्यवादी तर दुसरा वर्णश्रेष्ठ वादी विचाराने भारलेला होता. दोन्ही विचारसरणी ह्याच्यापुर्वीच प्रस्थापित झाल्या होत्या. अशा घटनांमध्ये संस्कार व विचारांची पार्श्वभूमी असल्याचे साधारणतः सर्वत्र आढळते. त्यामुळे आता अशा घटना क्वचित घडत असल्या तरी त्यांना न सुटणारे कोडे म्हणता येत नाही.
शिवराज्यास्थापनेपूर्वी पासून चित्पावनांचे आदर्श समर्थ रामदासस्वामी व शिवाजीमहाराज असल्याचे दिसून येते. रामदासस्वामींचे शिष्य पाराजीपंत बर्वे मालवण जवळील मसुरे गावी राहत असत. त्यांच्या विधवा भगिनी रखमा आपल्या अंबाजी व दत्ताजी या मुलांसह माहेरीच राहत होत्या. स्वामींनी मसुरे गावी महारुद्र हनुमानाची स्थापना इसवी सन १६५४ मध्ये केली तेव्हा पाराजी पंतानी रामदासस्वामींना आपल्याकडे भोजनास आमंत्रित केले त्यावेळी अंबाजी यांनी सर्व कामे आस्थेने व दक्षतेने केली. त्यांची टापटीप , कार्यकुशलता व व्यवस्थापन कौशल्य पाहून स्वामींनी पाराजीपंताकडे अम्बाजीची मागणी केली. अंबाजी हेच पुढे समर्थांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी नावाने ओळखले जावू लागले. त्यांचे आडनाव ज्ञात नाही पण मातुल घराण्यावरून ते चित्पावन होते हे कळून येते. रामदास स्वामीच्या बरोबरीने कल्याणस्वामीनी शिवराज्यास हातभार लावला असणार हे ओघाने आलेच. समर्थांच्या शिष्यात हणमंत गोसावी करंदीकरहि होते. त्यांनीहि आपला वाटा उचलला असणार. स्वराज्य स्थापनेच्या पायाभरणीत चित्पावनांचा सहभाग होता ते समाजसंवर्धनच होते.ब्रह्मीभूत गोविंद सरस्वती नारायणभट्टसुरी बरवे ह्या चित्पावन सन्याशाने शिवराज्याभिषेक कल्पतरू हा संस्कृत ग्रंथ महाराजांच्या राज्याभिषेकानंतर दोन वर्षांनी पूर्ण केला. हा शिवाराज्याभिशेकावरील प्रथम ग्रंथ आहे. आडनावावरून हे सन्याशी कल्याणस्वामींच्या मातुल घराण्यातील व जवळच्या नात्यातील असावेत असे वाटते.
संभाजी महाराजांनीही तडफेने राज्य केले. फंदफितुरीमुळे शत्रूच्या हाती पडले. हिंदू धर्मासाठी त्यांनी आपले प्राण त्यागले. शिवाजी महाराज व संभाजी महाराज ह्यांचे जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेम जवळून पाहिलेल्या क्षत्रियांना संभाजी महाराजांनंतर अंगी वीरता असली तरी क्षात्रधर्माचा विसर पडू लागला होता. स्वराज्यासाठी झुंजणार्या व शत्रूला सळो की पळो करणाऱ्यांपैकी एकाने क्षुल्लक लाभासाठी आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरला आणि शीर शत्रूला नजर केले. क्षात्रधर्माचा एवढा ह्रास झाल्याने शिवराज्य डळमळू लागले व नष्ट होईल अशी स्थिती निर्माण झाली त्यावेळीही चित्पावन घराण्यातील बाळाजी विश्वनाथ भट शिवराज्य सावरण्यासाठी पुढे सरसावले. विस्कळीत वीरात्त्वाला त्यांनी शिस्त लावली, राष्ट्रप्रेम पुन्हा रुजवले. थोरल्या बाजीरावांनी शिवराज्याचा विस्तार केला. शिवाजीमहाराजांच्या दुसर्या वंशजांनी शिवराज्याच्या शत्रूशी हातमिळवणी करून स्वराज्यावर घाला घातला. अपुरी युद्धसामुग्री असूनही थोरल्या बाजीरावांनी शिवाजीमहाराजांची युद्धनीती वापरून स्वराज्याचे रक्षण केले. प्रतिशिवाजी म्हणता येईल एवढे त्यांचे शौर्य, धैर्य व बुद्धिमत्ता होती. त्यांना पराभव माहीतच नव्हता. ते प्रत्येक युद्धात विजयी झाले. त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ सेनानी मानले जाते. त्यांच्या पुढील पिढ्यांनीही शिवराज्य वृद्धिंगत केले. अफगाणिस्तानातील काबुल नदी पार करून अटकेपार स्वराज्याचे झेंडे रोवले व थोरल्या महाराजांचे स्वप्न साकार केले. त्यांच्या जातीबंधुनीही त्याला हातभार लावला. ब्रिटीशांचे राज्य आल्यावर त्याविरुद्ध उभे ठाकणाऱ्यात चित्पावनच आघाडीवर होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरचे नेत्तृत्त्वही चित्पावनांकडे होते. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पासून सुरु झालेल्या क्रांतिकारकांच्या परंपरेत चित्पावनच अग्रभागी होते. व त्यांचे प्रमाणही सर्वाधिक होते. काळाप्रमाणे बदलून सनदशीर स्वातंत्र्यलढा सुरु करणाऱ्यांतही चित्पावनच आघाडीवर होते.
पुन्हा समाजाची स्थिती शिवपूर्व काळासारखी झाली होती. लोकमान्य टिळकांनी समर्थांच्या शिकवणीनुसार समाज संवर्धनाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केले. स्वराज्य स्थापक शिवाजी महाराजांच्या अस्मिताप्रधान कार्याचे स्मरण राहावे म्हणून सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरु केले. इतिहास लेखनामागील मूळ उद्देश ज्ञात असल्यामुळे लोकमान्य टिळकांकडून हे कार्य झाले.
सौजन्य : चित्पावन ब्राम्हण ऋग्वेदी शांडिल्य गोत्रोत्पन्न गोडसे कुलवृत्तांत.