चित्पावन ब्राह्मण आणि संघटन – अ. वि. सहस्त्रबुद्धे

गेल्या शतकात ब्राह्मण समाजाने खूप सहन केले. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात जणूकाही ब्राह्मणांना नष्ट करता येईल का, या विचारांनीच ब्राह्मणेतरांनी पावले उचलली आहेत असे वाटू लागले आहे. प्रथम गांधीवधानंतर ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ केली, घरांवर दगडफेक केली; लगेचच कुळकायदा लागू करून ब्राह्मणांच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून काढून घेतल्या गेल्या. हळू हळू त्यांच्या शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली गेली, राजकारणातून त्यांची हकालपट्टी झाली(हल्ली त्यांना उमेदवारीसाठी तिकीटसुद्धा नाकारले जाते) नेत्यांच्या भाषणातून पूर्वी टिळक , सावरकर, आगरकर यांचा उल्लेख होई. आता फुले, आंबेडकर या नावाखेरीज अन्य नावे निषिद्ध झाली आहेत. फुले, आंबेडकरांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य आहे, पण त्याचबरोबर टिळक , सावरकर, आगरकर हि नावेही निश्चितपणे पूज्य आहेत. लेखन, साहित्य, साहित्यासंमेलन , शिक्षण वगैरे सर्व क्षेत्रातील ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न चालू झाला आणि आजमितीला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलविला गेला. (असे ऐकण्यात येते की पुतळा हलवितानाही त्याची विटंबना करून तो कचऱ्याच्या गाडीतून हलविण्यात आला).

 
वरील प्रत्येक वेळेस ब्राह्मणांनी काय केले? तर फक्त माघार घेतली, पळ काढला. ब्राह्मणांची घरे जाळली त्यावेळी कोणीही साधा निषेधही नोंदविला नाही. नथुराम गोडसे यांनी गांधीवध केला तर संपूर्ण ब्राह्मण जातीला जबाबदार धरून छळ केला , पण तेच एका शीख माणसाने कै. इंदिरा गांधींवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारले , तेव्हा मात्र शीख समाजावर कायमचा रोष धरला गेला नाही. उलट, शीख समाजातील लोकांवर तात्कालीन हल्ले झाले तेव्हा शिखांनी दावा लावून नुकसान भरपाई मागितली व ती मंजूरही झाली. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी शीख समाजाची माफीही मागितली. आम्ही फक्त सहन केले.

 
कूळ कायदा लागू झाल्यावर ब्राह्मणांनी तो कायदा नक्की काय आहे हे पहिले सुद्धा नाही . फक्त पळ काढला. वास्तविक कुळाच्या वारसांना जमिनीवर सहज हक्क मिळत नाही; मूळ मालकाच्या परवानगीशिवाय कुळांना जमिनी दुसऱ्यांना विकता येत नाहीत;वतनाच्या जमिनींना कुळकायदा लागू होत नाही. पण ब्राह्मण मंडळीनी कशाचीही दखल न घेता फक्त शहरांकडे पळ काढला. इथे लक्षात घ्यावे की जमिनीचे मूल्य सोन्यापेक्षा जास्त आहे, जमिनींच्या किमतीची दरवाढ सोन्याच्या दरवाढीपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. आता जमिनी नसल्याने आपण वन बी. एच.के., टू बी.एच.के.वर समाधान मानू लागलो आहोत…. प्रत्येक गोष्टीत पीछेहाट होऊन सुद्धा आपण फक्त सहन करीत आहोत.

 
कोणी म्हणेल , झालं ते झालं , आपण उघड्यावर तर पडलो नाही ना! हे खरेच! आजकाल ब्राह्मण वर्ग आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहे. प्रत्येकाची मुले चांगली मिळवतात. घरटी एक माणूस परदेशात आहे, या मजबूत आर्थिक परिस्थितीचा प्रत्येक कुटुंबाने स्वतःभोवती एक कोष निर्माण केला आहे व त्यात ते सुरक्षितपणे , सुखात नांदत आहेत. मग काळजी कशाला? हे खरे असले तरी कौटुंबिक स्वास्थ्य कायम राहील का? पण कुणी सांगावं? या कोषालाही तडा जावू शकेल. काही ना काही वाटा शोधून ब्राह्मणांना झोडपायचं सत्र चालूच राहिलं तर आपण काय करू शकू? निषेध सुद्धा व्यक्त करणार नाही आणि घरटी एक माणूस परदेशात आहे याबाबतचा रुबाब गळून पडेल! आपले लोक परदेशी असले तरी असाही विचार डोकावतो आहे की, आपण इथली इस्टेट मालमत्ता गमावून देशोधडीला लागलो नाही ना?

 
आता असे वाटते की, आता तरी ब्राह्मण मंडळींनी जागे व्हावे,एकत्रित येवून विचार करावा, नवी धोरणे ठरवावीत, आपले स्थान, आपले अस्तित्व बळकट करीत राहावे. ब्राह्मण हे मवाळ असतात अशी समजूत आहे. समजूतदार याचा अर्थ त्यांनी मवाळ असा घेतला असावा. कदाचित आजपर्यंत आपली वागणूकही मवाळपणाची , माघार घेण्याची प्रतिकार न करण्याची असल्याने त्यांची तशी समजूत झाली असावी. तसेच ‘ संख्येने ब्राह्मण मंडळी जेमतेम तीन टक्के आहेत, त्यामुळे ते निवडणूक जिंकूच शकणार नाहीत. त्यामुळे राजकारणात आपलेच वर्चस्व राहणार आहे’ असेही त्यांना वाटत असेल. त्याचा गैरफायदा लोक घेत आहेतच. आता लक्षात घेतले जावे की शिवाजी महाराजांचे मोजकेच लोक होते, पण एका विचाराने, एकत्र आल्याने ते जिंकू शकले. पांडव पाचच होते तरीही त्यांनी विजय मिळवला. आता तरी ही समजूत , आपली ताकद एकसंध होऊन, वाढवून, आपणच दूर करायला हवी. एकसंधपणा नसल्यानेही मवाळपणा आला असावा. कोणी आवाज उठवला तर तो एकटाच पडतो, कोणीही त्याच्या मदतीला धावून जात नाहीत, उलट ‘कशाला पालथे धंदे करावे त्याने’ म्हणून त्याचीच अवहेलना करतील.

 
आता प्रश्न निघेल की सर्वच ब्राह्मण मंडळीना त्रास होत असताना चित्पावनांनीच का एकत्र व्हायचे?सर्व शाखीय ब्राह्मणांनी एकत्र का येवू नये? जरूर यायला पाहिजे. पण चित्पावनांनी एकत्र यावे म्हणण्याची कारणे अशी की, चित्पावन समाज हा बुद्धिमान आहे. जगात ज्या बुद्धिमान जाती आहेत त्यात चित्पावन मंडळी अग्रणी आहेत. चित्पावन कर्तबगारही आहेत, लढवय्ये आहेत. जर गेल्या ३००-४०० वर्षांचा इतिहास पाहिला तर शौर्य, क्रांती, साहित्य, समाजसेवा, संशोधन, क्रीडा , नाटक,अगदी सर्कस सुद्धा अशा प्रत्येक क्षेत्रात चित्पावन लोकांनी नाव कमावले आहे. शिवाय संपूर्ण जगात सर्व चित्पावन एकाच संस्कार चाकोरीत बांधले गेल्याचे आढळते. कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बंगाल किंवा जगातल्या कुठल्याही देशातील चित्पावन यांच्यात एकसूत्रीपणा आढळतो. चित्पावनांनी स्वदेशात नाव कमावले आहेच पण परदेशातही नाव कमावले आहे. ‘नासा’ मध्ये चित्पावन मंडळी मोठ्या संख्येने आहेत. गुणवत्तेच्या आधारावर निवड होत असलेल्या काळात लष्करात जास्तीत जास्त चित्पावन उच्चाधिकारावर होते.

 
चित्पावन मंडळींचे दोषही तितकेच आहेत. चित्पावन लोकांत अहंभाव , शिष्टपणा जास्त आहे. कुठल्याही मताला विरोध करून, वाद घालून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात आपल्या मंडळींचा हातखंडा आहे. त्यामुळे चित्पावन लोक एकत्र येणे अशक्य आहे असे म्हटले जात. (मी या पत्रात मांडलेल्या विचारांना सर्वांची सहमती असेलच असे नाही)

 
पण आता आपले दोष आपणच दूर केले पाहिजेत, कारण आपल्याला आपणच सांभाळायचे आहे, टिकून राहायचे आहे, अन्यथा चित्पावनांना पाण्यात पाहणारी मंडळी चित्पावानांविरुद्ध कायदे करतील, इतिहास बदलत आहेतच, त्यात आणखी बदल घडवतील; चित्पावनांना जेरीला आणून सोडतील.सर्व शासकीय अधिकारी , शासकीय यंत्रणा राजकारण्यांच्या हातात आहेत. प्रसारमाध्यमे पैशाच्या जोरावर त्यांनी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे वाट्टेल तसा गोंधळ ते घालू शकणार आहेत. तेव्हा आपल्यात एकसंधपणा आणून, आपले दोष टाळून, स्वभावात समजूतदारपणा आणून, सर्व समाजाचेच भले करून आपले सामर्थ्य वाढवले पाहिजे. आम्हाला अन्य जातींशी वैर करायचे नाही. त्यांचे वाईटही चिंतायचे नाही. सर्व जातीजमातींचे भले व्हावे हीच आमची सदिच्छा! चित्पावनांना देश व संस्कृतीबद्दल नितांत आदर व अभिमान आहे. देश, धर्म, संस्कृतीची जपणूक करून त्याचा विकास चित्पावन करू शकतील आणि ती जबाबदारी आपणच घ्यायची आहे!

 
जगातील सर्व चित्पावन मंडळे , चित्पावन संघ एकमेकांना जोडले गेले पाहिजेत. वर्षातून ठराविक एक, दोन, तीन वेळा सर्व संघांच्या प्रमुखांची बैठक घेतली पाहिजे, एकत्रित जमले पाहिजे. सर्व चित्पावानांच्यात एकमेकांशी संपर्क राहिला पाहिजे….

 
उपसंहार: वर्ष १९९६ मध्ये स्थापन झालेला अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण महासंघ (सर्व चित्पावन संस्था, कुलमंडळे व पालक सदस्य यांचा समावेश असलेली शिखर संस्था – नोंदणी वर्ष २००७) , वर्ष २०१० मध्ये स्थापन झालेले चित्पावन फौंडेशन (कंपनी अॅक्ट अनुसार स्थापन झालेला चित्पावन समाजाचा एक गट ) आणि सीपी २०१० (चित्पावन प्रकल्पांसाठी कार्यरत असलेली परशुराम सेवा संघ प्रणीत संस्था) या तीनही संस्था समस्त चित्पावन समाजाच्या कल्याणासाठीच स्थापन झाल्या असून भविष्यात त्यांचे मध्ये चांगला समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वाचे काम विद्यमान युवापिढीने हाती घ्यावे, यासाठी चित्तवेधच्या शतशुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *