व्यक्तिविशेष
“चतुरंगी चक्रदेव”
-माधव बापट
चतुरंग रंग संमेलन २०, २१ डिसेंबर २०००३ ही नोंद तुमच्या आमच्या मानावर कायमची कोरली गेलीय. अत्यंत शिस्तबद्ध, सुनियोगीत, सुखावणारा असा दैवदुर्लभ सांस्कृतिक अनुभव आपण घेतला. चढत्या भाजणीनं रंगत जाणा-या या रंगसंमेलनाचा कळसाध्याय होता श्रीमान योगी नानाजी देशमुखांना समर्पित केलेला जीवनगौरव पुरस्कार आणि त्या निमित्तानं झालेली एकापेक्षा एक सरस भाषणं. श्री. अरुण टिकेकर, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर, डॉ. अभय बंग, मा. नानाजी देशमुख व मा. मोहन धारिया या आपापल्या क्षेत्त्रातील दिग्गजांची भाषणं म्हणजे आपल्या करता आयुष्यभराची ठेवच !चतुरंगचा ना कुणी अध्यक्ष, ना कुणी सचिव, ना कार्याध्यक्ष वा कोशाध्यक्ष, पदाधिकारीच नाहीत पण चतुरंग निर्नायकी निश्चितच नाही तसं पाहिलं तर अप्पा म्हणजे मधुकर चक्रदेव चतुरंगचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते नाहीत पण या वेळचं रंग संमेलन चतुरंगच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी घरच कार्य समजून उभं केलं. संयोजक्ता, व्यवस्थापन, शिस्त, अफाट चिकाटी, विस्मयकारी लोकसंचय आणि धनसंचय करण्याची जबरदस्त ताकत या सर्वांचा चतुरंगचा रंगसंमेलन जणू वस्तूपाठच होता. या रंगसमेलनाचे आधारस्तंभ मधुकर चक्रदेव होते असं म्हटलेलं त्यांना आवडणार नाही. ते म्हणतील, सर्वच ११० कार्यकर्त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि त्याचं चीज झालं. मी त्यांच्याबरोबर होतो इतकंच. एकाच व्यक्तीमध्ये हे सारं एकवटलेलं पाहून व्यक्तिविशेष लिहिताना नक्की काय काय लिहू ? कुठलं कुठलं विशेषत्वानं उलगडून दाखवू असा संभ्रम पडला तर नवल नाही.
तसं कोकणानं महाराष्ट्राला खूप काही दिलयं, स्वतः गरीब राहून महाराष्ट्राला विशेषतः आपल्या राजधानीला कोकणानं श्रीमंत केलंय. या परशुराम भूमीनं एखाद्या जवाही-याच्या नजाकतीनं एकेक अनमोल नररत्न सह्याद्रीच्या ओंजळीत टाकलंय. (प्रत्येक हिरा ‘कोहिनूरच’ असेल असं नाही.) इतिहासात डोकावलं तर त्याची कल्पना यावी आणि वर्तमानही त्याला अपवाद नाही हे मधुकर चक्रदेव यांच्याकडे पाहिलं की पटावं.
चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी कोकणातून नशीब काढायला म्हणून एक मुलगा मुंबईला येतो, कुर्ल्याला ब्राम्हणवाडीत एका जिन्याखालच्या खोलीत कोणाच्या तरी सोबतीनं राहतो, पडेल ते काम करतो, भायखळयाच्या एका ख्यातकीर्त रंगाच्या कारखान्यात साधा कामगार म्हणून कामाला लागतो, स्वतःच्या कर्तबगारीने फोरमन होतो. आणि पुढं जाऊन स्वतःचा कारखाना काढतो. जिथं कामगार म्हणून कारकीर्द सुरु केली, त्या कारखान्याच्या मालकाच्या मांडीला मांडी लाऊन बसतो ही किमया करणारा मुलगा म्हणजे आजचे उद्योगपती मधुकर चक्रदेव ! कुठून आला हा दुर्दम्य आशावाद? कुठून आली परस्थितीशी झगडण्याची ताकद ? कुठून आली सचोटी ? आणि पडल्यावरही उभं राहण्याची विलक्षण धडपड, आणि हे सर्व करत असतांना आपण समाजाचं कांही देणं लागतो ही मनाची तडफड ? या सगळ्यांचं उत्तर एकच, संस्कार ! कोकण्सात गरिबी असेल, दारिद्र्य असेल पण मनाची श्रीमंती, सचोटीचं बाळकडू समाजाचं ऋण मानण्याची वृत्ती, चिकाटी, ही सकाळच्या पेजेपासून रात्रीच्या शेजेपर्यंत जणू श्वासाश्वासातून खेळविली गेली, ते संस्कार !
नानाजींनी आपल्या भाषणात म्हटलं तसे संस्कार मधुकर चक्रदेवांच्यावर त्यांच्या लहानपणी झाले असले पाहिजेत, कारण ज्या वृत्ती, प्रवृत्ती, धारणा, श्रद्धा रुजतात, चांगल्या वा वाईट, त्या बालपणीच, नंतर दिसतात ते त्याचे आविष्कार! मधुकर चक्रदेवांसारखा देवमाणूस आपल्याला मिळाल्याचे मूळ त्या संस्कारात आहे. अर्थात हे संस्कार जितके महत्वाचे, तितकाच किंबहुना कांकणभर जास्तच महत्वाचा स्वीकार, नाहीतर, असे किंवा अशाच प्रकारचे संस्कार झालेला प्रत्येक पेणकर मधुकर चक्रदेव झाला असता ! कारण अमृतवेलीचे बीज तर दुर्मिळ आणि ते रुजणं त्याहीपेक्षा महाकर्मकठीण ही संस्कारांची बीजं मधुकररावांच्या मातीत, वृत्तीत, चित्तात रुजली ही वाढली त्या वृत्तीला, मातीला, स्विकृतीला त्रिवार सलाम!
या गुडीपाडव्याच्या शोभायात्रेच्या समारोपाप्रसंगी गणेश संस्थानानं या वर्षीच चालू केलेला पहिला “गणेश सेवाव्रती” पुरस्कार लाभला मधुकर चक्रदेव यांना. फडके मार्ग माणसांनी फुलून गेला होता.त्या गर्दीत आपल्या गांवावाल्याचं कौतुक बघायला असंख्य पेणकर आले होते. मधुकररावांचे कर्तृत्व पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. संघाची दीक्षा घरातच मिळाली होती. कुर्ल्याहून डोंबिवलीला आल्यावर त्याला मोकळी वात मिळाली. आबासाहेब पटवारी, बापूसाहेब मोकाशी, कै. मधुकरराव भागवत, कै. केशवराव खंडकर, मनोहर म्हैसकर असे सहकारी लाभले, आणि हां हां म्हणता एकेक संस्था उभ्या राहिल्या. मग ते पेंढारकर कॉलेज असेल, डोंबिवली नागरी सहकारी बँक असेल, जिमखाना असेल, आदर्श विद्यालय असेल, किंवा लायन्स क्लब असेल, किती किती म्हणून नावं घ्यावीत. पण मधुकर चक्रदेव रंगले मात्र चतुरंगी तत्वज्ञानात!
अंजली वहिनीसारखी सहधर्मचारिणी पाठीशी उभी राहिली. खरं तर अप्पांसारखी माणसं लाक्षणिक अर्थानंच संसारी असतात. यांना व्यसन असतं सामाजिक कार्याचं. आपण जे करतोय ते समाज कार्य आहे, समाजाचं भलं आहे, याची जाणीव किंवा याच भावनेनं हे प्रकल्प उभे केले जातात असं नाही. पण आपण काहीतर भव्यदिव्य करतोय, चांगलं करतोय, एवढीच त्यावेळी भावना असते, समाजकार्य वगैरे, वगैरे गोष्टी त्याला नंतर चिकटवल्या जातात. अशी कार्य उभी राहतांना मात्र त्याकडं लष्कराच्या भाकरी म्हणूनच पाहिलं जातं. एक प्रकल्प उभा राहिला की दुसरा, त्यात यश आलं की तिसरा आणि मग हे व्यसनच जडतं. त्याचीही एक झिंग चढते. तशा अर्थानं अप्पांना हे व्यसन जरूर आहे आणि अशा वेळेला घर धरून ठेवलं, मुलांची शिक्षण केली, उद्योगही सांभाळला तो अंजलीवहिनीनं, त्यांच्या सहधर्मचारिणीनं, त्यांच्या बरोबरीनं आप्पांचे भाऊ राजाभाऊ चक्रदेव यांनीही, राजकारण केलं ते गरज म्हणून. पिंड राजकारणी नाही. समाजकारण हेच खरं. नेतृत्व केलं ते आव्हान म्हणून, त्यात सत्तेची लालसा नाही.
स्वतःचा एक मोठा उद्योग असावा असं अप्पांचं स्वप्न होतं. ते साकारही झालं. चढउतारही आले. अहो, उतार म्हणजे किती उतार, तर एक कोटी रुपयांचा फटका बसला ! एक मराठी माणूस शंभर लाखाच्या आसपास फटका खातो तरीही जिद्दीनं परत उभा राहतो, स्वतःला सावरतो, कर्ज तर फेदातोच फेडतो, पण उद्योगाचा विस्तार करून एकाचे दोन कारखाने करतो. हे एकच विशेष कित्येक पानांना पुरून उरणारं आहे.
आज मधुकर चक्रदेव कृतकृत्य आहेत. आपल्या उद्योगाची सूत्रं त्यांनी पुढच्या पिढीच्या हाती सुपुत्र अतुल आणि सुकन्या निलिमा म्हणजे सौ. पूर्व पेंढारकर यांच्या हाती सुपूर्द केली आहेत. अर्थात घारीसारखं लक्ष आहेच. आणि परत संघकार्यात ते पूर्णतः रमून गेले आहेत. ते हाडाचे चतुरंगी आहेत कारण त्यांचा उद्योगही रंगाशीच सलग्न आहे.